मंगलवार, 23 अगस्त 2011

शिवणकलेतून जुळविली घरच्यांची मने

मी सौ. साधना हरी कांबळे अल्लीपूर येथील धम्मचक्र स्वयं सहायता महिला बचत गटाची सचिव म्हणून कार्य करीत आहे.

मी गटात येण्यापूर्वी माझा विवाह अल्लीपूर येथील हरी कांबळे यांचे सोबत झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासुरवास सुरु झाला. त्यातूनच माझी मानसिकता ढासळायला लागली. आता जीवनात काही नविन करण्याची हिंमत ढासळत होती. कसेबसे जीवन जगणे सुरु होते.

अशा परिस्थितीत एके दिवशी माविम सहयोगीनी माझ्याकडे आली, तिने मला गटात समाविष्ट केले आणि गटातील सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली व नविन काहीतरी करायला मिळणार या उद्देशाने मी त्यांना होकार दिला व पुढाकार घेण्यास तयारी झाली.

गटाच्या माध्यमाने व सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्यवहार उत्तमरित्या शिकले. यातून माझा आत्मविश्वास वाढला. परंतु घरच्यांचा विश्वास कसा जिंकावा याकडे लक्ष देणे गरजेचे होते.

मी लग्नापूर्वी शिवणकलेचा कोर्स केला होता. मी ठरविले की, गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन घ्यायचे व स्वत:च्या पायावर उभे राहून घरच्यांची मने जिंकायची हे स्वत:च्या मनाशी ठरवून मी शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगला सुरु आहे.

उद्योगामुळे घरच्या परिस्थीतीला आर्थिक पाठबळ मिळाले. घरच्या परिस्थीतीत सुधारणा व्हायला लागली. त्यामुळे माझ्याकडे घरच्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे. त्यातून मी स्वतंत्रपणे निर्णय घेवू शकते. गटाचे व्यवहार पाहू शकते. घर खर्चात हातभार लावू शकते. आता मला कुठल्याच प्रकारचा सासुरवास होत नाही. पतीची चांगली साथ मिळते.

गटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग सुरु झाला. कपडे शिवता शिवता मने जोडली हेच माझे यश.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें