बुधवार, 28 सितंबर 2011

गृहोद्योगातून भरभराट


बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात ही उक्ती अतिशय सार्थ आहे. याचा प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील केळझर इथल्या सावली स्वयंसहायता महिला बचत गटाच्या कामात येते. सेलू तालुक्यातील केळझर हे गाव इथल्या पांडवकालीन मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. या गावात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या १२ जणींनी एकत्र येवून ऑगस्ट २००७ मध्ये आपल्या एकीने यशाचा नवा अध्याय लिहिला.

घरात लागणा-या शेवया-पापड्या, सरगुंडे आदींचे उत्पादन करणारा हा गट जिल्ह्यात प्रसिध्द आहे. तो त्यांच्या नाविन्यपूर्ण मार्केटींगसाठी जिल्ह्यात इतर बचतगट अशी उत्पादने विकत आहेत. मात्र सावली स्वयंसहायता गटाच्या महिला वैशिष्टपूर्ण पध्दतीने, आकर्षकपणाने स्टॉल सजवणे, गाडी लावली तर ती गाडी लक्षवेधी ठरेल अशी मांडणे अशा पध्दतीने विक्री करतात.



बँकेचे ३५ हजारांचे कर्ज घेऊन त्याची पूर्ण फेड केलेल्या या गटाकडे ३५ हजारांचे खेळते भांडवल आज आहे. आपल्याला स्थैर्य आलं म्हणजे संपले असे न करता या गटातील महिलांनी गावात इतर महिलांना प्रेरित करुन इतर गटांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला आहे.

सेलू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निमजे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीने त्यांनी आपल्या आयुष्यातून गरिबीचा अंधार कायमचा दूर केला आहे. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरक ठरले आहे.



  •                                                                                                                                                             प्रशांत दैठणकर





  • मंगलवार, 27 सितंबर 2011

    वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे




    वर्धा जिल्ह्यात आष्टीला लागून पेठ अहमदपूर हे एक छोटेसे गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या २९८२ आहे. गावामध्ये एकूण ५ गटाची स्थापना माविमच्या माध्यमातून झालेली आहे. त्यापैकी तेजस्विनी योजनेतंर्गत निर्मल गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. गटामध्ये एकूण १८ सभासद आहे. गटातील व्यवहार पाहून बँकेने गटाला रुपये १५००० चे कर्ज दिले. 

    कर्जाचा उपयोग महिलांनी घरगुती, शेतीच्या अडचणीकरिता केला. बँकेची ठरलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली. त्यामुळे गटाला बँकेनी दुसरे कर्ज ५०००० मंजूर केले. या रक्कमेतून गटाला कोणता उद्योग करायचा सुचत नव्हते. तेव्हा सहयोगिनीच्या मार्गदर्शनाने गटाने नर्सरी उद्योग करण्याचे ठरविले. त्याकरिता जागेची आवश्यकता होती. गटातील एका सभासदाकडे मोठा प्लॉट रिकामा होता. त्या ठिकाणी नर्सरी व्यवसाय होऊ शकतो असे लक्षात आल्यानंतर गटातील सभासद शांता धांदे या महिलेकडून नर्सरी उद्योग करण्याकरिता जागा वापरण्यास मंजूरी घेऊन गटाने नर्सरी उद्योग सुरु केला. 

    गटातील सर्व महिला मिळून स्वत:च्या प्रयत्नाने वनविभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांच्या नर्सरीमधील रोपांची चांगल्या प्रकारे वाढ झाली. नर्सरीमधील रोपांची रुपये २५००० ला विक्री करुन त्यांना रुपये १०००० चा नफा मिळाला. पुढे हाच उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु करण्याचा मानस बचतगटाचा आहे. त्याकरिता गटाने बँकेकडे प्रस्ताव सादर करुन कर्ज मंजूर करुन घेतलेले आहे.

    गटाने नर्सरी उद्योग निवडून पर्यावरणाच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. संत तुकारामांच्या ओवीनुसार वृक्षांना सुध्दा आप्तस्वकीयांप्रमाणे जीवनात स्थान दिलेले आहे.

    बिछायत व्यवसायाच्या माध्यमातून शिवाणी महिला बचत गटाची भरारी



    ग्रामीण व शहरी लोकांकडे होणा-या समारंभात किंवा किरकोळ स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आकर्षण बिछायतीच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाच्या कार्यक्रमात बिछायतीचे साहित्य महत्वाची भूमिका पार पडत असते. शिवाणी महिला बचत गटाने चालविलेले बिछायत केंद्र परिसरात उत्तम सेवा देणारी ठरत असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    देवळी तालुक्यातील पुलगाव शहरालगत गुंजखेडा येथील वल्लभनगर येथे शिवाणी महिला बचत गट १ फेब्रुवारी २००८ रोजी स्थापन झाला. या बचतगटाने परिश्रमपूर्वक उत्तम कामगिरी केल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेने दखल घेवून बिछायतीचे साहित्य खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यासाठी या महिला बचत गटाला १ लाख २० रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान केली.


    या बचत गटाविषयी माहिती जाणून घेतांना शिवाणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिला कडू म्हणाल्या की, गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये बचतगटाविषयी मार्गदर्शन तत्कालीन ग्रामसेवक यांनी दिली. या बैठकीला मी आणि गटातील महिला आग्रहपूर्वक उपस्थित होतो. शंका कुशंका दूर झाल्यानंतर आम्ही महिला ३० जानेवारी २००८ रोजी माझ्याच घरी बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीमध्ये बचतगटाचे नाव बचतीसाठी रकमेचे निर्धारण आणि भविष्यात करावयाचा व्यवसाय याविषयी चर्चा करुन बचत गटाला शिवाणी असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. मासिक ३० रुपये बचत करुन बिछायतीचा व्यवसाय सर्वानुमते निवडण्यात आला.

    बचत गटातील प्रत्येक महिलेने ३० रुपये बचत करुन १२ महिलेची एकत्रीत रक्कम गोळा केल्यानंतर लगेच तिस-या महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचत गटाचे खाते उघडण्यात आले. प्रत्येक महिन्याला ३६० रुपये प्रामाणिकपणे भरण्यात येत होते. वर्षाला ४ हजार ३२० रुपये बँकेत जमा झाले. दुस-या वर्षाला मागील रकमेची जमा मिळून बचत गटाच्या खात्यावर ८ हजार ६४० रुपये जमा झाले. बचत गटातील महिला गरीब असल्यामुळे पदोपदी त्यांचे कुटूंबामध्ये पैशाची गरज भासत असते. ही गरज गटात जमा झालेल्या रकमेतून करण्यात येत असते. या बचतीच्या रकमेतून काही महिलांना आपला स्वत:चा वेगळा व्यवसाय उभारला तर काही महिलांनी कुटुंबातील सदस्याच्या पाठ्य पुस्तकासाठी तसेच औषधोपचारासाठी खर्च केला आहे.

    बचत गटातील सदस्य अनुसया गवळी यांनी फेब्रुवारी २०१० रोजी ६ हजार रुपये अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजाने जुन्या ऑटोच्या रिपेअरींगसाठी घेतले. सदर्हू ऑटो त्याचे पती चालवित असून ऑटो पासून सर्व खर्च वजा जाता २०० रुपये प्रत्येक दिवसाला कमाई होते. आता पर्यंत ४ हजाराची परतफेड केली असून व्याज सुध्दा त्यांनी भरले आहे. 

    वनिता चुबलवार या सदस्या महिलेने गटातून ८ हजाराचे अंतर्गत कर्ज डिसेंबर २००९ रोजी धान्य व्यवसायासाठी घेतले होते. बचत गटातील प्रत्येक महिला त्यांच्या धान्य दुकानातून धान्य व इतर वस्तू खरेदी करतात तसेच हा व्यवसाय सुध्दा चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळे त्यांचे कुटूंब या व्यवसायावर उपजिवीका चालवित आहे. उचल रकमेची सर्व रक्कम परतफेड केली असून अजून दुकानामध्ये ५१ हजाराचा धान्य साठा उपलब्ध आहे.

    सुशिला कडू या गटातील महिला सदस्यांनी ५ हजाराचे अंतर्गत कर्ज घेतले होते. त्यांनी महिला व पुरुषासाठी ब्युटीपार्लरचे दुकान उघडले. हे दुकान चांगले चालत असून त्यांचा मुलगा व मुलगी हे दुकान सांभाळतात. खर्च वजा जाता त्यांना ४ हजार रुपये सरासरी रक्कम प्राप्त होते. त्यांनी बचत गटाकडून घेतलेली कर्जाऊ संपूर्ण रक्कम दोन टक्के व्याजासह परत केली आहे.

    वर्षा सालंकार यांनी जून ११ मध्ये शेतीसाठी व साधना धांगडे यांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी ३ हजार रुपये कर्ज घेतले आहे. व्याजासह अद्यापही परतफेड सुरु आहे. बचतगटाच्या सदस्यांची अंतर्गत उलाढाल अद्यापही सुरु आहे.

    शिवाणी महिला बचत गटाने आगस्ट २०१० मध्ये बिछायत केंद्र उघडण्याचा प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र पुलगांव येथे सादर केला. बँकेनी जानेवारी २०११ ला १ लाख १० हजाराचे कर्ज दिले. लग्न समारंभ, वाढदिवस किंवा अन्य समारंभासाठी बिछायात केंद्रातील साहित्याचा उपयोग होत असल्यामुळे या व्यवसायाला परीसरात झळाळी प्राप्त झाली त्यामुळे आतापर्यंत ३३ हजार ६०० रुपयाची परतफेड बँकेला केलेली आहे. तसेच बँकेच्या खात्यामध्ये महिला बचतगटाचे १६ हजार रुपये शिल्लक असून परतफेडीमुळे बँकेत बचत गटाचा लौकीक वाढलेला आहे. अद्याप १ लाखाचे कर्ज बँकेकडून मिळावयाचे असून सदर्हू व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस अध्यक्ष सुशिला कडू व सचिव अनुसया गवळी यांनी बोलून दाखविला.

    या बचत गटाला प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहयोगीका शेख बहिदा यांचा मोलाचा वाटा असून उन्नतीच्या पथावर चालून शिवाणी महिला बचत गटाने उंच भरारी मारली आहे एवढे मात्र निश्चितच.

  • मिलींद आवळे 

  • गुरुवार, 22 सितंबर 2011

    बचतगटाचा दालमिल उद्योग

                 वर्धा जिल्हयातील कन्नमवार ग्राम हे गाव कारंजा तालुक्यातील कारंजा-वर्धा मार्गावर कारंजा पासून १८ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाची लोकसंख्या २००० च्या जवळपास आहे. गावामध्ये एकूण ११ बचत गट आहे, त्यापैकी ६ बचत गट माविमव्दारे स्थापन केलेले आहेत. त्यापैकी बहुउद्देशिय बचत गटाची स्थापना केलेली आहे. त्यापैकी ६ बचत गट माविमव्दारे स्थापन केलेले आहे.

    बहुउद्देशिय बचत गटाची स्थापना दिनांक ५ मे २००६ रोजी झाली. गटामध्ये १८ सभासद आहेत. गटातील सभासदांची मासिक बचत रुपये ३० असुन नियमित बचत करतात. गटाची प्रगती पाहुन गटातील सभासदांना उद्योजकता जाणिव जागृती प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामुळे गटातील सभासदांमध्ये उद्योग करण्याची आवड निर्माण झाली. 





                     गटातील सभासदाने दाल मिल व्यवसाय करण्याचे ठरविले. गटातील बहुतांश सभासद दारिद्र्य रेषेखालील असल्यामुळे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले. गटाचे ग्रेडेशन होऊन गटाला रुपये २५००० कर्ज मिळाले. त्यातून गटाने ५० पोते ढेप खरेदी करुन गावात विकली. त्यापासून गटाला रुपये २००० नफा झाला.

                   बचतगटाने प्रथम कर्जाची परतफेड नियमित केल्यामुळे गटाला दुसरे कर्ज रुपये २००००० दालमिल व्यवसायाकरिता मंजूर झाले. त्यातून गटाला मिनी दालमिल खरेदी केलेली आहे. गटाला प्रती क्विंटल मागे रुपये २०० नफा मिळत आहे. या वर्षामध्ये गटानी तूर खरेदी करुन तुरदाळ विकण्याचा व्यवसाय करण्याचे ठरविले आहे. माविममुळे बचतगटाची प्रगती झाली आहे.

