सोमवार, 5 मार्च 2012

व्‍यवसायात यशस्‍वी भरारी

वर्धा जिल्‍ह्याच्या सेलू तालुक्यातील बोर धरण रस्त्यावर वसलेल्या हिंगणी या गावात असलेल्या ४० ते ४५ गटांपैकी माविम अंतर्गत ५ गटांची स्‍थापना झालेली आहे. त्‍यापैकीच एक उन्‍नती स्‍वयंसहायता गट. १५ मे २०१० रोजी स्थापन झालेल्या या गटातील एक सदस्‍य ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे ह्या गटामध्‍ये येण्‍यापूर्वी फक्‍त चूल आणि मूल इतपतच मर्यादित होत्‍या. परंतु बचत गटात सामिल झाल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. 
 
उन्‍नती बचत गटाच्या स्‍थापनेपासून त्‍या गटाच्या सक्रीय सभासद आहेत. गटाच्‍या नियमित सभेला उपस्थित राहणे, प्रशिक्षणामध्‍ये सहभागी होणे, यामुळे त्‍यांच्‍यामध्ये आत्‍मविश्वास निर्माण झालाय. उद्योजकता जाणीवजागृती प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून त्यांच्या मनात उद्योग-व्यवसाय करण्‍याची इच्‍छा निर्माण झाली. गटातून ४००० रूपयांचे कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपड्याच्‍या व्‍यवसायाला त्यांनी सुरुवात केली. व्‍यवसायाच्‍या उत्‍पन्‍नातून गटाच्‍या कर्जाची परतफेड झाली. त्‍यानंतर माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने २० हजार रूपयांचे कर्ज घेऊन त्‍यांनी व्‍यवसायामध्‍ये वाढ केली. व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून एका वर्षामध्‍ये या कर्जाचीही परतफेड झाली. ज्‍योत्‍स्‍ना यांची प्रगती व कर्ज परफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेने त्यांचा सत्‍कार केला. व्‍यवसायात वाढ करण्‍याकरिता ज्योत्स्ना यांनी बँकेकडे ५० हजार रूपयांच्या कर्जाची मागणी केली. बँकेने त्यांना कर्ज मंजूर केले. या माध्यमातून व्यवसायाला भरभराट आली असून, व्‍यवसायातून त्यांना चांगला नफा मिळू लागला आहे. 

ज्‍योत्‍स्‍नाच्‍या या आदर्श कार्यामुळे गावात झालेल्‍या गाव विकास समितीमध्‍ये त्यांची अध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली. गाव विकास समितीच्‍या माध्‍यमातून त्यांनी सर्व गटातील महिलांच्‍या सहभागाने गावामध्‍ये वृक्षारोपण, एच.आय.व्ही. एड्स जाणीवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्‍यादी महत्‍वपूर्ण कार्यक्रम घेतले आहेत. 
ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांची बचत गटात येण्‍यापुर्वीची परिस्थिती आणि हिंमत आणि प्रामाणिकपणाने व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून त्यांनी घेतलेली भरारी हे इतरांसाठीही निश्चितच प्रेरणा देणारे आहे. 

गुरुवार, 1 मार्च 2012

बचतगटामुळे चंदा बनली उद्योजक


गुरुवार, १ मार्च, २०१२

अल्लीपूर हे वर्धा जिल्‍ह्याच्या हिंगणघाट तालुक्‍यातील एक गाव. या गावामध्‍ये माविम अंतर्गत आठ गट असून, रमाई योजनेअंतर्गत येथे समता स्वयंसहायता गटाची स्‍थापना करण्‍यात आली. 
 
गटाची संघटिका आणि सचिव निवडण्याच्या वेळी इतर महिला सदस्य तयार होत नसल्याने श्रीमती चंदा रंजित भगत यांची समता गटाच्या सचिवपदी निवड झाली. जेव्‍हा गटाची स्‍थापना झाली, तेव्‍हा गटामध्‍ये पैसे भरण्‍याइतकीदेखील त्‍यांची परिस्थिती नव्‍हती. परंतु आपल्‍या रोजगाराच्‍या मजुरीतून दहा-दहा रुपये प्रमाणे पैसे जमा करुन त्‍यांनी गटामध्‍ये पैसे भरण्‍यास सुरुवात केली होती. दर महिन्‍याला मिटींग घेणे, रेकॉर्ड बरोबर ठेवणे ह्या माध्‍यमातून चंदाताईनी बचत गटाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले. बचत गटातील महिलांनीही त्यांना या कामी मोलाचे सहकार्य केले. 

आपल्‍या पत्‍नीने हिंमत दाखवून बचत गटाचे काम सुरू केल्याबद्दल पतीने देखील त्यांची मदत करण्यास सुरूवात केली. गटामधून कर्ज काढून छोटासा उद्योग लावावा, असे विचार चंदाताईंच्या मनात येत होते. याबाबत त्यांनी सहयोगीनी सोबत चर्चा केली. माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने चंदाताईने भाजीपाला विक्रीचा व्‍यवसाय निवडला. त्‍याकरिता गटामधून ५ हजार रूपयांचे कर्ज घेतले. ठोक स्‍वरुपात बाजारातून भाजीपाला विकत घेऊन बाजारामध्‍ये किरकोळ विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. मनात पक्‍का निर्धार असल्‍यामुळे व्यवसायाला गती मिळाली. व्‍यवसायात जम बसला. हळूहळू त्यांनी सिजनेबल व्‍यवसाय करायलाही सुरुवात केली. 

गटाकडून घेतलेले कर्ज परत केल्‍यावर चंदाताईंनी आणखी १० हजार रूपयांचे कर्ज उचलले आणि भाजीपाला व्‍यवसायातून काही पैसे जमवून चवरे-मटाटे बनविण्याचा व्‍यवसाय सुरु केला. पतीसह आपल्‍या दोन मुलांनाही त्यांनी चवरे-मटाटे बनविणे शिकविले. आज त्यांचे कुटुंब चवरे-मटाटे बनवून विक्री करतात. काम करण्‍याची जिद्द आणि आवड तसेच कुटुंबाची मिळालेली साथ यामुळे लहान-व्‍यवसायातून मोठा व्‍यवसाय उभा राहू शकला. ह्या व्‍यवसायामधून चंदाताईंनी स्‍वतःचे घर बांधले, मुलांचे शिक्षणही चालू आहे. 

केवळ बचतगट आणि सहयोगिनींचे मार्गदर्शन या माध्यमातूनच आपण एक उद्योजक बनल्याची भावना चंदाताईंच्या मनात कायम आहे. त्यांचे हे उदाहरण इतर महिलांसाठी सुद्धा मार्गदर्शक असेच आहे.

मंगलवार, 28 फ़रवरी 2012

पाऊल पडते पुढे

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

वर्धा जिल्‍ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील २४९ लोकसंख्‍या असलेले खैरगाव. आपापले नित्य व्यवहार पार पाडण्यापलिकडे येथे फारसे काही घडत नव्हते. परंतु बचतगटाची चळवळ सुरू झाली आणि या गावाची पावलेही पुढे पडायला लागली. 
 

या गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या मार्गदर्शनाखाली सुजाता स्‍वयंसहाय्यता महिला बचतगटाची स्‍थापना करण्‍यात आली. गटाच्‍या संघटिका म्‍हणून श्रीमती शोभा झिबलजी गायधने यांची निवड करण्यात आली. शोभा अशिक्षित असल्‍या तरी त्यांच्याकडे जिद्द आणि चिकाटी होती. त्यामुळे त्यांनी रात्रीच्‍या शाळेत जाऊन शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. घरातील कामे, शेतीची कामे, गटाची कामे करुन शोभाताईंनी ४५ व्‍या वर्षी चौथीची परीक्षा पास केली. इच्छा असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते हे त्‍यांनी समाजाला दाखवून दिले. 
शोभाताईंनी गटातून कर्ज घेऊन स्‍वतःच्‍या १२ एकर शेतीमध्‍ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला. त्‍यासाठी त्‍यांनी स्‍वतः व गटातील महिलांनी शेतीशाळेत प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीमुळे किटकनाशके, रासायनिक खते इत्‍यादीचा खर्च वाचला. शोभाताईंनी स्‍वतः गांडूळ खत, जिवामृत तयार करुन शेतीमध्‍ये त्‍याचा वापर केला. शेतीमधून निघालेल्‍या उत्‍पादनातून त्‍यांनी कृषी प्रदर्शनामध्‍ये विषमुक्‍त अंबाडी शरबत तसेच झुणका भाकरचा स्‍टॉल लावून सक्रीय सहभाग घेतला.

गटातील महिलांच्‍या सहकार्याने व स्‍वतः पुढाकार घेऊन त्यांनी गावातील तलावावर बंधारा बांधला. गटाचा वाढदिवस, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मेळावे इत्‍यादी विविध कार्यक्रम गावामध्‍ये पुढाकार घेऊन साजरे केले जाऊ लागले. सुजाता स्‍वयंसहाय्यता बचतगटाच्‍या नावाने शेतकरी वाचनालय स्‍थापन करण्यात आले. आता गावातील शेतकरी देखील येथे जाऊन वाचन करतात. शोभाताईंनी शासनाच्या शेततळे, गोबरगॅस, वृक्षारोपण आदी योजनांचा लाभ घेतला आहे. 
गटामध्‍ये सहभागी झाल्‍यामुळे माझा आत्‍मविश्‍वास वाढला. मी जे काही करते आहे ते गटाकडून मिळत असलेल्‍या बळामुळे. गटातील सर्व सभासद सुखी समाधानी जीवन जगावेत यासाठी भविष्‍यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगला व्‍यवसाय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटाच्‍या सभासदांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांच्या साथीने हे स्वप्नही साकार होईल आणि आणखी एक पाऊल नक्कीच पुढे पडेल, असे त्या विश्वासाने सांगतात. 

महान्‍यूजवरुन साभार

शुक्रवार, 24 फ़रवरी 2012

शिवणकलेतून जुळली घरच्‍यांची मने...!

लग्नापूर्वी शिवणकलेची असलेली आवड आयुष्य घडविण्यासाठी आणि काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जुळविण्यासाठीही उपयुक्त ठरली. ही कहानी आहे वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर येथील साधना कांबळे यांची. ढासळत असलेल्या आयुष्याला बचतगटाच्या माध्यमातून आधार मिळाला आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.
 

साधना यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कसेबसे जीवन जगणे सुरु होते. परिस्थितीमुळे कुटुंबातील व्यक्तींची मने दुभंगलेली होती. त्या आपली कहाणी सांगतात... अशा परिस्थितीत एके दिवशी माविम सहयोगिनींनी मला बचतगटात समाविष्‍ट करून घेतले आणि गटातील सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. नवीन काहीतरी करायला मिळणार या उद्देशाने मी त्‍यांना होकार दिला. काहीतरी केल्याशिवाय घराचे गाडे चालणार नव्हते. त्यामुळे पुढाकार घेण्‍यास मी तयार झाले. गटाच्‍या माध्‍यमाने व सहयोगिनींच्‍या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्‍यवहार उत्‍तमरित्‍या शिकले. ह्यातून माझा आत्‍मविश्‍वास वाढला. 

मी लग्‍नापूर्वी शिवणकलेचा कोर्स केला होता. मी ठरविले की, गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन घ्‍यायची आणि स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून घरच्‍यांची मने जिंकायची. मी शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगला सुरु आहे. उद्योगामुळे घरच्‍या परिस्थितीला आर्थिक पाठबळ मिळाले. घरच्‍या परिस्थितीत सुधारणा व्‍हायला लागली. त्‍यामुळे माझ्याकडे घरच्‍या लोकांचा पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला. मी आता स्‍वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. गटाचे व्‍यवहार पाहू शकते. घरखर्चात हातभार लावू शकते. या कामी आता पतीचीही चांगली साथ मिळते आहे. 
बचतगटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग सुरु झाला. कपडे शिवता शिवता काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जोडली गेली हेच माझे खरे यश आहे.


महान्‍यूजवरुन साभार

शुक्रवार, 17 फ़रवरी 2012

धैर्यशील

वर्धा जिल्‍ह्यातील कांढळी ते सेवाग्राम रोडवर एक छोटसं गाव आहे वायगाव (बै.). जवळपास ८०० लोकसंख्येच्या ह्या छोट्याशा गावात असणारं एक कुटुंब म्‍हणजे शालुचं! याच गावात शालू लहानाची मोठी झाली. तिच्‍या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची होती. ती घरात सर्वात मोठी. तिचे आईवडील शेतमजुरी करुन आपल्‍या कुटुंबाचा सांभाळ करीत असत. तर, शालू व तिचे भाऊ शाळा शिकत होते. आज आपल्या पायावर उभी राहिलेली शालू आपल्या कुटुंबाला हातभार लावीत आहे.

शालूचे शिक्षण कसेबसे दहावी पर्यंत झाले. तिला पुढे शिकायचे होते. पण परिस्थिती पुढे तिला नमते घ्यावे लागले. लवकरच तिच्‍या आईवडिलांनी तिचे लग्‍न करण्याचाही निर्णय घेतला. त्‍यामुळे तिच्यापुढे शिक्षणाचा पर्याय शिल्लक राहिला नाही. लग्नानंतर शालूच्या मुली अगदी लहान असतानाच तिच्यावर फार मोठे संकट कोसळले, तिच्‍या पतीने आत्‍महत्‍या केली. या परिस्थितीतून बाहेर पडताना शालूचा स्वाभिमान आणि जिद्द तिला उपयोगी पडली. तिच्यापुढे मोठा प्रश्न होता तो तिच्या मुलींच्या भवितव्याचा.. त्यासाठी तिने शेवटी निर्णय घेतला माहेरी जाण्‍याचा. 
 
ती माहेरी गेल्‍यावर माहेरच्‍या व्‍यक्तींकडून तिच्‍या परिवाराच्‍या गरजा पूर्ण होणे अपेक्षित नव्हते, तिच्‍या समस्‍या तिलाच सोडवायच्‍या होत्‍या. त्यामुळे इतरांवर अवलंबून न राहता स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून आपल्‍या मुलींना चांगले शिक्षण द्यायचे हे तिचे ध्‍येय होते. 

दरम्यान माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने वायगाव (बै.) येथे बचत गटाची स्‍थापना झाली. शालूला बचत गटाची संघटिका बनण्‍याची संधी मिळाली. शालू संघटिका म्‍हणून गटाचे काम पाहू लागली. गटाचे आर्थिक व्‍यवहार सुरळीत सुरु होते. शालूने गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केली आणि तिने कपडे शिवून देण्यास सुरुवात केली. त्यातून तिने स्‍वतःचे अस्तित्‍व निर्माण केले. व्‍यवसायातून मिळालेल्‍या मिळकतीतून ती आपल्‍या मुलींच्‍या गरजा पूर्ण करण्‍यास समर्थ ठरली. एवढेच नव्‍हे तर स्वत:वर बेतलेल्या परिस्थितीमुळे ती आता गावात प्रत्‍येक कार्यक्रमास उपस्थित राहून, सर्वांशी सहकार्याच्‍या भावनेने शक्य होईल ती मदत करते. तिच्‍या ह्या भरारीतून इतरांनाही निश्चितच प्रेरणा मिळते.

मंगलवार, 14 फ़रवरी 2012

बचतीने बदललं आयुष्‍य!

वर्धा जिल्‍ह्यातील कारंजा तालुक्‍यात असणाऱ्या नारा गावातील ‘आशीर्वाद’ स्‍वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांचे आयुष्‍यच आता बदलून गेले. पोटापाण्‍याची सोय व्‍हावी यासाठी सुरु केलेल्‍या उपक्रमातून मसाले उत्‍पादनात या गटाने आघाडी घेतली आहे. या गटाची कहाणी इतर महिलांना एक शिकवण ठरावी अशीच आहे. 
 

गावातील गरीब महिलांना चांगले जीवन जगता यावे व त्यांना स्‍वयंप्रेरणेने आपल्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, म्‍हणून २००६ साली या बचतगटाची निर्मिती करण्‍यात आली. महिला सक्षम व्‍हाव्‍यात, त्‍यांनी पोटापाण्‍यापुरता एखादा छोटासा व्‍यवसाय करावा, यासाठी सुरूवातीला संघटक मंदा सूर्यभान वंजारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. गटाच्या प्रवासाबाबत अध्‍यक्ष बबिता बाबुलाल सोनटक्‍के यांनी माहिती दिली. 

महिलांना प्रशिक्षण देऊन, व्‍यावसायिक पुस्‍तके देऊन व्यवसाय करण्यास प्रेरित करण्यात आले. त्‍यातूनच सर्व महिलांनी हळद, मिरची, मसाला दळण (कांडप) व्‍यवसाय सुरु करण्‍याचे ठरविले. आता तो व्‍यवसाय सुरळीत चालू आहे. त्‍या व्‍यवसायातून महिला दर महिन्‍याला मासिक बचत करतात. 

बचत गटाला दहा हजार रुपये फिरता निधी देण्यात आला. गटाच्‍या महिला आपले रोजचे घरगुती काम, शेतीचे काम सांभाळून आळीपाळीने व्‍यवसाय सांभाळतात. बचत गटाची बैठक दर महिन्याच्या ५ तारखेला घेण्‍यात येते. त्‍या बैठकीत मात्र सर्व महिला हजर राहतात व गटातील कार्यात जातीने लक्ष देतात. बैठकीची वेळ रात्रीची ८ नंतरची ठेवण्‍यात आल्‍यामुळे सर्व महिला आपापली कामे संपवून बचत गटातील विषयांवर चर्चा करतात. बचत जमा करणे, कर्ज वाटप करणे, कर्ज परत करणे या विषयावर बैठकीत चर्चा केली जाते. 

बैठकीच्या माध्यमातून सर्व महिलांच्‍या अडचणी सोडविणे शक्य होऊ लागल्यामुळे त्या महिला बचत गटामध्‍ये जोमाने कार्य करु लागल्‍या. बचत गटाला विकास विषयक प्रशिक्षण देण्‍यात आले. त्‍यामुळे गावातील महिलांचा आत्‍मविश्‍वास वाढला. 

आज घडीला गटातील महिलांचा सर्व कार्यामध्‍ये सक्रीय सहभाग दिसतो. गटात सामील झाल्‍यापासून महिलांचा आत्‍मविश्‍वास वाढलेला आहे. आज गटातील महिला रोज कमी अधिक प्रमाणात व्‍यवसाय करताना दिसत आहेत. महिला गावातील प्रत्‍येक योजनेला प्रतिसाद देतात. त्‍यांच्यातील न्‍युनगंड कमी होऊन शिक्षणाविषयी आदर निर्माण झाला आहे. महिलाही आज लिहिताना, वाचताना, व्‍यवहार करताना दिसत आहेत. 

ज्‍या महिला आधी नकारात्‍मक प्रवृत्तीच्‍या होत्‍या, त्‍या आज सकारात्‍मक झालेल्‍या दिसून येतात. त्‍यांच्‍या व्‍यवहार कुशलतेची पावती म्‍हणजे ४८ हजार रूपये खर्चून त्‍यांनी आपल्‍या व्‍यवसायासाठी मिरची, हळद, मसाला कांडप मशीन घेतली व तिच्‍या परतफेडीची पावले उचलणे सुरु आहे. 

महिलांना उपजिविकेचे साधन उपलब्‍ध झाले आहे. त्‍यांना शिक्षणाचे, व्‍यवहाराचे, व्‍यवसायाचे महत्व कळले आहे. दारिद्र्य रेषेखालील महिला आपल्‍या पायावर उभे राहणे हे नक्कीच कौतुकास्‍पद आहे. महिला सक्षम झाल्‍याचेच हे उदाहरण आहे.


महान्‍यूजवरुन साभार

गाव घेतेय बचतगटाची दखल

         वर्धा जिल्‍ह्यात बचतगटांनी उत्‍पादित केलेल्‍या सर्व पदार्थांना ‘वर्धिनी’ ब्रँड नेम देण्‍यात आले आहे. घरात हळद, तिखट, शेवया, सरगुंडे आदी पदार्थ विशिष्‍ट मानकानुसार तयार करायचे आणि वर्धिनी ब्रँडखाली एकाच पद्धतीच्‍या पॅकिंगमध्‍ये विक्री करायची असा नवा विपणन कार्यक्रम जिल्ह्यात सुरु झाला आहे. 

या उत्‍पादनांना आपल्‍या बचतगटात बनविणारा आणि खात्रीची बाजारपेठ मिळविणारा एक बचतगट साखरा येथे आहे. ‘क्रांती’ स्‍वयंसहायता महिला बचतगट असे त्‍याचे नाव. 
 

गटाच्‍या कामकाजाबद्दल उत्सुकता वाटणे साहजिकच आहे. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तेथे भेट दिली असता गटाच्या महिलांनी स्‍वतःच माहिती दिली. सप्‍टेंबर २००७ मध्‍ये या गटाची स्थापना झाली. या गटाचे खाते कोरा येथील बँक ऑफ महाराष्‍ट्रा च्या शाखेत काढण्यात आले आणि बचतीच्‍या पैशामधून गटातील महिलांनी आपल्या घरगुती गरजा भागविणे सुरु केले. 

सुरूवातीला गटातील प्रत्येक महिलेला आपले कौशल्‍य दाखविण्‍याची संधी मिळावी यासाठी आम्‍ही सर्वांनी छोटे उद्योग, जसे मेणबत्ती, धूपबत्ती, अगरबत्ती आदी बनविण्‍याचे प्रशिक्षण घेतले. वर्धा जिल्ह्यात असलेल्या वर्धिनी ब्रँडमुळे आमच्‍या गटाकडून बनविल्‍या गेलेल्‍या वस्तूला बाजारपेठही मिळाली आणि त्यातून आमचा व्यवसायही वाढत गेला. वर्धिनीमुळे वस्तू कशी विकायची ही कला आम्हालाही आत्‍मसात झाली. 
कालांतराने आम्‍ही महिलांनी एकत्र येऊन बचतीचा हप्ता वाढवून घेतला. थोडा आत्मविश्वास आल्यानंतर आम्ही मोठ्या उद्योगासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. त्यासाठी कर्जाचा प्रस्‍ताव तयार केला. मे २०१० ला बँकेकडून १ लाख रुपये मिळाले. ज्‍यातून आम्‍ही आटा चक्‍की, कांडप मशीन सुरु केली. आजच्‍या स्थितीत संपूर्ण गाव आमच्‍या गिरणीवर दळण दळतात. उत्‍पन्‍नाची आवक चांगली चालू आहे. त्‍याचबरोबर गावातील शेतकऱ्यांची हळद मिरची ठोक भावाने घेऊन बारीक करुन वर्धिनी ब्रँड अंतर्गत पॅक करुन विकणे, मसाले, लोणचे, साबण, वन औषधी, चकली, सरगुंडे तयार करुन विकणे आदी कामे सुरू झाली. या पदार्थांच्या विक्रीसाठी गटाच्या महिला स्‍वतः जाऊ लागल्या आहेत. 

गटामुळे महिलांमधला आत्‍मविश्‍वास वाढीस लागला. महिन्‍याच्‍या २ तारखेला गटाची मिटींग न चुकता होऊ लागली. त्यात छोट्या मोठ्या प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा होऊ लागली. महिलांचे अस्तित्व गावात, समाजात जाणवू लागले. 

बचतगटाच्या माध्यमातून आत्मविश्वास प्राप्त झाल्यानंतर आर्थिक स्थैर्य मिळाले आणि समाजात स्वत:चे अस्तित्व निर्माण झाल्यानंतर गावातील सामाजिक कार्यात बचतगटाची दखल घेतली जाऊ लागली, हेच बचतगटांच्या माध्यमातून महिलांना संधी मिळाल्याचे खरे यश म्हणता येईल.


महान्‍यूज वरुन साभार 

बचतगटांनी दिला स्त्रियांना सन्‍मान

एकविसाव्‍या शतकाच्‍या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रात दिसू लागला आहे. ग्रामीण भागातील महिला स्‍वतःला मर्यादित न ठेवता पुरुषांच्‍या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. महिलांना सन्मानाने जगण्यासाठी बचतगट हे उत्कृष्ट माध्यम ठरू लागले आहे.

वर्धा जिल्‍ह्यातील आष्‍टी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या माणिकवाडा येथील अन्‍नपूर्णा स्‍वयंसहायता महिला बचत गटाच्‍या सदस्‍यांची कामगिरी अशाच प्रकारचे महिलांचे यश अधोरेखित करणारी आहे. 
 

एकूण १२ सदस्य असलेल्या या बचत गटाची स्‍थापना ३ ऑगस्‍ट २००५ रोजी झाली. सर्वानुमते पुष्‍पा दशरथ घागरे यांना अध्‍यक्ष आणि बेबी रामराल गंधळे यांना सचिव बनविण्यात आले. त्‍यानंतर महिलांना शिक्षित व प्रोत्‍साहित करण्‍याचे कार्य संघटिका महानंदा राऊत यांनी उत्तमरित्‍या बजाविले. 

बँक ऑफ इंडिया, साहुर शाखेकडून गटाची प्रथम प्रतवारी ८ नोव्‍हेंबर २००७ ला झाल्यानंतर अंतर्गत कर्ज वाटपाकरिता गटाला २५ हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्‍ध झाला तर, अनुदान म्हणून १० हजार रूपये मिळाले. या रकमेचा योग्य उपयोग करून गटातील महिलांनी स्वत:च्या संसाराला हातभार लावला. कालांतराने महिलांना गटाच्या कर्जातून प्रगती साधता येईल हे लक्षात आल्यानंतर त्‍यांनी दुग्‍धव्‍यवसाय करण्‍याचे ठरविले. दुग्‍धव्‍यवसायाकरिता २० संकरित गायी खरेदी करण्‍याकरिता बँक ऑफ इंडिया, साहुर शाखेला प्रस्ताव सादर केल्यानंतर बँकेने ९ सप्‍टेंबर २०१० रोजी द्वितीय प्रतवारी करुन गटाला २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. कर्जाचा पहिला हप्‍ता ४ फेब्रुवारी २०१० ला मिळाल्यानंतर त्यातून १० गायी खरेदी करण्‍यात आल्‍या. 
        गाईंच्या उत्तम संगोपनानंतर दररोज दुधाच्या विक्रीतून पैशाची आवक सुरु झाली. शिक्षण जास्त नसले तरी स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून आपल्‍या संसारासाठी हातभार लावण्‍याची धडपड या बचतगटाच्‍या सदस्यांमध्‍ये दिसून येऊ लागली. व्‍यवसायात मिळणारा नफा तोटा यांचा हिशेब ठेवणे, खरेदी-विक्री, उत्‍पादन ही सर्व कामे महिला चोखपणे पार पाडतात. गटातील सर्व महिला सण समारंभ साजरा करण्यासाठी न चुकता एकत्र येतात. यामुळे त्यांच्यातील एकोपाही टिकून आहे. 
          गटाच्‍या माध्‍यमातून स्त्रियांचा व त्‍यांच्‍या कुटुंबाचा संसार फुलू लागल्‍याचे निदर्शनास आल्‍याशिवाय राहत नाही. बचतगटांमुळे स्त्रियांना बँकेचे व्‍यवहार कळू लागले आहेत. तसेच स्त्रियांना समाजात मानाचे स्‍थानही मिळत आहे. या गटाची आदर्श कार्यप्रणाली व भरभराट पाहून इतर गावातील महिला सुद्धा प्रेरीत होत आहेत. 

बुधवार, 8 फ़रवरी 2012

बचतीतून आत्‍मविश्‍वास.. आत्‍मसन्‍मान..

बचत गट महिलांना आत्‍मविश्‍वास आणि आत्‍मसन्‍मान देतात याची जाणीव झाल्‍यानंतर बचत गटातील महिलांनी आपल्या कार्यात सातत्‍य राखले आहे. त्यामुळेच नेटाने प्रयत्‍न करीत वेगळेपणा दाखविणारा वर्धा जिल्‍ह्यातील सेलू जवळील बाभूळगावचा विशाखा स्‍वयंसहायता बचतगट अग्रेसर ठरत आहे.

दुस-या प्रतवारीच्‍या व्‍यवसायात या गटातील महिलांनी बकरी पालनाचा व्यवसाय सुरू केला. ३६ बक-या घेऊन त्यांचे सामुहिकरित्‍या संगोपन तसेच त्‍याची नियमितपणे होणारी वाढ यावर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवले. त्यांची व्‍यवस्थित काळजी घेणे, देखभाल करणे या बाबी सर्व महिला स्वत:हून करू लागल्या. बक-यांची संख्‍या वाढविणे यावर बचत गटाचा भर असून, त्‍याविषयी त्‍यांचे प्रयत्‍न चालू आहेत. त्‍यातच त्‍यांना कधी कधी नैसर्गिक रोगराईला सामोरे जावे लागते, अशावेळी खचून न जाता त्‍या आता परिस्थितीचा सामना करायलाही शिकल्या आहेत.
 

या बचतगटाचा हिशेब व्‍यवस्थित राखला जात आहे. तसेच गटातील सदस्‍यांचा परस्‍परांशी व्‍यवहार सुद्धा चांगला आहे. त्‍यांचे हे संबध आता बचतगटापुरते मर्यादित नसून किंवा फक्‍त आर्थिक बाबींपुरते संकुचित नसून या व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून त्‍या एकमेकांच्‍या कुटुंबाशी जोडल्या गेल्या आहेत. 

एकमेकांच्‍या संकट प्रसंगी गरजेनुसार त्‍या एकमेकांच्‍या पाठीशी उभ्या राहतात. बचत गटातील व्‍यवहाराचा भार हा एका व्‍यक्‍तीवर न टाकता सामुहिकरित्‍या उचलतात. तसेच गटातील कमी शिक्षित महिलेला दुय्यम वागणूक न देता त्‍यांना सर्वांमध्ये सामावून घेतले जाते. बचतगटात वयोवृद्ध महिलेचा मान ठेवणे, आदर करणे ह्या गोष्‍टी त्‍या समजून घेतात व अंमलात आणण्‍याचा प्रयत्‍न करतात. यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये भावनिक नाळ जुळलेली आहे. त्यातून त्या एकमेकांच्‍या सुख-दुःखात सहभागी होत आहेत. बचतगटातील त्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही निर्णय त्या सर्वानुमते घेतात. त्यासाठी दर महिन्‍याला न चुकता त्यांची बैठक होते. या बैठकीस गटातील सर्व महिला उपस्थित राहतात हे ही विशेष. त्‍यांची होणारी बचत ही नियमित असून, ते बचत गटाचा हप्‍ताही नियमित भरतात. तसेच बचत गटातील महिलांना हवे असलेले कर्ज ते सर्वानुमताने निर्णय घेऊन देतात. कधी शिल्‍लक कमी आणि वाटप जास्‍त असेल तर सदस्‍यांच्‍या गरजेनुसार ते कर्जवाटप करीत असतात. कर्ज वाटप झाल्‍यानंतर परतफेडीचे हप्ते सदस्य नियमितपणे भरतात.

त्‍यांचा सामाजिक कार्यात सुद्धा चांगला सहभाग आहे. त्‍या ग्रामस्‍वच्‍छता अभियानात भाग घेतात. गावात होणा-या राष्‍ट्रीयदिनाच्या समारंभात सुद्धा सहभाग नोंदवितात. त्‍यातूनच त्‍यांच्या विचारशक्‍तीत भर पडत आहे. 

महिलांच्‍या अधिकाराचा एक भाग म्‍हणून त्‍यांच्‍यात राजकीय जागृती झालेली आहे. त्‍यामुळेच त्‍या ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये न चुकता मतदान करण्‍यास जातात. 

त्‍यांच्‍या या गटाचे काम बघून यंदा पुरस्‍कारासाठी या गटाची शिफारस झाली आहे हे विशेष. 

बहू व्‍यवसायी उपक्रम शिलता!

सावकाराच्‍या जाचातून सुटका व्‍हावी, महिलांच्‍या गरजा महिलांनाच भागविता याव्‍यात आणि बचतगटातून जमा झालेला पैसा महिलांच्‍याच पर्यायाने कुटुंबासाठी उपयोगी ठरावा या उद्देशाने वर्धा जिल्‍ह्यातील देवळी पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंजखेडा गावात १६ महिलांनी एकत्र येऊन २००३ मध्ये रमाबाई बचतगट स्‍थापन केला.
 

सुरुवातीला त्‍यांनी स्वत:च थोडे थोडे पैसे जमा करुन अंतर्गत व्‍यवहार सुरु केला. त्‍यानंतर काही दिवसांनी त्‍यांना खेळते भांडवल मिळाले. त्‍यामधून त्‍यांनी अंतर्गत कर्ज वाटप करून स्वत:च्‍या गरजा भागविण्यास सुरूवात केली. बचत आणि त्याबरोबर स्वत:च्या गरजा भागविता आल्याने महिलांचा उत्‍साह वाढला. त्यांची काम करण्याची क्षमता पाहून त्‍यांना कपडा व्‍यवसायासाठी २ लक्ष २० हजार रुपये मंजूर झाले. कपडा व्‍यवसायामधून हळूहळू महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. 
कपडा व्यवसाय जरी गटाचा असला तरीही प्रत्यक्ष सर्वच महिला सदस्य त्यासाठी वेळ देऊ शकत नव्हत्या. काही शेतीच्या कामावर जात होत्या. त्यामुळे या महिलांनी मिटींग घेऊन त्यात या विषयावर चर्चा केली. त्या चर्चेतून सर्व महिलांनी वैयक्तिक व्‍यवसाय सुरु करायचा आणि कर्ज बचत गटामधून घ्‍यायचे, असा प्रयोग करण्याचे ठरले. हा विचार सुरुवातीला नवीन होता. बचतगट हा सुद्धा बहुव्‍यवसायी होऊ शकतो का? परंतु मनात आणले तर काहीही शक्य होऊ शकते, हा विचार पक्का करून त्‍या महिलांनी लागलीच तो विचार कृतीमध्‍ये आणला. महिलांनी शेती, किराणा, हॉटेल, स्‍टेशनरी, शिलाई मशीन, पापड इत्‍यादी व्‍यवसायासाठी कर्ज घेतले आणि काय आश्‍चर्य ! अल्पावधीतच हा गट बहुव्‍यवसायी म्‍हणून नावारुपास आला. 
वैयक्तिक व्‍यवसाय असल्‍यामुळे महिला जीव ओतून काम करु लागल्‍या आणि त्‍यांना चांगला नफा मिळू लागला. त्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्‍या सक्षम बनल्‍या. कर्ज व्‍याजासहित गटामध्‍ये परत करु लागल्‍या. 

एका गटामधील हॉटेल चालविणाऱ्या महिलेचे साधारण कुडाकाटीचे घर होते. परंतु या व्‍यवसायामुळे आर्थिक स्थिती सुधारून आज त्‍या महिलेचे दुमजली घर आहे. हे सर्व गटामधील कर्ज मिळाल्‍यामुळे झाले. हे ती महिला अभिमानाने सांगते. त्‍याचप्रमाणे एका महिलेची शेती खूप दिवसापासून पडीक होती, त्‍या महिलेने गटामधून कर्ज घेऊन शेती केली त्यातून त्‍या महिलेलाही चांगले उत्‍पन्‍न मिळाले आहे. 
महिलांना कर्ज घेणे आणि परत करणे हे आपले कर्तव्‍य वाटू लागले. त्‍यामुळे पैसा खेळता राहिला. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या गटाचे यशस्वी होण्याचे रहस्‍य म्‍हणजे त्‍यांच्‍या मासिक बैठका नियमित होतात. तसेच मासिक बचतीसोबतच महिला आपल्‍या गटातील अडीअडचणी भागविण्‍यासही नेहमी तत्‍पर असतात.

गटाच्‍या रहस्‍याबाबत विचारले असता महिलांनी सांगितले की, गटाबद्दल आम्‍हाला खूप विश्‍वास निर्माण झाला आहे. आपली स्‍वतःची बचत आपल्‍या गरजा भागविण्‍याच्‍या कामी येत आहे. त्‍याचप्रमाणे गटामध्‍ये महिलांच्‍या गरजा भागणे महत्‍वाचे असल्‍यामुळे महिलांनी वेगवेगळ्या व्‍यवसायासाठी पैसे घेतले तरी गटप्रमुखांनी किंवा कोणत्‍याही सदस्‍यांनी आडकाठी आणली नाही. 
गटामध्‍ये फक्‍त आर्थिक देवाण-घेवाण होत नाही तर महिलांच्‍या सुखदुःखावर चर्चाही होते. त्‍यासोबत त्‍यापैकी काही सदस्‍य आशा वर्कर असल्‍यामुळे आरोग्‍यविषयक शिबीर घेण्‍यात येते. प्रत्‍येकीच्‍या घरी शौचालय असल्‍यामुळे स्‍वच्‍छता विषयक बाबींबद्दल त्या जागरुक आहेत हे ही दिसून येते. त्‍याचप्रमाणे अंगणवाडीला देण्‍यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची जबाबदारी रमाबाई महिला बचत गटाकडे आहे. गावातील विविध अभियानांमध्ये सुद्धा या गटामधील सदस्यांचा सहभाग आहे.

रमाबाई महिला बचतगट हा फक्‍त बहुव्‍यवसायी गट नसून बहू सामाजिक उपक्रम गटही आहे. त्‍यावरुन असे लक्षात येते की, या गटाच्या महिला धनव्‍यवहारासोबतच मनव्‍यवहार सुद्धा सांभाळतात. त्यामुळेच हा गट यशस्वितेच्‍या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. 

दुधाचा व्‍यवसाय ठरला समृद्धीचा

बचतगट म्हटले की आता नजरेसमोर येते ते शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विशेषत: ग्रामीण भागातील महिलांचे चित्र. या चळवळीच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अनेकांनी आपल्या आयुष्यात कायापालट घडविला आहे. अशाच प्रयत्नांमधून सुरू केलेला दुधाचा व्यवसाय वर्धा जिल्ह्यातील जय अंबिका महिला बचत गटातील सदस्यांसाठी समृद्धीचा ठरला आहे.
 
देवळी पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली गावातील लोकसंख्‍या तशी जेमतेमच. येथील १२ महिलांनी संघटिका छाया मनोज चिखलकार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन जय अंबिका बचतगट स्‍थापन केला. बचत म्हटले की काटकसर ही आलीच. परंतु त्याचा भविष्यातील उपयोग पटल्याने या गटातील सर्व सदस्यांनी दरमहा ५० रु. बचतीपासून श्रीगणेशा केला. त्यातून बचत करणे आणि आपापल्‍या गरजा भागविणे या उद्देशांसह एकमेकींच्या सहकार्याने अडचणींवर मात करण्यासही सुरूवात झाली. 
कालांतराने गटाला बँकेकडून मिळालेल्‍या २५ हजार रूपयांच्या खेळत्‍या भांडवलामधून त्‍यांनी अंतर्गत कर्जवाटप करण्यास सुरूवात केली. त्यातून रक्कम वाढत गेली आणि थोड्यात अवधीत त्‍यांनी खेळत्या भांडवलाची परतफेडही केली. त्यानंतर त्‍यांना म्‍हशीपालन व्‍यवसायासाठी १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्याचा ८० हजार रुपयांचा पहिला हप्ता १८ नोव्‍हेंबर २००९ रोजी मिळाला. त्‍यामधून प्रत्येक सदस्यासाठी एक याप्रमाणे म्‍हशी घेण्यात आल्या. उपलब्ध होणारे दूध या महिला गावातीलच डेअरीवर देतात. त्‍यामुळे उत्पन्नात उत्‍पन्‍नात वाढ झाली आणि त्‍यांनी मिळालेल्‍या कर्जातून ४१ हजार ४०० रुपयांची परतफेड केली आहे.

महिलांमध्ये उत्साह वाढल्याने कामावर सकारात्मक परिणाम झाला. त्यांचे अंतर्गत आर्थिक व्यवहार, मासिक बचत, अडीअडचणी सोडविणे या बाबी सहजतेने आणि सुरळीत सुरू झाल्या. त्यांच्या बैठका नियमित होऊ लागल्या. या गटातील महिला फारशा शिकलेल्‍या नाहीत परंतु गटामध्‍ये एकत्र आल्‍यामुळे चारचौघींमध्‍ये बोलण्‍याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झाले आहे. घरातील सर्व बाबींसाठी केवळ पतीवर अवलंबून न राहता आता त्याही घरखर्चाला मदत करू लागल्या आहेत. कुटुंबाच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नामध्‍ये आता त्‍यांचाही वाटा आहे. हा गट स्‍त्रीशक्‍ती महिला ग्रामसेवा संघामध्‍ये सामील झाला आहे. 
अल्पावधीतच आपल्या मेहनतीच्या जोरावर या बचतगटाच्या सदस्यांनी आपल्या आयुष्याचा कायापालट घडविला आहे. इतरांसाठी हा निश्चितच मार्गदर्शक आहे.

बचतगटामुळे शैक्षणिक समृध्दीचे स्वप्न...!

बचतीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे रहिवाशांच्या विशेषत: ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यास सुरूवात झाली. ज्यांना बचतगट म्हणजे काय किंवा त्याचा नेमका फायदा काय याबद्दल काहीही माहिती नव्हती अशा महिला देखील आज यशाची पायरी चढू लागल्या आहेत.
 

वर्धा ‍जिल्ह्यातील गवंडी गावात असाच एक स्वयंसहाय्यता महिला बचत गट निर्माण झाला. ज्यामधील महिलांना बचत गटाची संकल्पना लक्षात आल्याने आणि त्यांना गटाचे महत्व पटल्याने आज हा गट देखील यशाची पायरी चढत आहे. 

गवंडी गावातील महिलांनी बचतीचे महत्त्व लक्षात आल्यानंतर १ जुलै २००४ रोजी जय दुर्गा माता महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या स्थापने आधी गावामध्ये केवळ एकच बचत गट स्थापन झाला होता. जय दुर्गा माता बचत गटामध्ये प्रथम ८ दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्थान देण्यात आले. त्यानंतर ५ दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए.पी.एल. महिलांचाही समावेश करण्यात आला. गट स्थापन झाल्यानंतर गटाचे खाते भारतीय स्टेट बँक, कारंजा येथे उघडण्यात आले. या बचत गटाबद्दल अध्यक्षा योगिता ताराचंद ढोले अभिमानाने माहिती देतात. 

गटाच्या व्यवस्थित व सुरळीत कारभारासाठी एक नियमावली बनवण्यात आली. ज्यात मासिक सभा, उपस्थिती, दंड, रेकॉर्ड भरणे आदी नियमांचा समावेश करण्यात आला. काही दिवसांतच बचत गटाचे व्यवहार सुरळीत सुरु झाले. पहिल्या सहा महिन्यातच बचत गटाचे पहिले ग्रेडेशन (मूल्यमापन) झाले. महिलांनी ५० रूपये मासिक बचत भरण्याचे ठरविले ज्यामधून महिलांची आर्थिक बचत होऊ लागली.

बँकेने उचल कर्ज म्हणून गटाला २५ हजार रूपये कर्ज दिले. महिलांनी एक बैठक घेऊन या रकमेतून काय व्यवसाय सुरु करता येईल याबाबत विचार विनिमय केला. त्यानंतर मंडप डेकोरेशन हा व्यवसाय करण्याचे सर्वानुमते ठरवून त्यावर अंमलबजावणी करण्याचे ठरले. 

व्यवसाय सुरळीतपणे चालायला सुरुवात झाल्यानंतर बचत गटाने मिळालेल्या कर्जाची रक्कम थोडी-थोडी परत करण्यास सुरुवात केली. पूर्ण कर्ज व्याजासहित परतफेड केल्यानंतर महिलांचा उत्साह अधिकच वाढला. या यशानंतर दारिद्र्य काही दिवसांतच आणखी दोन बचत गट स्थापन झाले. सर्वांनी मंडप डेकोरेशन या व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव बँकेत सादर केला व कर्जाचे प्रकरण मंजूर झाले. बचत गटाला १,३०,००० रू. कर्ज म्हणून मिळाले. त्यासोबत ७०,००० रूपयांचे अनुदान असे या कर्जाचे स्वरुप होते.

गटाला कर्जाचा पहिला टप्पा म्हणून एक लाख रुपये तर दुसरा टप्पा म्हणून ३० हजार रूपये मिळाले. त्यातून गटाच्या नावाचे बॅनर, व्यवसायासाठी लागणाऱ्या काही गोष्टी बचत गटातील महिलांनी आपल्या मेहनतीने व कल्पनेने तयार केल्या. गटातील काही महिला अशिक्षित व काही अल्पशिक्षित असूनही त्या आपल्या जबाबदाऱ्या समजून व्यवस्थित हाताळताना दिसतात, हे या गटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल.

गावात व्यवसायाच्या प्रचार व प्रसारासाठी महिलांनी कंबर कसली व अडचणींवर मात करुन महिला गावकऱ्यांना मार्गदर्शन करु लागल्या. आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुरुषांनीही महिलांना मदत करण्यासाठी बऱ्याच योजनांमध्ये सहभाग घेतला असल्याने त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. बचत गटातील महिलांनी कर्जाचे ५९,००० रूपये परतफेड केले आहेत. उर्वरित रक्कम लवकरात लवकर परत करून स्वावलंबी होण्यासाठी महिला प्रयत्नशील आहेत. या कामी बचतगटाचे प्रेरक आणि संघटक यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.

बचत गटातील महिलांच्या अंगी आत्मविश्वास, चिकाटी व जबाबदारी हे गुण दिसू लागले आहेत. आत्मविश्वासाच्या जोरावर अल्पशिक्षित महिला देखील आपल्या मुला-मुलींना सी.ए., एम.बी.ए., डॉक्टर, इंजिनियर, वकील बनविण्याचे धाडस करु पाहत आहे. 

बचतगटाचे शिधा वाटप दुकान

महिलांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम बनवण्‍यात बचत गटाच्‍या सहकार आणि संघटन याचा फायदा होतो. याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. महिलांचे बचतगट आता चाकोरीबाहेर जाऊन व्यवसाय करू लागले असून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील खर्डा येथील आदिवासी रोजगार हमी महिला बचत गटाने गावात शिधा वाटप दुकान तसेच केरोसीन विक्री सुरू करून आदर्श निर्माण केला आहे. 
 

या गटाच्या कामामुळे रॉकेल टंचाईचे संकट टाळण्यात यश येत असून शिधापत्रिका धारकांना हक्‍काचे धान्‍य प्राप्‍त होत आहे.

देवळी पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले बोपापूर वाणी जवळ खर्डा हे गाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्‍या १ हजार १२७ असून घर संख्‍या २६० आहे. बचतगटाविषयी राज्यभर जागृती झाल्यानंतर थोड्या उशिरानेच येथे बचतगटाची सुरूवात झाली. त्यापूर्वी बचतगट आणि त्या माध्यमातून बचत याचा फारसा गंधही येथे नव्हता. सावकाराच्‍या पाशातून मुक्‍तता व्‍हावी आणि महिलांच्‍या गरजा भागवून काही बचत शिल्‍लक राहावी या उद्देशाने त्‍या गावातील १७ महिलांनी एकत्र येऊन बचतगट सुरु केला. बचतगटामध्‍ये १७ पैकी एकूण १० महिला दारिद्र्य रेषेखालील होत्‍या. 

या महिलांना कोणाचेही मार्गदर्शन नसताना त्यांनी स्वत:हून प्राथमिक माहिती मिळविली. एक वर्षामध्‍ये थोडी थोडी मासिक बचत जमा करुन त्यांनी अंतर्गत व्‍यवहार सुरु केला. अंतर्गत कर्जाचा व्‍यवहार करुन पूर्ण परतफेड करण्‍यातही या महिला यशस्‍वी झाल्‍या. ग्रामपंचायतीने स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान आणि रॉकेलच्‍या व्‍यवसायासाठी बचतगटांची निवड करण्याचे जाहीर केल्यानंतर या महिलांनी त्‍यांच्‍या गटाचा फॉर्म भरला.

एप्रिल २००८ पासून त्‍यांच्‍या कार्याला गती मिळाली. २००८ मध्‍ये ग्रेडेशन झाले आणि त्‍याच वर्षी त्‍यांना ५० हजार रूपयांचे खेळते भांडवल मिळाले. त्‍यापैकी १० हजार रुपये अनुदान होते. उरलेले ४० हजार रुपयांची परतफेड केल्यानंतर त्‍यांना २००९ मध्‍ये स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान व केरासीनचे लायसन्स मिळाले.

आदिवासी रोजगार हमी महिला बचतगट यांनी मिळालेल्‍या पैशांमधून रॉकेलचे ड्रम, वजन काटा, माप हे साहित्‍य खरेदी केले. सीताबाई रामाजी कौराती यांच्‍या घरी एक खोली किरायाने घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. या महिलेला गटाच्‍या महिला ४०० रुपये भाड्यापोटी देतात. 

सचोटी आणि प्रामाणिकपणाने मेहनत करून बचत गटातील महिलांनी या संधीचे सोने केले आहे. त्‍यानंतर २०१० मध्‍ये त्‍यांना आणखी २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्‍यातील एक लाख रुपयांचा पहिला टप्‍पा त्‍यांना मिळाला असून त्‍यांनी ४० हजार रुपये परतफेड देखिल केली आहे. बचतीचे महत्त्व पटल्याने छोटीशी सुरूवात झालेल्या बचटगटाचे हे रोपटे आता मोठे झाले आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती करून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा मनोदय सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे.

शनिवार, 21 जनवरी 2012

अल्‍पकाळात निर्माण केली ओळख

अल्‍पकाळात उत्तम प्रगती करणारा गट म्‍हणून वर्धा जिल्ह्याच्या इंझाळा येथील शारदा महिला बचत गटाने आपली ओळख निर्माण करुन दाखविली आहे. 

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा येथे २४ जुलै २००३ रोजी शारदा महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या गटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बचतगटात एकूण १३ सदस्‍य असून त्या सर्व अनुसूचित जातीच्‍या महिला आहेत. 
उपलब्ध आर्थिक बळ, कामाची उपलब्धता, त्याची निकड, उत्पादनाची विक्री या सर्व बाबी विचारात घेऊन या गटाने दुग्‍धव्‍यवसायाची निवड केली. त्‍यासाठी त्‍यांनी २००८ साली बँकेकडून ३ लाख २५ हजार रूपये कर्ज घेतले. त्‍यावर त्‍यांना अनुदान म्‍हणून १ लाख २५ हजार रुपये मिळाले. त्यानुसार त्‍यांची एकूण प्रकल्‍प किंमत ४ लाख ५० हजार रुपये आहे.
 

बचतगटातील व्यवहार हाताळण्यासाठी गटातील सदस्‍यांनी अध्‍यक्ष म्‍हणून उषा खुशाल चापके तसेच सचिव म्‍हणून चंदा बळवंत भसमे यांची निवड केली. या बचतगटातील बँकेचे व्‍यवहार को-ऑपरेटीव्‍ह बँक, हिंगणघाट येथे आहेत. 

या गटाला दुग्‍धव्‍यवसाय करण्‍यासाठी बँकेकडून एप्रिल २००८ मध्‍ये १३ गायी देण्यात आल्या होत्‍या. त्यासाठी बँकेकडून पहिला हप्‍ता म्हणून दोन लाख रूपयांचे कर्ज वितरीत झाले. या गटाने व्‍यवसाय सुरु केल्यानंतर त्यांना सुरूवातीस ४० हजार रुपये उत्‍पन्‍न प्राप्त झाले. तसेच त्‍यांनी बँकेची १ लाख ३० हजार रूपयांची परतफेड केली असून या गटाकडे सद्यस्थितीत मालमत्‍ता स्‍वरुपात ७ गायी आहेत. 

या बचतगटातील सदस्यांना बचतीचे महत्त्व लक्षात आल्याने आणि एकत्रित व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याने सर्व सदस्य अधिकाधिक वेळ देऊन मेहनतीने काम करीत आहेत. यामुळेच अल्‍पकाळात उत्‍तम प्रगती करणारा गट म्‍हणून या गटाने आपली वेगळी ओळख निर्माण करुन दाखविली असून ती इतर गटांनाही प्रेरणा देणारी ठरत आहे. 


महान्‍यूजवरुन साभार 

बचतगटातील महिलांचा सामूहिक शेतीचा आदर्श!


गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

बचतगटाने विकास केल्‍याच्‍या अनेक नोंदी आहेत. त्‍यात विविध व्‍यवसाय करणारेही गट आहेत. परंतु वर्धा जिल्‍ह्यात बचतगटाने, तेही महिला बचतगटाने सामूहिक शेतीचा केलेला प्रयोग निश्चितपणे सर्वांना प्रेरणा देणारा असाच आहे.
 
जिल्ह्यातील देवळीपासून १७ किलोमीटर अंतरावर अंदोरी गाव आहे. या गावाची लोकसंख्‍या २ हजार ७३५ इतकी असून, गावात ५६५ घरे आहेत. या गावातील १० महिलांनी एकत्र येऊन दुर्गामाता महिला बचत गट स्‍थापन केला. संघटक शालिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बचतगटातील प्रत्‍येक महिलेने आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही दरमहा २५ रु. प्रमाणे बचत करण्यास सुरुवात केली. 
या बचतीमधून अंतर्गत कर्ज वाटप करुन व्‍याजासहित रकमेमध्‍ये हळूहळू वाढ होत गेली. त्यातून त्यांनी आपआपल्‍या आर्थिक गरजा आळीपाळीने भागविणे सुरु केले. सर्वांनी सहकार्य केल्याने कर्ज घेण्‍याकरिता त्यांना कोणत्‍याही सावकाराकडे जावे लागले नाही आणि आपल्‍या आर्थिक अडचणींवरही मात करता आली.

या गटाला अंदोरी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेने २० हजार रुपयांचे खेळते भांडवल दिले. याचा उपयोग त्‍यांनी सामूहिक शेतीकरीता केला आणि त्‍याची पूर्ण परतफेड करुन बँकेकडे मोठ्या कर्जाकरीता प्रस्‍ताव दाखल केला. त्‍यानुसार बँकेने त्‍यांना २ लाख ७ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून त्याचे दोन टप्प्यात वाटप केले. 
कर्जाचा उपयोग महिलांनी सामूहिक शेतीसाठी केला. सर्व १० महिला मिळून शेती करू लागल्या. स्‍वतः मेहनत केल्याने उत्पन्नही चांगले आले आणि खर्चही कमी झाला. याद्वारे त्यांनी बँकेची परतफेड पूर्ण केली. अशा प्रकारे दहाही महिलांना रोजगार मिळाला आणि उत्‍पन्‍नातही वाढ झाली. 

गटातील दहाही महिला दरवर्षी किरायाने शेती करतात. सर्व महिला खेड्यातील असल्‍यामुळे सर्वांनाच शेतीचे ज्ञान आहे. आपल्‍या किरायाच्‍या शेतीमध्‍ये जेव्‍हा काम असते त्‍यावेळेला त्‍या दहाही महिला काम करतात आणि काम नसेल तेव्‍हा दुसऱ्यांच्‍या मजूरीकरितासुद्धा जातात. अशा प्रकारे या महिलांचा व्‍यवसाय दरवर्षी सुरळीतपणे सुरू आहे. सदर गटाने दुसऱ्या टप्प्याकरिता बँकेकडे मागणी केली आहे. यावर्षीचा उत्‍पन्‍नाचा पैसा तसेच बँकेचे मिळणारे कर्ज मिळून जास्‍त शेती करण्‍याचा त्यांचा मानस आहे. 

सदर गटाची मासिक सभाही नियमित होते. सभेला दहाही महिला उपस्थित राहतात. शिवाय दर महिन्‍याच्‍या मासिक सभेला संघटक शालिनी पाटील यादेखील उपस्थित राहतात. बचतीमध्ये आता वाढ करून ही जानेवारी २०१२ पासून दरमहा २५ रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आली आहे. सर्व महिला दरमहा नियमित बचत भरतात आणि अंतर्गत कर्ज व्‍यवहार, परतफेड करून गटाची बचत वाढविण्‍यास एकमेकांना प्रोत्‍साहन देतात.

या गटामध्‍ये केवळ आर्थिक व्‍यवहार होत नसून, एकमेकींच्‍या सुखदुःखामध्‍ये ह्या महिला सामील होतात, एकमेकींना सहाय्य करतात हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. हा गट संजीवनी ग्राम सेवा संघ, अंदोरी मध्‍ये सामील झाला आहे. गटातील महिलांचा आत्‍मविश्‍वास वाढला आहे. त्‍यांच्‍यामध्‍ये बोलण्‍याची वृत्ती तसेच धाडस निर्माण झाले आहे. त्‍या स्‍वतः बँकेचे व्‍यवहार करायला शिकल्‍या आहेत. कुटुंबाच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नामध्‍ये आता त्‍यांचाही मोठा वाटा आहे. त्‍यांची बचत असल्‍यामुळे त्‍या कधीही अंतर्गत कर्जाच्‍या माध्‍यमातून आपल्‍या आर्थिक अडीअडचणी सोडविण्‍यासाठी सक्षम बनल्‍या आहेत.

या गटातील महिला दारुबंदीच्‍या महिला मंडळामध्‍ये सामील झाल्या आहेत. तसेच तंटामुक्‍त ग्राम मंडळ, ग्राम स्‍वच्‍छता अभियान यामध्‍ये सुद्धा गटातील महिलांची मोलाची कामगिरी आहे. दुर्गामाता महिला बचत गटाला प्रगतीचा मार्ग सापडला असून अंदोरी या गावामध्‍ये १५ गटांपैकी हा गट आदर्श गट म्‍हणून ओळखला जात आहे.


महान्‍यूजवरुन साभार 

मंगलवार, 10 जनवरी 2012

शेतात उमलले समृध्‍दीचे फूल !


लहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे. 

 श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. 

झाडांची लागवड ऑगस्‍ट २०११ मध्ये करण्यात आली. मात्र फुलांच्या उत्पादनाला २ नोव्हेंबर २०११ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत २७ हजार १६० उत्पादित फुलांची विक्री करण्यात आली आहे. या विक्रीपासून श्री. अवचट यांना १ लक्ष ५१ हजार ९२ रुपये एवढी रक्कम मिळाली. आतापर्यंत फुलाच्या उत्पादनावर ६२ हजार रुपये खर्च झाला असून निव्वळ नफा ८९ हजार ९२ रुपये झाला आहे. येत्या काळात प्रत्येक महिन्याला सरासरी ३० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित असून प्रत्येक फूल ३ रुपये प्रमाणे विकल्यास ९० हजार रुपये प्रत्यक्षात उत्पन्न होऊ शकते.

एका वर्षाचा ताळमेळ सांगताना अवचट म्हणाले, १० लक्ष ८० हजार रुपये फुलांची विक्री होणार असून ४ लक्ष ५६ हजार रुपये खर्च वजा जाता ६ लक्ष २४ हजार रुपये नफा मिळू शकतो. यावेळी त्यांनी स्वत:चे शेड्यूल, ड्रेनचीग व किटक नाशके व बुरशी नाशक फवारणीची महिती सांगितली.

