गुरुवार, 25 अगस्त 2011

आधारस्तंभ


गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

एकदा सायंकाळी एका खेड्यावरुन परत आल्यावर अचानक शेजारी राहणा-या ममताकडे सहज नजर टाकली. घरासमोरच राहत असल्यामुळे ममता ही नवी सून असली तरी मोजकच नकळत हसली. मला तिच्या हसण्यानं सुध्दा ती खूप काळजीत असल्याचे जाणवले. काही न बोलता मी घरात आले.

मी घरी येऊन नंतर कामानिमित्त बाहेर गेले, पण डोळ्यासमोर ममताचा चेहरा
थोड्या-थोड्या वेळाने येत होता. नेहमी हसणारी, हसून स्वत:हून बोलणारी ममता आज इतकी अबोल का ? एकच प्रश्न सतत पडत होता.

ममता ही व्दारकाताईची मोठी सून असल्यामुळे ती घरातसुध्दा तेवढ्याच जबाबदारीने वागायची.हसतमुख राहून सर्वांची मर्जी राखायची. एक दीर, आजी, सासू-सासरे असा तिचा परिवार.निलेश नेहमी नवरा या नात्याने ममताची काळजी घ्यायचा. घरातील सगळया व्यक्ती खूप समजदार असताना ममता काळजीत का? हा प्रश्न मला दुस-या दिवशीपर्यंत सतावीत होता.

व्दारकाताई ह्या सोनिया गटाच्या सहसंघटिका होत्या. गटाची आपण मिटींग घ्यावी व ममताला बोलके करावे, म्हणून दुस-या दिवशी सायंकाळी ठरल्याप्रमाणे हनुमान मंदीरात सोनिया गटाची मिटींग घेण्यात आली. मिटींगला सुरुवात करताना सर्व महिलांकडे बघितले त्यात ममता कुठेच दिसत नव्हती. चौकशी करुन तिला बोलावण्यात आले. तेव्हा सुध्दा मोजकसं हसून गटात सभेला बसली.संधी बघून मी तिच्याजवळ गेली. तुला बरे नाही का ? काय होत आहे ? असे विचारुन बोलके केले, ती म्हणाली,काहीतरी काम पाहिजे.

मी आश्‍चर्याने बघितले व मनात एवढा महत्वाचा प्रश्न, पण स्वत: त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नात असणा-या ममताचे मला कौतुक वाटले. माझ्याकडे अपेक्षेच्या नजरेने बघून मला गटाच्या माध्यमातून काही काम मिळेल काय.मला कामाची फार आवश्यकता आहे, असे ती म्हणाली. या प्रश्नानी मी विचारात पडले. कारण ममता मध्यमवर्गीय कुटुंबातली, निलेश सुशिक्षित बेरोजगार पण काहीतरी करण्याची धडपड, कर्ते सासरे सेवानिवृत्त झालेले. एकूण कुटूंब तसं मोठंच पण मी तिला काहीही न दर्शवताच आपण बघू विचार करु, तू अशी हिंमत हारु नकोस, या शब्दांनी तिला हिंमत आल्याचे तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होते. पण ममताला धीर कुठे होता, मी दुस-या गटाकडे जेव्हा काही कामानिमित्त गेली असता, तिथे ममता मला बोलवण्याकरीता आली व म्हणाली, काकू आमच्या गटाच्या काही महिला माझ्या घरी बसल्या आहेत, तेव्हा तुम्ही आलात तर बरे होईल. मी सुरु असलेले काम आटोपून जेव्हा सोनिया गटाकडे गेली, तेव्हा सर्व सभासद तर नव्हते पण पाच ते सहा महिला मला दिसल्या त्यांना बघून बरे वाटले की आता माझ्या मनात कालपासून जे थोड्या फार प्रमाणात ममताबद्दल सुरु आहे. त्यासाठी या सगळ्यांची आपल्याला मदत होणार. ममताचा पुन्हा प्रश्न तोच ताई सांगा ना गटाच्या माध्यमातून मी काही करु शकणार नाही का ?

मी तिला म्हटले की, ममता मी एक आयडिया तुला देते, तू खानावळ का लावीत नाहीस. आपल्या शेजारी आजूबाजूला कर्मचारी आहेत आणि विद्यार्थी सुध्दा आहेत. तू जर मेस सुरु केली तर तुझे घराकडे लक्ष राहील, घरच्या घरी तुला काम पण मिळेल. हे बघ तुला काम मिळेल आणि त्यांना चांगले घरगुती जेवण मिळेल. बघ विचार करुन, त्यावर ममता म्हणाली की, मेस लावायची तर आधी धान्य सामान नको का भरायला. त्यासाठी आर्थिक मदत हवी. तेव्हा गटाच्या महिलांनी तिला गटातून कर्ज स्वरुपात मदत करण्याचे ठरविले.

दुस-या दिवशी तिची सासू एक दोन व्यक्तीकडे जावून विचारुन आल्या की, घरगुती खाणावळ तुम्हाला हवी का ? मी सुध्दा बँकेच्या कर्मचारी लोकांना आग्रह धरला. बघता बघता ममताच्या मेसच्या जेवणाचे कौतुक सर्वत्र पसरले. आज ममता, तिच्या सासूबाई सुध्दा खूप मेहनतीने खानावळ चालवतात. निलेशला कंपनीत नोकरी लागली, ममता म्हणाली,खानावळसाठी मला गटाने सहकार्य केले नसते तर मी आज काहीच करु शकले नसते. खरचं गटचं माझ्यासाठी खरा आधारस्तंभ ठरला आहे. ममताला समाधान मिळाल्याचे तिच्या बोलण्यात आणि उत्साहातून दिसत होते.

                                                                                                      0000000

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें