शनिवार, 21 जनवरी 2012

अल्‍पकाळात निर्माण केली ओळख

अल्‍पकाळात उत्तम प्रगती करणारा गट म्‍हणून वर्धा जिल्ह्याच्या इंझाळा येथील शारदा महिला बचत गटाने आपली ओळख निर्माण करुन दाखविली आहे. 

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा येथे २४ जुलै २००३ रोजी शारदा महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या गटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बचतगटात एकूण १३ सदस्‍य असून त्या सर्व अनुसूचित जातीच्‍या महिला आहेत. 
उपलब्ध आर्थिक बळ, कामाची उपलब्धता, त्याची निकड, उत्पादनाची विक्री या सर्व बाबी विचारात घेऊन या गटाने दुग्‍धव्‍यवसायाची निवड केली. त्‍यासाठी त्‍यांनी २००८ साली बँकेकडून ३ लाख २५ हजार रूपये कर्ज घेतले. त्‍यावर त्‍यांना अनुदान म्‍हणून १ लाख २५ हजार रुपये मिळाले. त्यानुसार त्‍यांची एकूण प्रकल्‍प किंमत ४ लाख ५० हजार रुपये आहे.
 

बचतगटातील व्यवहार हाताळण्यासाठी गटातील सदस्‍यांनी अध्‍यक्ष म्‍हणून उषा खुशाल चापके तसेच सचिव म्‍हणून चंदा बळवंत भसमे यांची निवड केली. या बचतगटातील बँकेचे व्‍यवहार को-ऑपरेटीव्‍ह बँक, हिंगणघाट येथे आहेत. 

या गटाला दुग्‍धव्‍यवसाय करण्‍यासाठी बँकेकडून एप्रिल २००८ मध्‍ये १३ गायी देण्यात आल्या होत्‍या. त्यासाठी बँकेकडून पहिला हप्‍ता म्हणून दोन लाख रूपयांचे कर्ज वितरीत झाले. या गटाने व्‍यवसाय सुरु केल्यानंतर त्यांना सुरूवातीस ४० हजार रुपये उत्‍पन्‍न प्राप्त झाले. तसेच त्‍यांनी बँकेची १ लाख ३० हजार रूपयांची परतफेड केली असून या गटाकडे सद्यस्थितीत मालमत्‍ता स्‍वरुपात ७ गायी आहेत. 

या बचतगटातील सदस्यांना बचतीचे महत्त्व लक्षात आल्याने आणि एकत्रित व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याने सर्व सदस्य अधिकाधिक वेळ देऊन मेहनतीने काम करीत आहेत. यामुळेच अल्‍पकाळात उत्‍तम प्रगती करणारा गट म्‍हणून या गटाने आपली वेगळी ओळख निर्माण करुन दाखविली असून ती इतर गटांनाही प्रेरणा देणारी ठरत आहे. 


महान्‍यूजवरुन साभार 

बचतगटातील महिलांचा सामूहिक शेतीचा आदर्श!


गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

बचतगटाने विकास केल्‍याच्‍या अनेक नोंदी आहेत. त्‍यात विविध व्‍यवसाय करणारेही गट आहेत. परंतु वर्धा जिल्‍ह्यात बचतगटाने, तेही महिला बचतगटाने सामूहिक शेतीचा केलेला प्रयोग निश्चितपणे सर्वांना प्रेरणा देणारा असाच आहे.
 
जिल्ह्यातील देवळीपासून १७ किलोमीटर अंतरावर अंदोरी गाव आहे. या गावाची लोकसंख्‍या २ हजार ७३५ इतकी असून, गावात ५६५ घरे आहेत. या गावातील १० महिलांनी एकत्र येऊन दुर्गामाता महिला बचत गट स्‍थापन केला. संघटक शालिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बचतगटातील प्रत्‍येक महिलेने आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही दरमहा २५ रु. प्रमाणे बचत करण्यास सुरुवात केली. 
या बचतीमधून अंतर्गत कर्ज वाटप करुन व्‍याजासहित रकमेमध्‍ये हळूहळू वाढ होत गेली. त्यातून त्यांनी आपआपल्‍या आर्थिक गरजा आळीपाळीने भागविणे सुरु केले. सर्वांनी सहकार्य केल्याने कर्ज घेण्‍याकरिता त्यांना कोणत्‍याही सावकाराकडे जावे लागले नाही आणि आपल्‍या आर्थिक अडचणींवरही मात करता आली.

या गटाला अंदोरी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेने २० हजार रुपयांचे खेळते भांडवल दिले. याचा उपयोग त्‍यांनी सामूहिक शेतीकरीता केला आणि त्‍याची पूर्ण परतफेड करुन बँकेकडे मोठ्या कर्जाकरीता प्रस्‍ताव दाखल केला. त्‍यानुसार बँकेने त्‍यांना २ लाख ७ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून त्याचे दोन टप्प्यात वाटप केले. 
कर्जाचा उपयोग महिलांनी सामूहिक शेतीसाठी केला. सर्व १० महिला मिळून शेती करू लागल्या. स्‍वतः मेहनत केल्याने उत्पन्नही चांगले आले आणि खर्चही कमी झाला. याद्वारे त्यांनी बँकेची परतफेड पूर्ण केली. अशा प्रकारे दहाही महिलांना रोजगार मिळाला आणि उत्‍पन्‍नातही वाढ झाली. 

गटातील दहाही महिला दरवर्षी किरायाने शेती करतात. सर्व महिला खेड्यातील असल्‍यामुळे सर्वांनाच शेतीचे ज्ञान आहे. आपल्‍या किरायाच्‍या शेतीमध्‍ये जेव्‍हा काम असते त्‍यावेळेला त्‍या दहाही महिला काम करतात आणि काम नसेल तेव्‍हा दुसऱ्यांच्‍या मजूरीकरितासुद्धा जातात. अशा प्रकारे या महिलांचा व्‍यवसाय दरवर्षी सुरळीतपणे सुरू आहे. सदर गटाने दुसऱ्या टप्प्याकरिता बँकेकडे मागणी केली आहे. यावर्षीचा उत्‍पन्‍नाचा पैसा तसेच बँकेचे मिळणारे कर्ज मिळून जास्‍त शेती करण्‍याचा त्यांचा मानस आहे. 

सदर गटाची मासिक सभाही नियमित होते. सभेला दहाही महिला उपस्थित राहतात. शिवाय दर महिन्‍याच्‍या मासिक सभेला संघटक शालिनी पाटील यादेखील उपस्थित राहतात. बचतीमध्ये आता वाढ करून ही जानेवारी २०१२ पासून दरमहा २५ रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आली आहे. सर्व महिला दरमहा नियमित बचत भरतात आणि अंतर्गत कर्ज व्‍यवहार, परतफेड करून गटाची बचत वाढविण्‍यास एकमेकांना प्रोत्‍साहन देतात.

या गटामध्‍ये केवळ आर्थिक व्‍यवहार होत नसून, एकमेकींच्‍या सुखदुःखामध्‍ये ह्या महिला सामील होतात, एकमेकींना सहाय्य करतात हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. हा गट संजीवनी ग्राम सेवा संघ, अंदोरी मध्‍ये सामील झाला आहे. गटातील महिलांचा आत्‍मविश्‍वास वाढला आहे. त्‍यांच्‍यामध्‍ये बोलण्‍याची वृत्ती तसेच धाडस निर्माण झाले आहे. त्‍या स्‍वतः बँकेचे व्‍यवहार करायला शिकल्‍या आहेत. कुटुंबाच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नामध्‍ये आता त्‍यांचाही मोठा वाटा आहे. त्‍यांची बचत असल्‍यामुळे त्‍या कधीही अंतर्गत कर्जाच्‍या माध्‍यमातून आपल्‍या आर्थिक अडीअडचणी सोडविण्‍यासाठी सक्षम बनल्‍या आहेत.

या गटातील महिला दारुबंदीच्‍या महिला मंडळामध्‍ये सामील झाल्या आहेत. तसेच तंटामुक्‍त ग्राम मंडळ, ग्राम स्‍वच्‍छता अभियान यामध्‍ये सुद्धा गटातील महिलांची मोलाची कामगिरी आहे. दुर्गामाता महिला बचत गटाला प्रगतीचा मार्ग सापडला असून अंदोरी या गावामध्‍ये १५ गटांपैकी हा गट आदर्श गट म्‍हणून ओळखला जात आहे.


महान्‍यूजवरुन साभार 

मंगलवार, 10 जनवरी 2012

शेतात उमलले समृध्‍दीचे फूल !


लहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे. 

 श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. 

झाडांची लागवड ऑगस्‍ट २०११ मध्ये करण्यात आली. मात्र फुलांच्या उत्पादनाला २ नोव्हेंबर २०११ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत २७ हजार १६० उत्पादित फुलांची विक्री करण्यात आली आहे. या विक्रीपासून श्री. अवचट यांना १ लक्ष ५१ हजार ९२ रुपये एवढी रक्कम मिळाली. आतापर्यंत फुलाच्या उत्पादनावर ६२ हजार रुपये खर्च झाला असून निव्वळ नफा ८९ हजार ९२ रुपये झाला आहे. येत्या काळात प्रत्येक महिन्याला सरासरी ३० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित असून प्रत्येक फूल ३ रुपये प्रमाणे विकल्यास ९० हजार रुपये प्रत्यक्षात उत्पन्न होऊ शकते.

एका वर्षाचा ताळमेळ सांगताना अवचट म्हणाले, १० लक्ष ८० हजार रुपये फुलांची विक्री होणार असून ४ लक्ष ५६ हजार रुपये खर्च वजा जाता ६ लक्ष २४ हजार रुपये नफा मिळू शकतो. यावेळी त्यांनी स्वत:चे शेड्यूल, ड्रेनचीग व किटक नाशके व बुरशी नाशक फवारणीची महिती सांगितली.

या फुलांची हैद्राबाद व बंगलुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या बाजारपेठांत फुले पोहचविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मात्र फुल उत्पादन मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यास वाहतुकीचा खर्च अल्प प्रमाणात येऊ शकेल. कदाचित फुलांचे व्यापारी सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुले खरेदी करु शकतील. त्यादृष्टीने आता या भागातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

नागपूर बाजारपेठेत इव्हेंट, मॉल व सणासुदीच्या दिवसाचे महत्त्व ओळखून फुलांची विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला फाटा देऊन नाविण्यपूर्ण शेती करुन आर्थिक समृध्दी साधावी, अशी वेळ आता आली आहे.
मिलिंद आवळे




महान्‍यूज वरुन साभार

शुक्रवार, 6 जनवरी 2012

''अन्नपूर्णा'' महिला स्वयंम सहाय्यता बचत गट

ग्रामीण क्षेत्रातील महिलानी स्वत:ला मर्यादित क्षेत्रापुरते न ठेवता, महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून, कुटुंबाचीही जबाबदारी स्वीकारलेली पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आष्टी पंचायत समिती अंतर्गत येणा-या माणिकवाडा ता. आष्टी जि. वर्धा येथील अन्नपूर्णा महिला स्वयंम सहाय्यता बचत गटाची कामगिरी अशाच प्रकारचे महिलाचे यश अधोरेखीत करणारी आहे.
 