या फुलांची हैद्राबाद व बंगलुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या बाजारपेठांत फुले पोहचविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मात्र फुल उत्पादन मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यास वाहतुकीचा खर्च अल्प प्रमाणात येऊ शकेल. कदाचित फुलांचे व्यापारी सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुले खरेदी करु शकतील. त्यादृष्टीने आता या भागातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

नागपूर बाजारपेठेत इव्हेंट, मॉल व सणासुदीच्या दिवसाचे महत्त्व ओळखून फुलांची विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला फाटा देऊन नाविण्यपूर्ण शेती करुन आर्थिक समृध्दी साधावी, अशी वेळ आता आली आहे.
मिलिंद आवळे




महान्‍यूज वरुन साभार

शुक्रवार, 6 जनवरी 2012

''अन्नपूर्णा'' महिला स्वयंम सहाय्यता बचत गट

ग्रामीण क्षेत्रातील महिलानी स्वत:ला मर्यादित क्षेत्रापुरते न ठेवता, महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून, कुटुंबाचीही जबाबदारी स्वीकारलेली पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आष्टी पंचायत समिती अंतर्गत येणा-या माणिकवाडा ता. आष्टी जि. वर्धा येथील अन्नपूर्णा महिला स्वयंम सहाय्यता बचत गटाची कामगिरी अशाच प्रकारचे महिलाचे यश अधोरेखीत करणारी आहे.
 
अन्‍नपूर्णा बचत गटाची स्थापना दिनांक 3 ऑगस्‍ट 2005 ला करण्यात आली. ग्रामीण महिलांनी एकत्र येवून 12 सदस्यांचा गट करण्याचे ठरविले. सर्वानुमते सौ. पुष्पा दशरथ घागरे यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्‍हणून सौ.बेबी रामराव गंधळे यांची निवड केली. बँक ऑफ इंडिया साहुर शाखे कडून गटाची प्रथम प्रतवारी दिनांक 8 नोव्‍हेंबर 2007 रोजी झाली आणि रु 25000/- फिरतानिधी गटाअंतर्गत कर्ज वाटपा करिता उपलब्ध करुन दिला. कालांतराने महिलांना गटाच्या कर्जातुन प्रगती साधण्याचे महत्‍त्व कळु लागल्यावर त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले.दुग्ध व्यवसायाकरिता तीस दुधाळू संकरित गायी खरेदी करण्या साठी बँक ऑफ इंडिया साहूर शाखेने दिनांक 9 सप्‍टेंबर 2010 ला व्दितीय प्रतवारी करुन गटाला दुग्ध व्यवसायाकरिता एकूण दोन लाख रुपये कर्ज मंजूर केले

बचतगटाला कर्जाचा पहिला टप्पा दिनांक 4 फेब्रुवारी 2011 ला 10 संकरित गायी खरेदी करण्याकरिता देण्यात आला. संकरित गायीचे संगोपन महिला उत्तम रित्या करु लागल्‍या. दररोज दुध विक्रीच्या माध्यमातून पैशाची आवक सुरु झाली. जास्त शिक्षण नसले तरी स्व:ताच्या पायावर उभे राहून, आपल्या संसारासाठी हातभार लावण्याची धावपळ या गटाच्या सदस्यामध्ये दिसुन येवू लागली

दरमहा 5 तारखेला गटाची मसिक बैठक होते. व्यवसायात मिळणारा नफा तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी विक्री उत्पादन ही सर्व कामे महिला चोखपणे पार पाडतात. बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या जमाखर्चाचे सर्व हिशोब या विषयी चर्चा केली जाते. गटातील सर्व महिला एकत्र येवून सण समारंभ साजरा करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा टिकून आहे.

गावात ग्रामसफाई, वृक्षारोपण तसेच व्यसनमुक्ती ,रांगोळी स्पर्धा, इत्यादी कार्यक्रम अन्नपुर्णा गटात राबविले जातात. बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. त्या ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या मदतीने स्त्रियांचा व त्यांच्या कुटुंबाचा संसार फुलू लागल्‍याचे निदर्शनास आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना बँकेचे व्यवहार सुध्दा कळू लागले तसेच स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या आधारावर प्राप्त केले आहे. या आदर्श गटाची कार्यप्रणाली व भरभराट पाहुन इतर गावातील ग्रामीण भागातील स्त्रियासुध्दा आशेचे किरण म्हणुन हया आदर्शाने प्रेरीत झाल्या आहेत.


महान्‍यूजवरुन साभार

बुधवार, 4 जनवरी 2012

बहु सामाजिक उपक्रम गट !


देवळी पासून २५ किलोमीटर असलेले गुंजखेड हे गाव, या गावामध्ये बचत गटाचा लवलेश नसतानासुध्दा ग्रामपंचायतच्या मदतीने १५ महिला एकत्र येवून बचत गट स्थापन केला. बचत गटाचे नाव रमाबाई महिला बचत गट ठेवण्यात आले. बचत गट सुरु करण्यामागचा उद्देश विचारला असता सावकाराच्या जाचातून सुटका व्हावी व महिलांच्या गरजा महिलांनीच भागवाव्यात व बचत गटातून जमा झालेला पैसा महिलांच्याच कामात यावा असे त्यांनी सांगितले.

सुरूवातीला त्यांनी पैसे जमा करुन अंतर्गत व्यवहार सुरु केला. त्यानंतर त्यांना खेळते भांडवल मिळाले. खेळत्या भांडवल मधून त्यांनी अंतर्गत कर्ज वाटप केले व त्या माध्यमातून महिलांच्या गरजा भागत होत्या. त्यानंतर त्यांना कपडा व्यवसायासाठी २ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. त्यामधून त्यांनी कपडा व्यवसाय सुरु केला. कपडा व्यवसायामधून त्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत नव्हती. 

मग सर्व महिलांनी मिळून चर्चा केली की कपडा व्यवसाय हा आपण सर्वजणी मिळून करतो त्यापैकी काही महिला बचतगटामधे काम करतात तर काही महिला शेतीच्या कामावर जातात.त्यामुळे जर असे केले तर आपण सर्व महिलांनी वैयक्तिक व्यवसाय करायचा व कर्ज गटामधून घ्यायचे हा विचार सुरूवातीला नवीन होता ‍की गट हा सुध्दा बहुव्यवसायी होऊ शकतो.सर्व महिलांनी ठरवून शेती, किराणा, हॉटेल, स्टेशनरी, शिलाई मशीन, पापड उद्योग इत्यादी व्यवसायासाठी कर्ज घेतले. हा गट बहुव्यवसायी म्हणून नावारुपास आला. वैयक्तिक व्यवसाय असल्यामुळे महिला जीव ओतून काम करु लागल्या व त्यांना चांगला नफा मिळू लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्या सक्षम बनल्या. व कर्ज व्याजासहित गटामध्ये परत करु लागल्या.

एका गटामधील हॉटेल चालविण्यार्‍या महिलेचे घर सर्वसाधारण होते. परंतु या व्यवसायामुळे त्या महिलेचे आज दुमजली घर आहे व हे सर्व गटामधील कर्ज मिळाल्यामुळे झाले हे ती महिला अभिमानाने सांगते. त्याचप्रमाणे एका महिलेची शेती खूप दिवसांपासून पडिक होती. त्या महिलेने गटामधून कर्ज घेऊन शेती केली व आज त्या महिलेला चांगले उत्पन्न मिळत आहे.

महिलांना कर्ज देणे व परत करणे हे आपले कर्तव्य वाटू लागले. त्यामुळे पैसा खेळता राहिला. त्याचप्रमाणे त्यांच्या यशस्वी गटाचे रहस्य म्हणजे त्यांच्या मासिक बैठका वेळेवर होत आहेत तसेच मासिक बचतीसोबतच महिला आपल्या गटातील अडीअडचणी भागविण्यास नेहमी तत्पर असतात. बचत आपल्या गरजा भागविण्यात कामात येत आहे. त्याचप्रमाणे गटामध्ये महिलांच्या गरजा भागणे महत्वाचे असल्यामुळे महिलांनी वेगवेगळया व्यवसायासाठी पैसे घेतले तरी गटप्रमुखांनी किंवा कोणत्याही सदस्यांनी आडकाठी आणली नाही.

गटामध्ये फक्त आर्थिक देवाणघेवाण होत नाही तर महिलांच्या सु:ख दु:खावरही चर्चा करण्यात येते. त्यासोबत आरोग्यविषयक शिबीर घेण्यात येते त्याचप्रमाणे अंगणवाडीला देण्यात येणारा पूरक पोषक आहार रमाबाई महिला बचत गटाकडे आहे.स्वच्छता अभियान, तंटामुक्त ग्राम अभियानामध्ये सुध्दा गटामधील सदस्यांचा सहभाग आहे.

रमाबाई महिला बचत गट हा फक्त बहुव्यवसायी गट नसून बहु सामाजिक उपक्रम गट आहे. त्यामुळे त्यावरुन असे लक्षात येते की, रमाबाई महिला बचत गट हा महिला धनव्यवहारासोबतच मनव्यवहार सुध्दा करतात म्हणून हा गट यशस्वी दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

महान्‍यूजवरुन साभार