मंगलवार, 30 अगस्त 2011

यशस्वी उद्योजिका




एकदा मला माझ्या घरच्या कामाकरिता तीन हजार रुपयाची गरज पडली. तेव्हा वार्डातील एका महिलेकडे गेले, तेव्हा तिने मला पैसे दिले पण पाच टक्के व्याजानी, तिच्या जवळील पैसे बचत गटाचे होते तेव्हा कुठे माझ्या लक्षात आल की, बचत गट तयार केला तर आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात. मी बचत गट तयार करावा हा विचार घेऊन, वार्डातील काही महिलांकडे गेले आणि माझ्या मनामध्ये येणारा विचार त्यांना सांगितला .सर्वांच्यामते आपण सुध्दा आपल्या वार्डात महिला बचत गट तयार करायचा निर्णय घेतला. 

आम्ही माविम सहयोगीनींनी वर्षाताईची भेट घेतली. त्यांनी आम्हाला बचत गटाचे फायदे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ याचे कार्य सांगितले व पटवून दिले. आम्ही महिलांनी त्याच दिवशी म्हणजे १ ऑगस्ट २००८ ला बचत गटाची स्थापना केली, आणि इतर गटाची चौकशी केली. तेव्हा असे लक्षात आले की, महिला फक्त आपसात कर्ज व्यवहार करतात पण बँकेकडून जे कर्ज मिळते त्याचा वेगळा काही फायदा घेत नाही. आम्ही टी.व्ही रेडीओ वरील कार्यक्रम बघायचो, तेव्हा खेड्यातील महिला बचत गटाची शेती, दूध व्यवसाय, पोल्ट्रीफार्म, शेळी व्यवसाय अशी कितीतरी कामे करतात आणि संसाराला मदत करतात.

आम्ही दर महिन्याच्या दोन तारखेला बचत गटाची मिटींग घेत असतो.एका बैठकीच्या वेळी कोणता व्यवसाय सुरु करावा याविषयी आम्हा सदस्यांची चर्चा चालू होती. तेवढ्यात वर्षा या महिलेचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितले की, तुमच्या वार्डात उद्योजकता आणि उद्योग कसे करायचे याचे ४ दिवसाचे प्रशिक्षण आहे. तुम्हाला प्रशिक्षणाला यायचे आहे. 

आमच्या गटातील ६ महिला प्रशिक्षणाला गेल्या, आम्हाला उद्योग उभारणीतील विविध टप्पे, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांची व्याख्या सांगितली. त्यात म म्हणजे महत्वाची, हि म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे न लाजता सामोर जाणारी ही संपूर्ण माहिती वर्षा आणि धवने यांनी चार दिवसाच्या प्रशिक्षणातुन दिली आणि प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवसापासून आमचा नविन जन्म झाला.

बचतगटाच्या माध्यमातून आपण खुप काही करु शकतो आणि त्याच आठवड्यात आम्ही तीन ते चार महिलांनी मिळून साबुदाना पापड, आलू पापड, मुंग पापड, गव्हाचे पापड, ज्वारीचे पापड अशा प्रकारचे पापड तयार केले. पुन्हा आम्ही वर्षाताईला भेटलो. त्यांनी विक्रीची माहिती दिली. आम्ही आफिस मध्ये गेलो. तिथे राठोड सर, देशमुख मॅडम, कांबळे मॅडम यांनी सुध्दा आम्हास प्रोत्साहन दिले. तयार केलेला माल घरोघरी, दुकानात, कार्यालयात जाऊन विक्री केली. तयार केलेला माल अगदी १५ दिवसात संपला. आम्हाला फार आनंद झाला. पाच हजार रुपये लावून तयार केलेला माल अगदी आठ हजार रुपयाला विकला. त्यातुन गटाला तीन हजार रुपयाचा नफा झाला. आम्हाला खुप आनंद झाला. जो माल ज्या ग्राहकांना दिला ते ग्राहकसुध्दा खुपच आनंदीत झाले.

राठोड सरांनी आम्हाला फोन करुन कळविले की, पुलगांव येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून पापडांचा माल तयार करा व प्रदर्शनात विक्रीस ठेवा. अगदी पाच दिवसात आम्ही शंभर किलो पापडांचा माल तयार केला. ६ दिवसांच्या प्रदर्शनामध्ये पंधरा हजार रुपयाचा माल विकला गेला. तिथे आम्हास सात हजार रुपयाचा नफा मिळाला. 

सरांनी फोन करुन कळविले की, आता तीन-चार ठिकाणी प्रदर्शन आहेत. त्या करिता तुम्ही तयारीत रहा. माल तयार करण्याकरीता आम्ही बाहेरच्या महिला कामाला लावल्या व सगळया प्रदर्शनांमध्ये सहभागी झालो प्रत्येक व्यक्तींनी मालाची प्रशंसा केली आणि मालाची विक्री वाढली. आम्हाला बँकेकडून ५०,००० रुपयाचे कर्ज मिळाले. 

आता आम्ही मशिन घेऊन कामाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला नागपूर वरुन मशिन आणली मशिन व्दारे दाळ, तीखट, मसाले, धनिया, हल्दी, सोजी सगळे साहित्य करु लागलो.

या वर्षी आम्ही पालक वडी, मेथी वडी, लौकी वडी, मसाला वडी, मुंग वडी, उडद वडी, आणखी बरेच पदार्थ तयार करुन दिल्लीला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या प्रदर्शनात सहभागी झालो. तिथे तर मला खरोखरच स्वर्ग बघायला मिळाला. भारतातील सर्व राज्यातील महिला आपआपल्या वस्तुची विक्री करत होत्या. त्यामध्ये माल विकायचा कसा ? त्यांनी बनविलेला मालाचा दर्जा, पॅकिंग इत्यादी त्यांच्या मधील कौशल्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले.

त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा केली. त्यांनी तयार केलेला मालाचा दर्जा, विक्री कौशल्य, ग्राहकांशी प्रेमाने हसुन अगदी आत्मविश्वासपूर्पक माल कसा विकायचा सगळे शिकायला मिळाले. पुर्ण भारताचे दर्शन त्या ठिकाणी झाले.

पहिल्यांदाच इतका लांबचा प्रवास केला होता. १५ दिवसात दिल्लीला राहिल्यानंतर आम्ही तीन दिवस आगरा, मथुरा, वृंदावन, ताजमहल, संपूर्ण दिल्ली दर्शन केले. घराबाहेर पडल्यानंतर खरी माणसाची किंमत माहिती होते. आणि जगण्याचा नवीन मार्ग सापडतो. दिल्लीला पंचेचाळीस हजार रुपयाचा माल विकला गेला. फक्त ६ दिवसात नंतरचे दिवस मी बाकी महिलांचा माल विकुन दिला. आम्ही महिला घराच्या कधी बाहेर निघू शकलो नाही ते आज सर्व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामुळे घडू शकले.

दर्शना महिला बचत गटामुळे १५ ते २० महिलांना काम मिळाले. प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला ३ ते ४ हजार रुपयाचा नफा मिळतो आहे. त्यामुळे घरात आणि समाजात सुध्दा मानसन्मान मिळाला आहे.

रविवार, 28 अगस्त 2011

संधीचं फळ


             कल्पना ही शहरामध्ये राहत होती. ती पाच भावंडामध्ये एकटी एकच बहीण होती. ती कुटुंबात खूप लाडाची होती. अभ्यासामध्ये खूप हुशार होती. तिला पुढे शाळा शिकायची होती. परंतु तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची फार चिंता लागलेली होती आणि शिकत असताना तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाकरीता स्थळ शोधने चालू केले होते. एक स्थळ जाम ते नागपूर ह्या रोडवर कानकाटी गाव आहे. त्या गावाची लोसंख्या ७४२ आहे. छोट्याशा गावात राहणारे सुभाष यांच्या कुटुंबाने कल्पनाला मागणी घातली होती. सुभाष स्वभावाने अतिशय चांगला व निर्व्यसनी होता. त्याच्याकडे स्वत:ची थोडी फार शेती होती. सुभाष बरोबर तिचे लग्न झाले. ती शहरातील खेड्यात आली. शहराच्या वातावरणात राहणारी कल्पना खेड्याच्या वातावरणात समरस झाली.ती खूप समजदार होती. तिला स्वत:वर आत्मविश्वास होता. तिच्यामध्ये खूप जिद्द होती. ती स्वत:च्या कल्पनेतुन स्वत:ला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करित होती. तसेच ती इतर महिलांना स्वावलंबी होण्यासही माग्रदर्शन करीत होती. ती इतर महिलांशी खूप आपुलकीने प्रेमाणे वागायची तिच्या ममतेचा सागर होता. तिला वाट होती संधीची !

अशातच एक दिवस         माविम सहयोगीच्या माध्यमातून कानकाटी येथे संधी चालून आली. माविमचं काम म्हणजे आकाशात उंच भरारी मारुन प्रगतीच्या वाटेवर महिलांना उभं करणारी मावि सहयोगिनी ! आम्हा सर्व महिलांना बचत गआची संकल्पना, महत्व सांगून गावामध्ये बचत गटाची स्थापना केली. गआमध्ये कल्पनाला सचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली. गटाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन मिळत होते. गट सुरळीत सुरु होता. त्यामध्ये गटातील सभासदांनी अंतर्गत कर्ज व्यवहारातुन आर्थिक स्त्रोत वाढविले. तसेच कल्पनाने सुध्दा गटातुन कर्ज घेतले. तिने घेतलेल्या कर्जातून फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय सुरु केला. कारण तिच्या मध्ये ह्या व्यवसायाची कला अवगत होती. तसेच तिने पेंटींग क्लास सुध्दा केला होता.

           कल्पना ही ख्ररोखरचं कल्पनावंत होती. तिने आपल्या कल्पनेतून नाविन्यपूर्ण पिंपळाच्या पानावर कोरीव काम करुन महान व्यक्तीची फोटो पिंपळाच्या पानात तयार केले. ते दिसायला अतिशय सुंदर व नाविन्यपूर्ण असल्यामुळे त्याची मागणी खूप वाढली. त्यामुळे व्यवसायातून कल्पनाच्या आर्थिक परिस्थितीत बरीच सुधारणा झाली. तसेच ह्या व्यवसायामध्ये तिचा नवरा सुध्दा तिला संपूर्ण सहकार्य करीत होता. हा व्यवसाय कल्पनेतून निवडण्यात आला. ती स्वत:चा व्यवसाय सांभाळून इतर सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या उत्साहने इतर महिलांना मदत करते. स्वत:च्या प्रेरणेतून इतरांना सुध्दा कार्य करण्यास प्रेरणा देते.

                                                                                            0000000

गुरुवार, 25 अगस्त 2011

आधारस्तंभ


गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

एकदा सायंकाळी एका खेड्यावरुन परत आल्यावर अचानक शेजारी राहणा-या ममताकडे सहज नजर टाकली. घरासमोरच राहत असल्यामुळे ममता ही नवी सून असली तरी मोजकच नकळत हसली. मला तिच्या हसण्यानं सुध्दा ती खूप काळजीत असल्याचे जाणवले. काही न बोलता मी घरात आले.

मी घरी येऊन नंतर कामानिमित्त बाहेर गेले, पण डोळ्यासमोर ममताचा चेहरा
थोड्या-थोड्या वेळाने येत होता. नेहमी हसणारी, हसून स्वत:हून बोलणारी ममता आज इतकी अबोल का ? एकच प्रश्न सतत पडत होता.

ममता ही व्दारकाताईची मोठी सून असल्यामुळे ती घरातसुध्दा तेवढ्याच जबाबदारीने वागायची.हसतमुख राहून सर्वांची मर्जी राखायची. एक दीर, आजी, सासू-सासरे असा तिचा परिवार.निलेश नेहमी नवरा या नात्याने ममताची काळजी घ्यायचा. घरातील सगळया व्यक्ती खूप समजदार असताना ममता काळजीत का? हा प्रश्न मला दुस-या दिवशीपर्यंत सतावीत होता.

व्दारकाताई ह्या सोनिया गटाच्या सहसंघटिका होत्या. गटाची आपण मिटींग घ्यावी व ममताला बोलके करावे, म्हणून दुस-या दिवशी सायंकाळी ठरल्याप्रमाणे हनुमान मंदीरात सोनिया गटाची मिटींग घेण्यात आली. मिटींगला सुरुवात करताना सर्व महिलांकडे बघितले त्यात ममता कुठेच दिसत नव्हती. चौकशी करुन तिला बोलावण्यात आले. तेव्हा सुध्दा मोजकसं हसून गटात सभेला बसली.संधी बघून मी तिच्याजवळ गेली. तुला बरे नाही का ? काय होत आहे ? असे विचारुन बोलके केले, ती म्हणाली,काहीतरी काम पाहिजे.

मी आश्‍चर्याने बघितले व मनात एवढा महत्वाचा प्रश्न, पण स्वत: त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नात असणा-या ममताचे मला कौतुक वाटले. माझ्याकडे अपेक्षेच्या नजरेने बघून मला गटाच्या माध्यमातून काही काम मिळेल काय.मला कामाची फार आवश्यकता आहे, असे ती म्हणाली. या प्रश्नानी मी विचारात पडले. कारण ममता मध्यमवर्गीय कुटुंबातली, निलेश सुशिक्षित बेरोजगार पण काहीतरी करण्याची धडपड, कर्ते सासरे सेवानिवृत्त झालेले. एकूण कुटूंब तसं मोठंच पण मी तिला काहीही न दर्शवताच आपण बघू विचार करु, तू अशी हिंमत हारु नकोस, या शब्दांनी तिला हिंमत आल्याचे तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होते. पण ममताला धीर कुठे होता, मी दुस-या गटाकडे जेव्हा काही कामानिमित्त गेली असता, तिथे ममता मला बोलवण्याकरीता आली व म्हणाली, काकू आमच्या गटाच्या काही महिला माझ्या घरी बसल्या आहेत, तेव्हा तुम्ही आलात तर बरे होईल. मी सुरु असलेले काम आटोपून जेव्हा सोनिया गटाकडे गेली, तेव्हा सर्व सभासद तर नव्हते पण पाच ते सहा महिला मला दिसल्या त्यांना बघून बरे वाटले की आता माझ्या मनात कालपासून जे थोड्या फार प्रमाणात ममताबद्दल सुरु आहे. त्यासाठी या सगळ्यांची आपल्याला मदत होणार. ममताचा पुन्हा प्रश्न तोच ताई सांगा ना गटाच्या माध्यमातून मी काही करु शकणार नाही का ?

मी तिला म्हटले की, ममता मी एक आयडिया तुला देते, तू खानावळ का लावीत नाहीस. आपल्या शेजारी आजूबाजूला कर्मचारी आहेत आणि विद्यार्थी सुध्दा आहेत. तू जर मेस सुरु केली तर तुझे घराकडे लक्ष राहील, घरच्या घरी तुला काम पण मिळेल. हे बघ तुला काम मिळेल आणि त्यांना चांगले घरगुती जेवण मिळेल. बघ विचार करुन, त्यावर ममता म्हणाली की, मेस लावायची तर आधी धान्य सामान नको का भरायला. त्यासाठी आर्थिक मदत हवी. तेव्हा गटाच्या महिलांनी तिला गटातून कर्ज स्वरुपात मदत करण्याचे ठरविले.

दुस-या दिवशी तिची सासू एक दोन व्यक्तीकडे जावून विचारुन आल्या की, घरगुती खाणावळ तुम्हाला हवी का ? मी सुध्दा बँकेच्या कर्मचारी लोकांना आग्रह धरला. बघता बघता ममताच्या मेसच्या जेवणाचे कौतुक सर्वत्र पसरले. आज ममता, तिच्या सासूबाई सुध्दा खूप मेहनतीने खानावळ चालवतात. निलेशला कंपनीत नोकरी लागली, ममता म्हणाली,खानावळसाठी मला गटाने सहकार्य केले नसते तर मी आज काहीच करु शकले नसते. खरचं गटचं माझ्यासाठी खरा आधारस्तंभ ठरला आहे. ममताला समाधान मिळाल्याचे तिच्या बोलण्यात आणि उत्साहातून दिसत होते.

                                                                                                      0000000

मंगलवार, 23 अगस्त 2011

संघर्षमय जीवनातून नवचैतन्य


मी अर्चना गणवीर समुद्रपूर तालूक्यापासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या गिरड या गावामध्ये राहते. माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर गावामध्ये झाला. आमच्या भावंडामध्ये मी सर्वात लहान, वडील व्यसनी, कुटूंबाचा संपुर्ण भार आईवर होता. मोठ्या बहिण्ीचे लग्न झाले. आई घरी शिवणकाम करायची, मी सातव्या वर्गापासून आईच्या कामाला मदत करायला सुरुवात केली. मी आईच्या कामात मदत करता करता पदवी पर्यंतचे शिक्षण व शिवणकाम शिकले.घरच्या लोकांनी माझे लग्न उमरेड तालुक्यातील एका मुलाशी करुन दिले.
माझा नवरा सारा पगार दारुत घालवायचा, मला मारण्याकरीता नवनवीन कारणे शोधायचा.मी मरत मरत जगत होती, पण नंतर मी ठरवलं, माझ्या चांगल्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी मलाच कंबर कसावी लागेल. माणुस म्हणुन चांगलं जीवन जगण्याचा मलाही अधिकार आहे. माझ्या अंगी शिवणकामाचं चांगलं कौशल्य होतं. मनाशी निर्धार व स्त:वर आत्मविश्वास होता.मी व्यसनी नव-यास सोडले
गिरडला एका संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथलं काम संपवुन घरी कपडे शिवण्यास सुरुवात केली. पैसे गोळा व्हायला लागले. पण तिथेही फसवणुक झाली. संस्था बंद पडली, पण माझा शिवणकाम व्यवसाय चांगला चालत होता. एकट्या बाईला विरोधही खुप असतात. मला इथुन काढण्याचा खुप प्रयत्न केला. पण मी आपल्या मनाशी खंबीर होते. स्वत:चा टिकाव केला.
माझं लग्न झालं आहे. हे माहिती असुन सुध्दा मला एका मुलाने माझ्यातले गुण स्वभाव, साहसीवृत्ती बघुन मला पसंत केले. परंतु माझा लग्नाला विरोध होता. कारण एकदा ठेच खाल्लेली होती. सगळे पुरुष सारखेच असतात, असा समज माझ्या मनात होता. मुलाकडील घरच्याचा विरोध होता, शेवटी एक दीड वर्षानंतर त्याचा हटट कमी न झाल्यामुळे मी विचार बदलला त्याचेशी विवाहबदध होण्याचे ठरवले. नशीबाने मला संधी दिली असावी आणि या संधीचा फायदा घेऊन मी माझ्या आयुष्याचं सोनं करण्याच ठरवल. 
मला बचत गटामध्ये सहभागी व्हायची खुप दिवसापासुन इच्छा होती. माविम सहयोगीनी ताईच्या माध्यमातुन ही संधी मला मिळाली. मी आम्रपाली गटाची सदस्य झाली. गावामध्ये केंद्र सरकारमान्य शिवणकला डिप्लोमा व पार्लरचा डिप्लोमा कोर्स चालविते. माझ्याकडे गरीब गरजु मुली शिकायला येतात. त्यांना मानसिक, आर्थिक आधार देण्याचं काम मी करीत आहे.
मी शिकविलेल्या काही मुलींचे व्यवसाय सुरु झालेले आहे. ते पाहून मनाला समाधान मिळते. आज माझ्याकडे असलेल्या कौशल्यामुळे माझी प्रगती झाली,आज. मी खुप समाधानी व आनंदी आहे.याचे खरे श्रेय .माविमचे आहे

महागाईवर मात सावंगी मेघेतील कथा


भिमाई स्वयं सहायता महिला बचत गट सावंगी मेघे,वर्धा येथील गटामध्ये १४ महिलांचा सहभाग आहे. गटातील नियमीत बचत, महिलांचा सहभाग बघुन वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वर्धा शाखने गटाला रुपये १०००० चे कर्ज दिले. त्याचा उपयोग गटातील महिलांनी कुटुंबातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी केला. दरमहा बँकेने ठरवुन दिलेल्या किस्तीने कर्जाची परतफेड नियमित केली. त्यामुळे गटाप्रती बँकेचा विश्वास वाढला. 

गटातील महिलांनी एकत्र बसुन गटाचा व्यवसाय करण्या संदर्भात चर्चा केली. त्यातुन अनेक अडचणी पुढे आल्या. व्यवसाय सुरु केला तर मार्केटींग करावे लागले. सर्वांना सहभागी होऊन एकत्र काम करावे लागेल व त्यातुन मिळालेला नफा वाटुन घ्यावा लागेल. त्यामुळे सर्वांनी आपला दर महिन्याला लागणारा खर्च कमी करण्या संदर्भात चर्चा करुन वर्षभरात लागणारे धान्य विकत घेण्याचा निर्णय घेतला. 

बाजारभाव कमी असतो अशा वेळेस धान्य विकत घेऊन सर्वांना कमी किमतीत वाटुन द्यावे. त्यातुन दरवेळेस होणारी भाववाढ यातुन सर्व सभासदांना सुटका मिळेल. तसेच वेळेवर धान्य खरेदी करिता सभासदांकडे पैसे नसतात, त्यांना मदत होईल. सर्वानुमते गटात ठराव पारित करुन बँकेकडे सादर केला व धान्य विक्रीचा व्यवसाय निवडला. बँकेचे गटाची व्दितीय प्रतवारी करुन गटाला व्यवसायाकरिता रुपये ६००००/- चे कर्ज मंजुर केले.

गटाने बँकेकडून मिळालेल्या कर्जातून बाजारात जाऊन ठोकमध्ये धान्य, तेल खरेदी केले व गरजेनुसार कमी भावात सभासदांना वाटून दिले. त्यातुन सभासदांचा कुटुंबाला दरमहा होणारा खर्च वाचला, तसेच बाजार भावापेक्षा कमी किंमतीत धान्य व तेल मिळाल्यामुळे कुटुंबाला नफा झाला. सर्व सभासदांनी गटाकडून घेतलेल्या मालाची रक्कम त्यांच्या नावे कर्ज स्वरुपात दाखविण्यात आली. ठरविल्याप्रमाणे दरमहा रुपये २००/- कर्ज व व्याज परत करतात. गटाकडे जमा झालेल्या रकमेतुन बँकेची परतफेड सुरु आहे. अशाप्रकारे गटाने बँकेचा विश्वास संपादन केलेला आहे गटाने घेतलेल्या कर्जावर माविमकडून ७ टक्के व्याजाचा परतावा गटाला नियमित मिळतो. अशाप्रकारे भिमाई गटाने धान्याच्या पुरवठा करुन महागाईवर मात केलेली आहे.

उद्योगाची भरारी


हिंगणी हे गाव सेलु तालुक्यातील बोरधरण रोडवर बसलेले आहे. त्या गावाची लोकसंख्या २००० पर्यंत आहे. गावात एकूण ४० ते ४५ गटांची स्थापना झालेली आहे. त्यापैकी माविम अंतर्गत त्या गावामध्ये ५ गटांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातच उन्नती स्वयंसहाय्यता गटाची स्थापना १५ मे २०१० रोजी झालेली असून, त्या गटातील सदस्या सौ.ज्योत्स्ना रमेश उरकुडे हया गटामध्ये येण्यापूर्वी फक्त चूल आणि मूल इतपतच मर्यादित होत्या. तसेच घराबाहेर निघण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण मनात उद्योग करण्याची खूप इच्छा होती, पण काय करणार. असं त्या सांगतात.

माविम सहयोगीनी मार्फत जेव्हा उन्नती बचत गटाची स्थापना झाली. तेव्हापासून त्या गटामध्ये सक्रीय सभासद म्हणून सहभागी आहे. गटाच्या नियमित सभेला उपस्थित राहणे
, प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे. यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यातून उद्योजकता जाणिवजागृती प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग करण्याची इच्छा निर्माण झाली. गटातून रुपये ४०००/- कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपडयांच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायाच्या उत्पन्नातून गटाच्या कर्जाची परतफेड केली. त्यानंतर माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने महात्मा फुले महामंडळातील योजनेच्या माध्यमातून रुपये २००००/- कर्ज घेऊन त्यांनी व्यवसायामध्ये वाढ केली. तसेच व्यवसायाच्या माध्यमातून वर्षामध्ये कर्जाची परतफेड झाली. 

ज्योत्स्नाताईची उद्योगातील प्रगती व कर्ज परतफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडिया
,हिंगणी शाखेने त्यांचा सत्कार केला. त्यांनी व्यवसायात वाढ करण्याकरिता बँक ऑफ इंडिया हिंगणी शाखेकडे रुपये ५००००/- कर्जाची मागणी केली. बँकेने रुपये ५००००/- चे कर्ज दिले. ज्योत्स्ना ताईच्या उद्योगाला भरभराट आलेली असून, व्यवसायातून तिला चांगल्या प्रकारे नफा मिळतो.


तिच्या हया आदर्शामुळे गावात झालेल्या गाव विकास समितीमध्ये अध्यक्ष म्हणून 
निवड झाली. गाव विकास समितीच्या माध्यमातून सर्व गटातील महिलांच्या 
सहभागाने गावामध्ये वृक्षारोपण, एच.आय.व्ही.एडस जाणिवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य व हिमोग्लोबीन तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादी महत्वपूर्ण कार्यक्रम गावात घेतले.

गटात येण्यापूर्वीची परिस्थिती व व्यवसायाच्या माध्यमातून घेतलेली भरारी हे यशस्वी 


उद्योजक म्हणून आदर्श घडविणारे आहे
.

धैर्यशिल शालूची कहाणी

कांढळी ते सेवाग्राम रोडवर एक छोटसं गाव म्हणजे वायगाव (बै.)होय.हया गावाची जवळपास लोकसंख्या ८०० च्या जवळपास आहे. अशा हया छोटयाश्या गावात असणारं एक कुटुंब म्हणजे शालुचं! याच गावात शालु लहानाची मोठी झाली. तिच्या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची होती. ती घरात सर्वात मोठी होती. तिचे आईवडिल शेतमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करित होते. शालु व तिचे भाऊ शाळा शिकत होते. शालु ही कशीबशी दहावी पर्यंत शिक्षण झालेले असताना तिला पुढे शिकायचे होते. 

पण काय करणार ! परिस्थिती नसल्यामुळे पुढे तिला शिकता आले नाही. तसेच तिच्या आईवडिलांनी लग्न करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिला कोणताच पर्याय नव्हता. कारण तिच्या आई वडिलांनी तिच्या करिता मुलगा शोधण्यास सुरुवात केलेली होती.

मोही हया गावातील एका सर्वसाधारण सरकारी कर्मचारी असलेल्या मुलासोबत तिचे लग्न करुन देण्यात आले. मुलगा स्वभावाने चांगला होता. शालु आपल्या संसारात सुखी होती. तिला तीन मुली झाल्या. मुली अगदी लहान असतानाच तिच्यावर फार मोठे संकट कोसळले,. तिच्या नव-याने आत्महत्या केली. शालु समोर आभाळ कोसळले. तिच्या सासरची मंडळी तिलाच दोषी मानत होती.

शालुलाही स्वत:चा स्वाभिमान होता.पण प्रश्न होता तो म्हणजे तिच्या चिमुकल्या मुलीचा, तिला मुलीकरिता जगणेच होते. पण तिला साथ नव्हती कुणाची ! तिने शेवटी निर्णय घेतला माहेरी जाण्याचा. ती माहेरी गेल्यावर माहेरच्या व्यक्तीकडून तिच्या परिवाराच्या गरजा पूर्ण करणार नव्हते. तिच्या समस्या तिलाच सोडवायच्या होत्या. म्हणून ती दुस-यावर अवलंबून न राहता, स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या मुलींना चांगलं शिकवायचं हे तिचे ध्येय होते. 

माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने वायगाव (बै.) येथे बचत गटाची स्थापना केली. शालुला त्या गटाची संघटिका बनण्याची संधी मिळाली. शालु संघटिका म्हणून गटाचे काम पाहू लागली. गटाचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु होते. शालुने गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केली व तिने कपडे शिवण्यास सुरुवात केली. तिने स्वत:च्या मेहनतीने, जिद्दीने स्वत:चा स्वयंरोजगार निर्माण केला. तिने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. व्यवसायातून मिळालेल्या मिळकतीतून ती आपल्या मुलीच्या गरजा पूर्ण करण्यास पात्र ठरली. एवढेच नव्हे तर गावात प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहून, ती सर्वांना सहकार्याच्या भावनेने मदत करते. तिच्या हया कर्तव्यातून इतरांना सुध्दा प्रेरणा मिळते.



पावले पडली पुढे...

समुद्रपूर तालुक्यातील २४९ लोकसंख्या असलेले खैरगाव, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता स्वयं सहाय्य महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली.गटाच्या संघटिका म्हणून सौ. शौभा झिबलाजी गायधने, वय ४८ वर्षे यांची निवड झाली. शिक्षणाने अशिक्षित असल्या तरी त्यांच्या मध्ये असलेली जिद्द व चिकाटी मुळे संघटन, शिक्षण व व्यवहारीक ज्ञान त्यांना गटामुळे मिळाले.अशिक्षित असल्यामुळे त्यांना वाचन करता येत नव्हते. परंतु त्यांची वाचनाची आवड बघून त्यांच्या मुलांनी त्यांना रात्रीच्या शाळेत जाण्यास सां‍गितले. घरातील कामे, शेतीची कामे, गटाची कामे करुन शोभाताईने ४५ व्या वर्षी ४ थी पास केले. शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते हे त्यांनी समाजाला दाखवून दिले.

शोभाताईने गटातून कर्ज घेऊन स्वत:च्या १२ एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला.त्यासाठी त्यांनी स्वत: व गटातील महिलांनी शेती शाळेत प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीमुळे कीटकनाशके,रासायनिक खते इत्यादीचा खर्च वाचला. शोभाताईने स्वत: गांडुळ खत, जीवामृत तयार करुन शेतीमध्ये त्याचा वापर केला.शेतीमधून निघालेल्या उत्पादनातून त्यांनी विषमुक्त अंबाडी शरबत, झुणका भाकर चा स्टॉलच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनीमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

गावातील तलावावर गटातील महिलांच्या सहकार्याने व स्वत: पुढाकार घेऊन बंधारा बांधला. गटाचा वाढदिवस, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मेळावे इत्यादी विविध कार्यक्रम गावामध्ये पुढाकार घेऊन साजरे केले जातात. सुजाता स्वयं सहाय्यता बचत गटाच्या नावाने शेतकरी वाचनालय स्थापन केले. गावातील शेतकरी वाचनालयात जावून वाचन करतात. शोभाताईनी कृषी खात्याच्या माध्यमातून शेततळे, गोबरगॅस, वृक्षारोपण इत्यादी योजनाचा लाभ घेतला. शोभाताईला वाचनाची आवड असल्याने वाचनालयातील एकही पुस्तक त्यांच्या वाचनातून सुटलेले नाही.

शोभाताईला सहलीला जाण्याची खूप आवड. गटाची सहल, कृषी खात्यामार्फत अभ्यास दौरा, तीर्थयात्रा असो, त्या नियमित दरवर्षी नवीन गावाला शहरात फिरण्यासाठी जातात. गोवा, अकोला, चिखलदरा, रत्नागिरी, मध्यप्रदेश, दिल्ली इत्यादी ठिकाणी त्या गेलेल्या आहेत.

गटामध्ये सहभागी झाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, मी जे काही करते आहे, ते गटांकडून मिळत असलेल्या बळामुळे. भविष्यात गटासाठी एक व्यवसाय उभारणी करावयाची आहे. जेणेकरुन सर्व सुखी समाधानी जीवन जगेल, पण ते होईल सर्व गटांच्या प्रशिक्षणातूनच आणि त्यासाठी साथ हवी माविमची

शिवणकलेतून जुळविली घरच्यांची मने

मी सौ. साधना हरी कांबळे अल्लीपूर येथील धम्मचक्र स्वयं सहायता महिला बचत गटाची सचिव म्हणून कार्य करीत आहे.

मी गटात येण्यापूर्वी माझा विवाह अल्लीपूर येथील हरी कांबळे यांचे सोबत झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासुरवास सुरु झाला. त्यातूनच माझी मानसिकता ढासळायला लागली. आता जीवनात काही नविन करण्याची हिंमत ढासळत होती. कसेबसे जीवन जगणे सुरु होते.

अशा परिस्थितीत एके दिवशी माविम सहयोगीनी माझ्याकडे आली, तिने मला गटात समाविष्ट केले आणि गटातील सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली व नविन काहीतरी करायला मिळणार या उद्देशाने मी त्यांना होकार दिला व पुढाकार घेण्यास तयारी झाली.

गटाच्या माध्यमाने व सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्यवहार उत्तमरित्या शिकले. यातून माझा आत्मविश्वास वाढला. परंतु घरच्यांचा विश्वास कसा जिंकावा याकडे लक्ष देणे गरजेचे होते.

मी लग्नापूर्वी शिवणकलेचा कोर्स केला होता. मी ठरविले की, गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन घ्यायचे व स्वत:च्या पायावर उभे राहून घरच्यांची मने जिंकायची हे स्वत:च्या मनाशी ठरवून मी शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगला सुरु आहे.

उद्योगामुळे घरच्या परिस्थीतीला आर्थिक पाठबळ मिळाले. घरच्या परिस्थीतीत सुधारणा व्हायला लागली. त्यामुळे माझ्याकडे घरच्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे. त्यातून मी स्वतंत्रपणे निर्णय घेवू शकते. गटाचे व्यवहार पाहू शकते. घर खर्चात हातभार लावू शकते. आता मला कुठल्याच प्रकारचा सासुरवास होत नाही. पतीची चांगली साथ मिळते.

गटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग सुरु झाला. कपडे शिवता शिवता मने जोडली हेच माझे यश.

शनिवार, 20 अगस्त 2011

गटाने दिली प्रगतीची वाट


सायखेडे हे लहानशे आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. गावांची लोकसंख्या ४०० ते ५०० आहे. गावात माविम अंतर्गत ६ गटाची स्थापना करण्यात आली. माविमचे काम सन २००६ पासून या गावात चालू आहे. महालक्ष्मी गटाची स्थापना ऑक्टोंबर २००६ ला झाली. गटात एकूण १४ महिला आहेत. गटाची मासिक बचत ५० रुपये आहे. 

आज प्रत्येक सभासदांची एकूण बचत २७०० रुपये झाली आहे. गटाचे वय ५ वर्ष आहे. गटातून लहान-मोठ्या अडचणी भागविल्या जातात. त्याच बरोबर उद्योग सुरु करण्यासाठी सुध्दा गटातून कर्ज दिले जाते. त्याप्रमाणे सुधा कोडापे या महिलेने उद्योजकता प्रशिक्षणातून प्रेरणा घेवून त्यांनी किराणा दुकान सुरु करण्याचे ठरविले. घरात दोन व्यक्ती आहेत. उत्पन्न मिळविण्याकरीता दुसरे साधन त्यांच्याजवळ नाही.

गटातून त्यांनी २ एप्रिल २०१० ला १२००० रुपये कर्ज घेवून लहानशे किराणा दुकान लावले. सुरुवातीला दुकानात जास्त कोणी येत नव्हते, विक्री बरोबर व्हायची नाही. त्यामुळे सुरुवातील त्या नाराज झाल्या. परंतु गटाच्या हिंमतीने व सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने त्यांना बळ दिले. हळूहळू त्यांचे ग्राहक वाढू लागले.

आज त्यांनी गटाची पूर्ण कर्ज परतफेड केली. दुकानांमुळे त्यांच्या दोन व्यक्तीचा कुटूंब निर्वाह चालू लागला.दुकानाच्या भरवशावर गटात मासिक बचत भरतात. गटाचे कर्ज परतफेड केले.त्यांना हृदयाच्या झडपेचा आजार असून स्वत: दवाखाना करतात.त्या खंबीरपणे दुकानाचा व्यवसाय सांभाळत आहे. त्या नेहमी म्हणतात. मला माविमने खूप आधार दिला.आज गटामुळे मला दोन वेळचे जेवण आरामात मिळू लागले आहे. मला गटातून खूप शिकायला मिळाले, नविन ज्ञान मिळाले .गटामुळे मला चांगले वाईट कळायला लागले. माविममुळेच मी घडू शकली, गटामुळे माझी प्रगती होऊ शकली.

धरली उद्योगाची कास अल्लीपूरची कहाणी

उडान लोक संचा‍लित साधन केंद्र, हिंगणघाट कार्यक्षेत्रातील सुमारे २० कि.मी. अंतरावरील अल्लीपूर गाव. गावात माविमव्दारा स्थापित ८ बचतगट असून जास्तीत जास्त महिला गरीब, गरजू व मजूर वर्गातील आहे. अशाच घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या परिस्थितीशी उद्योगाच्या माध्यमातून झुंज देवून परिस्थितीत बदल घडविण्यासाठी धडपडत असलेल्या महिलेची कथा...

चंदा भगत समता महिला बचत गटाची सदस्य आहे. गटामध्ये येण्यापूर्वी घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. गरीबीच्या परिस्थितीत काढलेले दिवस. दररोज मिळेल ते मोलमजुरीचे कामकाज करुन संसाराचा गाडा चालविण्यासाठी पतीला हातभार लावायचा. मजुरी करण्याकरिता घरातून बाहेर पडण्यास मनाई नव्हती. परंतु काहीही चांगले कार्य करण्यास घरातून बाहेर पडण्यास मात्र मनाई. अशा परिस्थितीत घरच्यांच्या विरोधास न मानता आपल्या अंगी असलेल्‍या कलागुणांना कधी मनमोकळेपणाने वाव देता आला नव्हता.

एके दिवशी माविम सहयोगीनीनी आम्हाला गटाच्या माध्यमातून एकत्र आणले आणि विविध प्रशिक्षण व वेळोवेळी मार्गदर्शन करु लागल्या. गटाच्या निमित्याने आम्ही एकत्र येवू लागलो व मनमोकळेपणाने गटाच्या मिटींगमध्ये आम्ही चर्चा करु लागलो. हळूहळू घरच्यांचा विरोध संपला. कारण त्यांना गटातून मिळणारे कर्ज घरातील अडचणींवर मात करण्यास कामी येवू लागले. आता मला घरच्या मंडळीकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.

जसजसे गटाचे वय वाढू लागले. तसतसा माझा आत्मविश्वास अधिक वाढू लागला. गटासोबत घरच्यांचासुध्दा विश्वास जिंकल्याने व त्यांची साथ मिळाल्याने दररोज न मिळणा-या मजुरीवर मात करण्याचा विचार सुरु केला.

मी एके दिवशी माझ्या पतीशी चर्चा केली की गटातून कर्ज घेवून जर आपण एक सिजनेबल उद्योग सुरु केला तर ? त्यांना प्रस्ताव आवडला व आम्ही गटातून कर्ज घेवून पोळ्याचा बैलांचा साजशृंगार तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला आणि पहिल्या पोळ्याला आम्ही बनविलेल्या मालाची चांगली विक्री झाली.

गटाने आर्थिक सहाय्य करुन ज्याप्रमाणे मला मदत केली. त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबाने सुध्दा माझ्या व्यवसायात हातभार लावून मदत केली. यातून माझा व माझ्या पतीचा उद्योगविषयीचा आत्मविश्वास वाढला असून आम्ही कुठल्याही प्रकारचा उद्योग सुरु करण्यास दोघेही तयार आहोत.आता माझ्या व्यवसायात माझी छोटी मुलगीही आनंदाने हातभार लावते.मी माझ्या मुलीला तिच्यामधील गुणांना त्याच माध्यमातून उजाळा मिळावा म्हणून प्रोत्साहन देत असते. या उद्योगाने माझ्या घरची आर्थिक परिस्थितीतच नव्हे तर मानसिकतेमध्येही चांगला बदल झाला. त्यामुळे आता उद्योग हेच माझे व कुटुंबियांचे ध्येय आहे.

बचत गटाच्या माध्यमातून गावाचा कायापालट

आष्टी तालुक्यातील साहुर क्लस्टर मधील सावंगा (पुर्न.) हे एक छोटेसे गाव. त्या गावाची लोकसंख्या ५३६ आहे. नलिनी कुकडे ही महिला सर्वसाधारण कुटुंबातील आहे. बचत गटामुळे त्यांची हिंमत वाढली. त्यांना आपल्या गावाची सुधारणा व्हावी या दृष्टीने गट स्थापना करण्याकरीता माविम सहयोगीनीला मदत केली. गावामध्ये माविमचे २ गट स्थापन झालेले होते. त्यानंतर नलिनी कुकडे यांनी ३ तेजस्विनीचे गट स्थापन केले. त्यांना आपल्या गावाबद्दल फारच आपुलकी आहे.

त्यामुळे त्या गाव विकासाच्या प्रत्येक कामामध्ये हिरीरीने भाग घेतात व आपल्या सोबत इतर सर्व महिलांना घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्याप्रती महिलांची आपुलकी सतत वाढत आहे. तसेच त्या सर्व गटाच्या मिटींग सुध्दा स्वत: घेतात. गटामध्ये असलेल्या अडचणी स्वत: सोडविण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांच्याकडून झाले नाही तर सी.एम.आर.सी. कार्यालयाला कळवितात. तसेच गावामध्ये त्यांनी गाव विकास समिती स्थापन केलेली आहे.

गाव समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतात. त्यामध्ये उदा. हिमोग्लोबिन तपासणी, स्त्रीभ्रूण हत्या, आरोग्य तपासणी शिबीर, हुंडा विरोधी, ग्राम स्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव, कुपोषित माता व बालकांना आहार वाटप, गरोदर मातांना आहार देण्याचे काम हाती घेवून पुर्ण केले. गावामध्ये २१ दिवसापर्यंत कुपोषित माता व बालक यांना आहार देण्याचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे पी.एस.सी. साहुर व्दारे त्यांचा सत्कार करण्यात आला. आता त्यांच्यामध्ये एवढी हिंमत निर्माण झाली की कुठल्याही कामात माघार घेत नाहीत. त्यांनी वर्धा येथे झालेल्या तेजस्विनी प्रदर्शनीमध्ये भाग घेवून यशस्वी झाल्या. त्यामध्ये त्यांनी ४००० रुपये खर्च केला व त्यातून त्यांना २००० नफा झाला. आता त्यांच्यामध्ये यशस्वी उद्योजक कसे बनावे या सर्व गुणांचा विकास झाला. तसेच नलिनी कुकडे सी.एम.आर.सी. आष्टीच्या सहसचिव पदी आहे. त्यांनी इतर गावांना सुध्दा भेटी दिलेल्या आहे. त्या आपली सहसचिवाची भूमिका योग्यपणे पार पाडतात.

त्यांना त्यांच्या पतीचे योग्य सहकार्य आहे. त्यामुळे त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून त्यांची अधिकाधिक प्रगती होत आहे. त्यांच्या बद्दल सांगायचे झाले तर महिलांचे काबाडकष्ट कमी होण्याच्या दृष्टीने गावातील महिलांची अडचण जाणून घेवून सामू‍हिक कपडे धुण्याचे ओटे व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी टाके बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करुन माविमला पाठविला. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे गावामध्ये काम सुरु झालेले आहे. आपल्या बचत गटाच्या महिलांना चार पैसे कसे कमावू शकतील याचा विचार नेहमीच त्यांच्या मध्ये सुरु असतो. त्यांनी आपल्या गावाकरिता कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्या नेहमीच नवकल्पकता, बुध्दीचातुर्य व नेतृत्वगुण असलेले दिसून येतात.

गिरडच्या शितलचे उत्कृष्ट नेतृत्व

शितल विलास लभाने ही महिला समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावात राहणारी आहे. या गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या जवळपास आहे. गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. गिरड हे गाव जंगली भागात आहे. गावामध्ये मुस्लीम धर्माच्या लोकांचे वास्तव्य जास्त प्रमाणात असून, येथे मोठा दरगाह आहे. हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे.

गावाची सामाजिक परिस्थिती साधारण चांगली आहे. परंतु येथे दलित वस्तीत राहणारे लोक मागासलेले व गरीब आहेत. येथे जाती भेदाची समस्या नाही. सर्व एकजुटीने सण महोत्सव साजरे करतात. गावामध्ये महिला निरक्षरांचे प्रमाण खुप होते. पण गटामुळे महिला नवसाक्षर झालेल्या आहेत. सर्वांचा शेती व्यवसाय असल्यामुळे सर्व महिला शेतीच्या कामाला जातात. हे गाव नागपूर चंद्रपूर सीमेवर असल्यामुळे या गावात वाहतूकीचे साधन पाहिजे त्यावेळी उपलब्ध आहे.

शितलच्या कुटूंबामध्ये पती-पत्नी, सासू असा छोटासा परिवार आहे. त्यांच्याकडे ५ एकर शेती असून, घरची परिस्थिती साधारण असुन, पती ऑटो चालक आहे. पण चांगल्या विचार सरणीचे लोक आहेत. गटामध्ये येण्यापूर्वी आपले घर व आपले काम एवढच होते. त्यांना आर्थिक व्यवहाराची कधी संधीच मिळाली नव्हती.

कुठे गेलो तर समाजामध्ये मला काय म्हणतील, याची सारखी भीती शितलला होती. घरी न सांगताच शितलने गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी महिलांच्या माहितीवरुन एक वर्षापर्यंत काटकसरीतून बचत केलेली होती. गटामुळे तिला विकासाची वाट मिळाली. विविध विषयाची माहिती मिळाली, विविध प्रशिक्षणामुळे त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढला. गटामध्ये सर्वांना समान संधी मिळाल्यामुळे एकत्रित निर्णय घेतात. स्त्री ही कुटूंबाचा केन्द्र बिंदू असल्यामुळे स्त्रीचा विकास होणे खूपच आवश्यक आहे. याकरिता गटामध्ये सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.

गावविकास करायचं म्हणलं की, लोक सहभाग आला. स्वत: पुढाकार घेवून सर्व गटातील महिलांना सोबत घेउन शासनाच्या योजनाचा फायदा गरजू लोकांपर्यंत कसा पोहचेल याचा सारखा प्रयत्न शितलचा सुरु आहे. प्रशिक्षणामुळे शिकण्याची संधी मिळाली व त्याचा उपयोग येणा-या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला होतो.

सामाजिक प्रश्न म्हणजे स्त्रीभृणहत्या, दारुबंदी, हिमोग्लोबीन तपासणी, वृक्षारोपण इत्यादी जाणीव जागृतीचा कार्यक्रम गावात घेतल्यामुळे विचार बदल प्रक्रियेला सुरुवात झाली. कुटूंबातून सुरुवातीला विरोध झाला. पण घरातील आर्थिक गरजा वेळेवर पुर्ण झाल्याने गटाचे महत्व कळून विरोध न करता सहकार्य मिळाले. स्वत:च्या प्रेमळ वागणुकीमुळे कोणीच विरोध केला नाही तर स्वत:च्या स्वेच्छेने महिला सहकार्य करतात. स्त्रीला कर्तव्यासोबत अधिकारांचा अलंकार खुप गरजेचे आहे. हे मला गटामध्ये आल्यावरच कळले.

स्वत:च्या अधिकाराची जाणीव करुन घ्यावी, याचा सारखा प्रयत्न केला जातो. त्याच सोबत गाव विकासाची वाटचाल करताना सर्व महिलांच्या अधिकाराची, त्यांच्या प्रश्नावर बोट ठेवून समस्यांची मांडणी केली जाते. गावविकास समितीच्या ठरावाने ग्राम सभेमध्ये प्रश्न मांडले जातात.त्यामध्ये पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रोड बांधणी, गावात कचरा कुंडीची व्यवस्था, हागणदारीची समस्या या सारखे प्रश्न मांडले जातात. त्यावर ग्रामपंचायती मधुन बरीच कामे केली गेली.

गावामध्ये गरीब आणि गरजु लोक आहेत. त्यांना बीपीएल कार्डचा लाभ, घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला. महिलांनी गावाच्या गरजेनुसार अगरबत्ती, मेणबत्तीचा व्यवसाय सुरु केलेला आहे. तसेच काही महिला शिलाईचे काम करतात. त्याकरिता कुटुंबातून बरेच सहकार्य त्यांना मिळते.

महिलांच्या भविष्याकरीता स्वत:चा विकास करुन, गावाचा विकास करणे हेच ध्येय आहे. या करिता माविमनी आम्हाला गरजेनुसार मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन करावे. मी पासुन आम्ही पर्यंतचा प्रवास संघर्षाचा गेला. समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषाचे वर्चस्व आहेच. पण गटामधून दिल्या जाणा-या लिंग समभाव प्रशिक्षणामुळे परिवर्तनास सुरुवात झालेली आहे.आता जवळपास सर्वच महिलांना विचारुन यावे लागत नाही. तर सांगून जातात. हा बदल केवळ गटामुळे घडून आलेला आहे.

सी.एम.आर.सी.मध्ये तीअध्यक्ष म्हणून काम पाहते. सदर पदाकरिता तिची नियुक्ती सर्व गाव पातळीवरील निवडून आलेल्या सी.एम.आर.सी. प्रतिनिधी मतदान पध्दतीने झालेली आहे.

प्रत्येक महिन्याच्या मिटींगला येताना प्रत्येक सभासद आपल्या गावाच्या समस्या सोबत घेवून येतात. त्यावर सर्वानुमते विचार विनीमय घेवून प्रश्न सोडविलेजातात. सी.एम.आर.सी. मार्फत गटाला सेवा पुरविल्या जातात. उदा. गटाला लेखा संच पुरविणे, विविध विषयाचे प्रशिक्षण देणे, व्यवसायाकरिता आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणे इत्यादी.

अशा पध्दतीने मी सी.एम.आर.सी. अध्यक्ष या पदावर राहून महिलांच्या विकासाकरीता सतत प्रयत्न करीत आहे. व त्यामुळे माझ्या विकासाला गती मिळाली आहे. असे ती आवर्जून सांगते.