                                                                                               00000000

    बचत गटाने दिली साथ : संसाराला लागला हात




                       मी सौ. छाया प्रमोद थुल, हिन्दनगर, वर्धा येथील तपस्वी स्वंय सहाय्यता बचत गटाची सचिव म्हणून कार्य करीत आहे. गोडेगाव या छोट्याश्या गावात वास्तव्यास असणारे माझे कुटुंब, माझे वडील सांभाजी ढाले, आमची परिस्थिती फार गरीबीची होती. आमच्या कुटुंबात एकूण आठ सभासद आहेत, त्यात दोन भाऊ, चार बहिणी, मी तीन नंबरची मुलगी आहे.

                    माझे लग्न हिंगणघाट या गावी प्रमोद थुल यांच्याशी झाले. माझ्या सासरची परिस्थिती फार हलाखीची होती. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासुरवास सुरु झाला. सोबत पतीही छळ करु लागले. माहेरचे स्वातंत्र्य हे काही दिवसातच संपले असे जाणवू लागले. घरातील मंडळी बाहेर कुठेही जाण्यास मनाई करायची, पती दारु पिऊन मला शिवीगाळ करायचे, मारायचे, टोचून बोलायचे, वाद करायचे ही रोजची दिनचर्या झाली होती. त्यामुळे माझी मानसिकता ढासळायला लागली. मला एक मुलगी आहे. मुलगी चार वर्षाची होईपर्यंत बराच त्रास सहन करावा लागला. परंतु आता आपल्या मुलीला भरपूर शिकवायचे आहे, हे माझे स्वप्न होते. त्या करीता पतीची साथ असणे गरजेचे होते. परंतु आपणच काही तरी काम करावे, म्हणून मी मुलीला घेवून हिंगणघाट वरुन वर्धा हिंदनगर येथे राहण्यास आली. मनात एक जिद्द होती की,आपल्या मुलीला चांगले शिक्षण द्यायचे.

                     एक दिवस मी माझ्या शेजारी राहणारी पवित्रा पाटील यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घरी ब-याच महिला एकत्रित आलेल्या होत्या. माविमच्या सहयोगीनी महिलांना गटाची संकल्पना व माहिती सांगत होत्या आणि मी ते लक्ष देवून ऐकत होते. नंतर मी सहयोगीनीला विचारले की, मला सुध्दा गटात येण्याची इच्छा आहे. सहयोगीनीताई यांनी मला लगेच गटात समाविष्ट केले व गटातील सचिव या पदाची जबाबदारी मला देण्यात आली.

               नविन काही तरी शिकायला मिळणार ह्याच उद्देशाने मी होकार दिला व पुढाकार घेण्यास तयार झाले. माविम च्या सहयोगीनी यांच्या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्यवहार उत्तमरित्या शिकली. यातून माझा आत्मविश्वास वाढला. गटाचे हिशेब बघणे व इतरही कामे करु लागली.

               मी लग्नापूर्वी शिवणकाम कोर्स केलेला होता. शिवणकाम मला चांगल्या प्रकारे येत होते. मी गटाकडून कमी व्याज दराने कर्ज घेतले व शिलाई मशिन खरेदी करुन शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगल्या प्रकारे सुरु आहे. उद्योगामुळे मला पैसे मिळू लागले आणि घरच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली.

                 त्यामुळे माझे पती व इतर सासरतील मंडळीचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे. माझ्या मुलीला चांगल्या शाळेत पाठवू शकले. त्याच प्रमाणे घर खर्चात हातभार लावीत आहे. बचतगटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग भरभराटीस आला. त्यामुळे माविम व सहयोगिनींचे मनापासून आभार मानते. बचतगटाने दाखविलेले आशेचे किरण, कष्टानेच वळविले माझे जीवन.

                                                                                                                0000000000

    शनिवार, 17 सितंबर 2011

    बचतगटातील पाच महिलांचे सक्षमीकरण




    वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गुंजरखेडा येथील रमाबाई महिला बचत गटांनी आपला आत्मविश्वास दृढ करुन श्रम शक्तीला सर्वोत्तम प्राधान्य दिले. त्यामुळे या बचत गटातील पाच महिलांनी अंतर्गत कर्ज घेवून जीवनमान उंचाविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून सक्षमिकरणाकडे वाटचाल करीत आहे.

    गुंजरखेडा हे गाव पुलगाव ते आर्वी या रस्त्यावर असून, या गावाची लोकसंख्या दोन हजाराचया वर आहे. येथील दारिद्र्य रेषेखालील १५ महिला एकत येऊन त्यांनी २२ जानेवारी २००३ रोजी रमाबाई महिला बचत गटाची स्थापना केली. तत्पूर्वी या गटाची पहिली बैठक २५ डिसेंबर २००२ रोजी संपन्न झाली होती त्या बैठकीत बचत गटाच्या नावा सोबतच अनेक ठराव घेण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रतिभा अनिल इंगळे व सचिव म्हणून वनिता गौतम सिंगनापूरे यांच्या नावाची निवड करण्यात आली.

    बचत गटाची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर अध्यक्ष श्रीमती इंगळे म्हणाल्या की रमाबाई बचत गटातील सर्वाधिक महिला ह्या दारिद्र रेषेखालील आहेत. पुरेसे शिक्षण नसलेल्या बचत गटाच्या महिलांमध्ये जबरदस्त असा आत्मविश्वास आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे रु. ३० मासीक वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. रमाबाई महिला बचत गटाच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचतीचे खाते उघडण्यात आले. दोन वर्षात १० हजार ८०० रुपये जमा झाली. या रकमेतून सदस्यांना अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजावर देण्यात आले. तसेच कर्जाऊ रकमेचे नियमित परतफेड बचत खात्यात जमा होत असल्याने बचत गटाची प्रामाणिकता पाहून १२ जानेवारी २००५ मध्ये महाराष्ट्र बँकेने १५ हजाराचे कर्ज गटाच्या अंतर्गत उलाढाली साठी मंजूर केले.

    या बचत गटातील पाच महिलांनी स्वत:चा व्यवसाय उभारला त्यामध्ये नंदा ठाकरे या महिलेनी दोन हजार रुपये कर्ज घेवून बांगड्या व स्टेशनरीचा फिरते व्यवसाय प्रारंभ केला. या व्यवसायातून त्यांना महिन्याला किमान ३ हजार रुपये नफा होत आहे. 

    मंजू शेंडे या महिलेनी ५ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी टेलरींगचा व्यवसाय स्व:ताच्या घरी सुरु केले. या व्यवसायाला परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना सुध्दा महिण्याला ४ हजार रुपये शुध्द लाभ मिळत आहे. 

    शालू वडकर या महिलेचा गावातच हॉटेलच्या व्यवसायासाठी ५ हजार रुपये कर्ज दिले. गावातील मुख्य रस्त्यालगत एकच हॉटेल असल्यामुळे व्यवसायात प्रगती सुरुच असून सर्व खर्च वजा जाता किमान ६ हजार रुपये निव्वळ नफा कमवित आहे. 

    मेंढे या महिलेनी लेडीज गारमेंटचा व्यवसाय स्विकारुन प्रगती साधली आहे. त्यांना सुध्दा महिन्याला ३ हजार ५०० रुपये खर्च वजा जाता शुध्द लाभ मिळत आहे. 

    या बचत गटाला आंगणवाडीचा आहार पुरविण्याची निविदा मंजूर झाली. त्यांचे संचलन वर्षा खडसे यांना बचत गटाच्या सदस्याला देण्यात आल्यामुळे त्यांना सुध्दा महिन्याकाठी ९०० रुपये मिळत आहे.

    छाया खोब्रागडे या महिलेने एक हजार रुपये कर्ज घेतले त्या रकमेतून एक म्हैस घेवून दुग्ध व्यवसाय करीत आहेत.त्यांचा व्यवसाय प्रगती पथावर असल्यामुळे आता त्यांच्याकडे ४ म्हशी झाल्या आहेत. त्यांना सुध्दा सर्व खर्च वजा जाता किमान ७ हजार रुपये नफा मिळत आहे.

    बचत गटाचा मूळ व्यवसाय साड्या विक्रीचा होता. प्रत्येक महिलेला कर्जाउ रक्कम दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. कर्जाऊ घेतलेली रक्कम टप्प्याटप्प्याने व्याजासह बचत गटाला परतफेड केली आहे..

    साडयाच्या व्यवसायात वंदना बोरकर, मंगला इंगळे, अंजिता कळमकर, वनिता सिंगणापुर, प्रतिमा इंगळे व मंजू शेंडे कार्य करत आहेत. गटातील महिला त्यांच्या परिसरातील गावोगावी जाऊन घर भेटीतून साड्यांची विक्री करीत असतात. त्यांचे परिश्रम वाया जात नाही. उलट त्यांच्या साड्याच्या विक्रीतवाढ सुध्दा होत असते. महिन्याला साड्याच्या विक्रीपासून ६० हजार मिळतात. विक्रीवर २० टक्के कमीशन मिळत असल्याने बचतगटातील ६ महिलांना किमान २ हजार रुपये मिळत आहे असे अध्यक्ष श्रीमती इंगळे यांनी सांगितले.

    बचत गटातील महिला त्यांच्या व्यवसाला पारंगत होत असून, त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला त्यांनी वाहून घेतले आहे.

    अंतर्गत कर्जासाठी बचत गटाने घेतलेली १५ हजार रकमेचा बँकेला परतफेड केल्यानंतर ८ जानेवारी २००७ रोजी पहिला हप्ता ८३,६६२ रुपयाचा, दुसरा हप्ता १६ एप्रिल २००७ रोजी ८४८५ रुपयाचा व तिसरा हप्ता २६ डिसेंबर २०१० रोजी ४८ हजार रुपये असे एकूण २ लाख २० हजार रुपये बँकेने व्यवसायासाठी दिले असून, ४ हजार रुपयाचा विमा सुध्दा बँकेने काढला आहे.

    कापड व्यवसायासाठी मिळालेल्या रकमेतून महिलांसाठी साड्या, लुगडी, ड्रेस मटेरीयल, धोतर, लुंग्या इत्यादी बाजारातून घेण्यात आल्या असून ह्या वस्तू घरोघरी जाऊन बचत गटाच्या महिला विक्री करीत आहेत. विक्री झालेल्या माला नंतर नविन माल खरेदी केल्या जात असून, व्यवसाय उत्तम सुरु असल्याची ग्वाही श्रीमती इंगळे यांनी दिली.

    सोमवार, 12 सितंबर 2011

    स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर जनजागृती होणे गरजेचे - राज्यमंत्री राजेंद्र मुळक



    राज्यात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय शासनस्तरावर अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे. या विषयासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासोबतच सोनोग्राफी केंद्रावर धाडी घालून याला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा,जलसंपदा, संसदीय कार्य आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी या विषयात संवेदनशील पध्दतीने काम सुरु ठेवले आहे. याबाबत त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

    प्रश्न :- स्त्रीभ्रूण हत्या हा विषय आपण कसा हाताळता आणि त्यात आजवर आपण काय काम केले आहे?
    उत्तर :- मुळात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय संवेदनक्षम आहे. आपण राजस्थानात किंवा उत्तरेत असा प्रकार घडतो असं मानत होतो. परंतु आपल्या राज्यातही थोड्याफार फरकाने ही स्थिती आहे हे नुकत्याच झालेल्या काही प्रकरणांवरुन दिसतय. नियोजन खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करताना आकडेवारी सातत्याने समोर येते. यामध्ये मुलींचं दर हजारी प्रमाण खूपच कमी आहे. हा केवळ एक आकडा नसून गंभीर, सामाजिक प्रश्न आहे हे माझ्या लक्षात आलं.

    मुलींचे दरहजारी प्रमाण वाढवावयचे असेल तर समाजात जागृतीसोबत या संबंधाने असणा-या कायद्यांचे पालन हे दोन पैलू आहेत. या दोन्ही कडे तितक्याच प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे. असं मला वाटतं.

    प्रश्न :- यामुळे समाजात काही प्रश्न निर्माण झाले आहेत असं तुम्हाला वाटतं का?
    उत्तर :- निश्चितपणे. नुसते प्रश्न निर्माण झाले आहेत असं नव्हे तर गांभीर्याने या क्षेत्रात काम झाले नाही तर येणा-या काळात समाजाची संरचना बदलेल इतके दूरगामी परिणाम होतील. दर हजारी १०० मुलींची तफावत म्हणजे काही वर्षांनी दहा टक्के मुलांना अविवाहित राहण्याचा प्रसंग निर्माण होवू शकतो.

    प्रश्न :- मुलगाच पाहिजे असा हट्ट का धरला जातो?.
    उत्तर :- ही सामाजिक धारणा बनलीय आणि ती पूर्णपणे चुकीची आहे असं माझं मत आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं समाजात मानलं जातं. आज मुली देखील सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नेत्रदीपक कामगिरी करताना दिसतात. कार्पोरेट जगत असो की क्रिडाक्षेत्र सर्वच क्षेत्रात मुलींचे स्वत:चे असे स्थान निर्माण केल्याचे आपणास दिसते अशा स्थितीत मुलालाच वंशाचा दिवा मानणे चुकीचे आहे असं मला वाटतं.

    प्रश्न :- मुलींचे प्रमाण कमी होत आहे या मागची कारणं काय वाटतात?
    उत्तर :- आपल्या सामाजिक रुढी परंपरा याला निश्चितपणानं जबाबदार आहे. कायदा करण्यात आला असला तरी त्यातून पळवाट शोधून हुंडा मागितला आणि दिला जातो. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही असं कुठेतरी मी वाचलं होतं. मुलगा कसाही निघाला तरी घसघशीत हुंडा मात्र मिळवता येतो अशी धारणा समाजात आहे. हुंडा आवाक्याच्या बाहेर जात आहे आणि मुलगी झाली तर हुंडा कुठून आणायचा या भितीने अनेकजण स्त्री भ्रुण हत्‍त्‍या आणि गर्भजल चिकित्सा या मार्गांकडे वळत आहेत.


    प्रश्न :- ही परिस्थिती बदलण्यासाठी काय उपाय करता येतील ?
    उत्तर :- या परिस्थितीला बदलण्यासाठी जनप्रबोधन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी हे दोन मार्ग आहेत. जनप्रबोधन आणि प्रोत्साहन यातून समाजाला स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यापासून परावृत्त करता येईल आणि समाजाला चांगली सकारात्मक संदेश देखील पोहोचेल. मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. स्वातंत्र्य दिनी वर्धा येथे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणा-या महिलांचा शासनातर्फे आम्ही सत्कार केला. समाजात असे चांगले वागणारे लोक आहेत हे दाखवून दिले तर या मार्गावर इतरही लोक निश्चितपणाने येतील. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे.

    प्रश्न :- कायद्याच्या अंमलबजावणी बाबत काय करीत आहात?.
    उत्तर :- गर्भजल लिंग निदान चाचण्यांना रोखण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात याची अंमलबजावणी व्हावी यासाठी समित्यांचे गठण करण्यात आलेले आहे. या माध्यमातून सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी तसेच अचानक तपासणी करण्यात येत आहे. राज्यात ज्या केंद्रांचा व्यवहार संशयास्पद वाटला अशी केंद्र सिल करण्यता आली आहेत.
    गर्भलिंग तपासणी करताना सापडलेल्या डॉक्टरांवर कठोर शिक्षा होईल अशी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या प्रमाण निश्चितपणाने घटत जाईल असं असलं तरी समाजानं या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिल्या खेरीज हा प्रकार पूर्णपणे बंद होईल असं चित्र नाही.

    प्रश्न :- याखेरीज आणखी कोणते मार्ग आपण हाताळत आहोत ?
    उत्तर :- यात प्रबोधन मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे हे स्पष्टच आहे. गणेशोत्सव आणि नवरात्री महोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी याविषयाला अनुसरुन देखावे सादर करावेत असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या काळात मोठ्या प्रमाणावर देखाव्यांसोबतच पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविण्याचेही नियोजन आहे. यात टिव्ही चॅनेल्स, आकाशवाणी तसेच खाजगी एफएम वाहिन्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

    स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक आहे. हा मोठा सामाजिक भ्रष्टाचार देखील आहे. याविरुध्द जनशक्ती एकत्र व्हावी आणि हे प्रकार संपून पुन्हा मुलींचे दरहजारी प्रमाण हजारापर्यंत यावे यासाठीच हे प्रयत्न सुरु ठेवणार आहोत.

  •                                                                                                                                                                          प्रशांत दैठणकर