सोमवार, 5 मार्च 2012

व्‍यवसायात यशस्‍वी भरारी

वर्धा जिल्‍ह्याच्या सेलू तालुक्यातील बोर धरण रस्त्यावर वसलेल्या हिंगणी या गावात असलेल्या ४० ते ४५ गटांपैकी माविम अंतर्गत ५ गटांची स्‍थापना झालेली आहे. त्‍यापैकीच एक उन्‍नती स्‍वयंसहायता गट. १५ मे २०१० रोजी स्थापन झालेल्या या गटातील एक सदस्‍य ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे ह्या गटामध्‍ये येण्‍यापूर्वी फक्‍त चूल आणि मूल इतपतच मर्यादित होत्‍या. परंतु बचत गटात सामिल झाल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. 
 
उन्‍नती बचत गटाच्या स्‍थापनेपासून त्‍या गटाच्या सक्रीय सभासद आहेत. गटाच्‍या नियमित सभेला उपस्थित राहणे, प्रशिक्षणामध्‍ये सहभागी होणे, यामुळे त्‍यांच्‍यामध्ये आत्‍मविश्वास निर्माण झालाय. उद्योजकता जाणीवजागृती प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून त्यांच्या मनात उद्योग-व्यवसाय करण्‍याची इच्‍छा निर्माण झाली. गटातून ४००० रूपयांचे कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपड्याच्‍या व्‍यवसायाला त्यांनी सुरुवात केली. व्‍यवसायाच्‍या उत्‍पन्‍नातून गटाच्‍या कर्जाची परतफेड झाली. त्‍यानंतर माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने २० हजार रूपयांचे कर्ज घेऊन त्‍यांनी व्‍यवसायामध्‍ये वाढ केली. व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून एका वर्षामध्‍ये या कर्जाचीही परतफेड झाली. ज्‍योत्‍स्‍ना यांची प्रगती व कर्ज परफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेने त्यांचा सत्‍कार केला. व्‍यवसायात वाढ करण्‍याकरिता ज्योत्स्ना यांनी बँकेकडे ५० हजार रूपयांच्या कर्जाची मागणी केली. बँकेने त्यांना कर्ज मंजूर केले. या माध्यमातून व्यवसायाला भरभराट आली असून, व्‍यवसायातून त्यांना चांगला नफा मिळू लागला आहे. 

ज्‍योत्‍स्‍नाच्‍या या आदर्श कार्यामुळे गावात झालेल्‍या गाव विकास समितीमध्‍ये त्यांची अध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली. गाव विकास समितीच्‍या माध्‍यमातून त्यांनी सर्व गटातील महिलांच्‍या सहभागाने गावामध्‍ये वृक्षारोपण, एच.आय.व्ही. एड्स जाणीवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्‍यादी महत्‍वपूर्ण कार्यक्रम घेतले आहेत. 
ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांची बचत गटात येण्‍यापुर्वीची परिस्थिती आणि हिंमत आणि प्रामाणिकपणाने व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून त्यांनी घेतलेली भरारी हे इतरांसाठीही निश्चितच प्रेरणा देणारे आहे. 

गुरुवार, 1 मार्च 2012

बचतगटामुळे चंदा बनली उद्योजक


गुरुवार, १ मार्च, २०१२

अल्लीपूर हे वर्धा जिल्‍ह्याच्या हिंगणघाट तालुक्‍यातील एक गाव. या गावामध्‍ये माविम अंतर्गत आठ गट असून, रमाई योजनेअंतर्गत येथे समता स्वयंसहायता गटाची स्‍थापना करण्‍यात आली. 
 
गटाची संघटिका आणि सचिव निवडण्याच्या वेळी इतर महिला सदस्य तयार होत नसल्याने श्रीमती चंदा रंजित भगत यांची समता गटाच्या सचिवपदी निवड झाली. जेव्‍हा गटाची स्‍थापना झाली, तेव्‍हा गटामध्‍ये पैसे भरण्‍याइतकीदेखील त्‍यांची परिस्थिती नव्‍हती. परंतु आपल्‍या रोजगाराच्‍या मजुरीतून दहा-दहा रुपये प्रमाणे पैसे जमा करुन त्‍यांनी गटामध्‍ये पैसे भरण्‍यास सुरुवात केली होती. दर महिन्‍याला मिटींग घेणे, रेकॉर्ड बरोबर ठेवणे ह्या माध्‍यमातून चंदाताईनी बचत गटाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले. बचत गटातील महिलांनीही त्यांना या कामी मोलाचे सहकार्य केले. 

आपल्‍या पत्‍नीने हिंमत दाखवून बचत गटाचे काम सुरू केल्याबद्दल पतीने देखील त्यांची मदत करण्यास सुरूवात केली. गटामधून कर्ज काढून छोटासा उद्योग लावावा, असे विचार चंदाताईंच्या मनात येत होते. याबाबत त्यांनी सहयोगीनी सोबत चर्चा केली. माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने चंदाताईने भाजीपाला विक्रीचा व्‍यवसाय निवडला. त्‍याकरिता गटामधून ५ हजार रूपयांचे कर्ज घेतले. ठोक स्‍वरुपात बाजारातून भाजीपाला विकत घेऊन बाजारामध्‍ये किरकोळ विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. मनात पक्‍का निर्धार असल्‍यामुळे व्यवसायाला गती मिळाली. व्‍यवसायात जम बसला. हळूहळू त्यांनी सिजनेबल व्‍यवसाय करायलाही सुरुवात केली. 

गटाकडून घेतलेले कर्ज परत केल्‍यावर चंदाताईंनी आणखी १० हजार रूपयांचे कर्ज उचलले आणि भाजीपाला व्‍यवसायातून काही पैसे जमवून चवरे-मटाटे बनविण्याचा व्‍यवसाय सुरु केला. पतीसह आपल्‍या दोन मुलांनाही त्यांनी चवरे-मटाटे बनविणे शिकविले. आज त्यांचे कुटुंब चवरे-मटाटे बनवून विक्री करतात. काम करण्‍याची जिद्द आणि आवड तसेच कुटुंबाची मिळालेली साथ यामुळे लहान-व्‍यवसायातून मोठा व्‍यवसाय उभा राहू शकला. ह्या व्‍यवसायामधून चंदाताईंनी स्‍वतःचे घर बांधले, मुलांचे शिक्षणही चालू आहे. 

केवळ बचतगट आणि सहयोगिनींचे मार्गदर्शन या माध्यमातूनच आपण एक उद्योजक बनल्याची भावना चंदाताईंच्या मनात कायम आहे. त्यांचे हे उदाहरण इतर महिलांसाठी सुद्धा मार्गदर्शक असेच आहे.