अन्‍नपूर्णा बचत गटाची स्थापना दिनांक 3 ऑगस्‍ट 2005 ला करण्यात आली. ग्रामीण महिलांनी एकत्र येवून 12 सदस्यांचा गट करण्याचे ठरविले. सर्वानुमते सौ. पुष्पा दशरथ घागरे यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्‍हणून सौ.बेबी रामराव गंधळे यांची निवड केली. बँक ऑफ इंडिया साहुर शाखे कडून गटाची प्रथम प्रतवारी दिनांक 8 नोव्‍हेंबर 2007 रोजी झाली आणि रु 25000/- फिरतानिधी गटाअंतर्गत कर्ज वाटपा करिता उपलब्ध करुन दिला. कालांतराने महिलांना गटाच्या कर्जातुन प्रगती साधण्याचे महत्‍त्व कळु लागल्यावर त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले.दुग्ध व्यवसायाकरिता तीस दुधाळू संकरित गायी खरेदी करण्या साठी बँक ऑफ इंडिया साहूर शाखेने दिनांक 9 सप्‍टेंबर 2010 ला व्दितीय प्रतवारी करुन गटाला दुग्ध व्यवसायाकरिता एकूण दोन लाख रुपये कर्ज मंजूर केले

बचतगटाला कर्जाचा पहिला टप्पा दिनांक 4 फेब्रुवारी 2011 ला 10 संकरित गायी खरेदी करण्याकरिता देण्यात आला. संकरित गायीचे संगोपन महिला उत्तम रित्या करु लागल्‍या. दररोज दुध विक्रीच्या माध्यमातून पैशाची आवक सुरु झाली. जास्त शिक्षण नसले तरी स्व:ताच्या पायावर उभे राहून, आपल्या संसारासाठी हातभार लावण्याची धावपळ या गटाच्या सदस्यामध्ये दिसुन येवू लागली

दरमहा 5 तारखेला गटाची मसिक बैठक होते. व्यवसायात मिळणारा नफा तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी विक्री उत्पादन ही सर्व कामे महिला चोखपणे पार पाडतात. बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या जमाखर्चाचे सर्व हिशोब या विषयी चर्चा केली जाते. गटातील सर्व महिला एकत्र येवून सण समारंभ साजरा करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा टिकून आहे.

गावात ग्रामसफाई, वृक्षारोपण तसेच व्यसनमुक्ती ,रांगोळी स्पर्धा, इत्यादी कार्यक्रम अन्नपुर्णा गटात राबविले जातात. बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. त्या ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या मदतीने स्त्रियांचा व त्यांच्या कुटुंबाचा संसार फुलू लागल्‍याचे निदर्शनास आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना बँकेचे व्यवहार सुध्दा कळू लागले तसेच स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या आधारावर प्राप्त केले आहे. या आदर्श गटाची कार्यप्रणाली व भरभराट पाहुन इतर गावातील ग्रामीण भागातील स्त्रियासुध्दा आशेचे किरण म्हणुन हया आदर्शाने प्रेरीत झाल्या आहेत.


महान्‍यूजवरुन साभार

बुधवार, 4 जनवरी 2012

बहु सामाजिक उपक्रम गट !


देवळी पासून २५ किलोमीटर असलेले गुंजखेड हे गाव, या गावामध्ये बचत गटाचा लवलेश नसतानासुध्दा ग्रामपंचायतच्या मदतीने १५ महिला एकत्र येवून बचत गट स्थापन केला. बचत गटाचे नाव रमाबाई महिला बचत गट ठेवण्यात आले. बचत गट सुरु करण्यामागचा उद्देश विचारला असता सावकाराच्या जाचातून सुटका व्हावी व महिलांच्या गरजा महिलांनीच भागवाव्यात व बचत गटातून जमा झालेला पैसा महिलांच्याच कामात यावा असे त्यांनी सांगितले.

सुरूवातीला त्यांनी पैसे जमा करुन अंतर्गत व्यवहार सुरु केला. त्यानंतर त्यांना खेळते भांडवल मिळाले. खेळत्या भांडवल मधून त्यांनी अंतर्गत कर्ज वाटप केले व त्या माध्यमातून महिलांच्या गरजा भागत होत्या. त्यानंतर त्यांना कपडा व्यवसायासाठी २ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. त्यामधून त्यांनी कपडा व्यवसाय सुरु केला. कपडा व्यवसायामधून त्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत नव्हती. 

मग सर्व महिलांनी मिळून चर्चा केली की कपडा व्यवसाय हा आपण सर्वजणी मिळून करतो त्यापैकी काही महिला बचतगटामधे काम करतात तर काही महिला शेतीच्या कामावर जातात.त्यामुळे जर असे केले तर आपण सर्व महिलांनी वैयक्तिक व्यवसाय करायचा व कर्ज गटामधून घ्यायचे हा विचार सुरूवातीला नवीन होता ‍की गट हा सुध्दा बहुव्यवसायी होऊ शकतो.सर्व महिलांनी ठरवून शेती, किराणा, हॉटेल, स्टेशनरी, शिलाई मशीन, पापड उद्योग इत्यादी व्यवसायासाठी कर्ज घेतले. हा गट बहुव्यवसायी म्हणून नावारुपास आला. वैयक्तिक व्यवसाय असल्यामुळे महिला जीव ओतून काम करु लागल्या व त्यांना चांगला नफा मिळू लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्या सक्षम बनल्या. व कर्ज व्याजासहित गटामध्ये परत करु लागल्या.

एका गटामधील हॉटेल चालविण्यार्‍या महिलेचे घर सर्वसाधारण होते. परंतु या व्यवसायामुळे त्या महिलेचे आज दुमजली घर आहे व हे सर्व गटामधील कर्ज मिळाल्यामुळे झाले हे ती महिला अभिमानाने सांगते. त्याचप्रमाणे एका महिलेची शेती खूप दिवसांपासून पडिक होती. त्या महिलेने गटामधून कर्ज घेऊन शेती केली व आज त्या महिलेला चांगले उत्पन्न मिळत आहे.

महिलांना कर्ज देणे व परत करणे हे आपले कर्तव्य वाटू लागले. त्यामुळे पैसा खेळता राहिला. त्याचप्रमाणे त्यांच्या यशस्वी गटाचे रहस्य म्हणजे त्यांच्या मासिक बैठका वेळेवर होत आहेत तसेच मासिक बचतीसोबतच महिला आपल्या गटातील अडीअडचणी भागविण्यास नेहमी तत्पर असतात. बचत आपल्या गरजा भागविण्यात कामात येत आहे. त्याचप्रमाणे गटामध्ये महिलांच्या गरजा भागणे महत्वाचे असल्यामुळे महिलांनी वेगवेगळया व्यवसायासाठी पैसे घेतले तरी गटप्रमुखांनी किंवा कोणत्याही सदस्यांनी आडकाठी आणली नाही.

गटामध्ये फक्त आर्थिक देवाणघेवाण होत नाही तर महिलांच्या सु:ख दु:खावरही चर्चा करण्यात येते. त्यासोबत आरोग्यविषयक शिबीर घेण्यात येते त्याचप्रमाणे अंगणवाडीला देण्यात येणारा पूरक पोषक आहार रमाबाई महिला बचत गटाकडे आहे.स्वच्छता अभियान, तंटामुक्त ग्राम अभियानामध्ये सुध्दा गटामधील सदस्यांचा सहभाग आहे.

रमाबाई महिला बचत गट हा फक्त बहुव्यवसायी गट नसून बहु सामाजिक उपक्रम गट आहे. त्यामुळे त्यावरुन असे लक्षात येते की, रमाबाई महिला बचत गट हा महिला धनव्यवहारासोबतच मनव्यवहार सुध्दा करतात म्हणून हा गट यशस्वी दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

महान्‍यूजवरुन साभार