मंगलवार, 11 अक्तूबर 2011

सुबाभूळ शेती आणि कागद..!



यंत्राची जोरदार घरघर चालू आहे.. आमच्या आपसात बोलण्याचा आवाजही वाढलेला.. मशीनच्या दुस-या बाजूने पांढरा शुभ्र कागद रोल होत होता. थोडसं पुढे हाच रोल लावून दुसरं यंत्र अगदी सहजरित्या रोबोटच्या सहाय्यानं त्याच्या कटींगसह १ रिम मोजून त्याचे तयार गठ्ठे पॅकींग करित आहे आणि आलेल्या पॅकेटवर स्टीकर चिटकवण्यात येत आहे. हा शुभ्र गुळगुळीत पेपर बघितल्यावर कुणालाही चटकन लिहावं वाटेल.

हे चित्र आहे बल्लारपूर पेपर मिलचे. बैठकीसाठी चंद्रपूरला गेलो त्यावेळी मिटींगनंतर दुस-या दिवशी बल्लारपूरला जायचं ठरलं. आपण कागदावर लिहितो पण तो कागद नेमका कसा तयार होतो हे बघितलं नव्हतं त्यामळे उत्सुकता होती.

बल्लारपूर पेपर मिल हा येथील वनांवर अवलंबून सुरु केलेला कारखाना. बांबूपासून पेपर तयार करण्यासाठी सुरु झालेला हा प्रकल्प या भागात आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करीत आहे.

कारखान्यात दाखल झाल्यावर तिथल्या पध्दतीप्रमाणं डोक्यावर हेल्मेट परिधान केले आणि प्रसिध्दीची ही सेवा ज्या कागदाच्या आधारे प्रसिध्दीचे प्रामुख्याने काम करतो त्या कागदाच्या कारखान्याच्या पाहणीस निघाली. कारखान्याच्या मागील बाजूस ट्रकची भली मोठी रांग त्यात काही ट्रक बांबूने भरलेले तर काही सुबाभूळीच्या लाकडांनी हेच कागदचं पहिलं रुप.

लाकडाची धुलाई करुन तो 'चिपर' मध्ये येतो येथील अजस्त्र यंत्र ताकदशील दातांनी त्या लाकडांचा एक इंच इतका छोटा चुरा करतात तो कन्व्हेअर बेल्टने पुढे चाळणीत जातो जिथे चुकीच्या आकाराचे तुकडे पुन्हा चिपिंगकडे परततात उर्वरित डायजेशन प्रक्रियेला जात असतात करखान्याचे अभियंता चौहान माहिती देत होते हा चुरा मग रसायनं आणि पाण्याच्या उच्च तापमानात शिजतो आणि त्याचा लगदा बनतो. हा काळा असतो. त्यानंतर त्याची स्वच्छता होते व अखेरच्या यंत्रातून स्वच्छ पांढरा लगदा पुढे सरकत राहतो.

कारखान्याच्या तीनमजली इमारतीत ही प्रक्रिया तेथे क्लोरिन व इतर गॅस आणि उष्णता हे बघताना घाम आलेला या कारखान्यात १८ वर्षाखालील व ५५ वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही हे विशेष कारखान्याची सध्याची क्षमता प्रतिदिन ४५० टन आहे आणि अल्पावधीत ६५० टन क्षमतेचे नवे युनिट येथे सुरु होत आहे.

पुढे हा कागद यांत्रिक पध्दतीने अखेरच्या टप्प्यात जातो. या ठिकाणी प्रक्रियेव्दारे त्यातली आर्द्रता काढून यंत्राव्दारे टनांचा दाब दिल्यावर लगदा शुभ्र आणि गुळगुळीत कागदाच्या रुपात बाहेर पडतो. इथ चर्चा करताना आमचे संचालक श्री.कौसल सर कागदाचा शोध चीन मध्ये लागला हे सांगत होते. यांत्रिक पध्दतीने हव्या त्या जाडीचा बनविण्यात येतो आणि त्यानुसार त्याचे दर ठरतात.

कागदाची मजबूती लाकडावर अवलंबून असते. आता बांबूचे क्षेत्र घटल्याने आसपासच्या राज्यातून शेतात सुबाभूळाची लागवड करुन त्याच्या फांद्या ट्रकव्दारे आणल्या जातात. सध्या मुख्य निर्मिती सुबाभळावरच होते. हे ऐकून आश्चर्य वाटले.

सुबाभूळ शेतात लावल्यास कीड अथवा इतर खर्च राहत नाही आणि विशिष्ट आकाराच्या फांद्या तोडूनच द्यायच्या त्यामुळे वारंवार खर्चाचा प्रश्न राहत नाही. आपल्याकडे ऊस मोठया प्रमाणावर आहे. याचा उत्पादन खर्च, निगा आणि तोडणी या प्रक्रियेतून टनाला २ हजार पर्यंत आधिकतम भाव आहे. तुलनेत सुबाभूळ हा कारखाना ४ हजार रुपये टन खरेदी करते हे विशेष.

मौसमी हवामान आणि यात असणारी रिस्क कमी आणि भाव जास्त आहे. आंध्रप्रदेशात अनेकजण सुबाभूळाच्या शेतीकडे वळले आहेत. आपल्याही राज्यात असं शक्य आहे आणि जोखीम कमी करुन शाश्वत उत्पन्न देणारी ही शेती शक्य आहे या विचारातच मी कारखान्यातून भोजनासाठी बाहेर पडलो. - 

  • प्रशांत दैठणकर

  • एक ठिपका दर्जेदार शिक्षणासाठी..!



    चिमुकल्या शाळकरी हातांनी ` एक साथ नमस्ते ` म्हणत झालेलं स्वागत तर कुठे वर्गात शिरताच ` गुड मॉर्निंग सर, क्लॅप, क्लॅप, क्लॅप म्हणत टाळया वाजवणारे हात गणवेषात सज्ज मुलं आणि नेमकं आता काय होणार असा भाव चेह-यावर घेऊन उभी शिक्षक मंडळी त्यासोबत संस्थेचे पदाधिकारी. हे चित्र आहे शालेय पटपडताळणी दरम्यानचं .

    राज्यात ३ ते ५ ऑक्टोंबर या कालावधीत शालेय पटपडताळणीचा कार्यक्रम शासन निर्णयानुसार सुरु झाला. शाळांमध्ये शिक्षकांची पदे टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय आहे.

    सकाळीच सर्व शाळांमध्ये शाळेच्या वेळेआधी अर्धातास ही पथके शाळांमध्ये दाखल झाली. त्याची तयारी आधीच्याच दिवशी झाली. शिक्षण विभागाला वगळून ही पडताळणी असल्यामुळे त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या. महसूल विभाग आणि शासनाचे इतर सर्व विभाग यांनी संयुक्तपणे पडताळणीस सहकार्य केले आहे.



    या कामी मोठ्या प्रमाणावर वाहने अधिग्रहीत करणे तसेच सर्वांना प्रशिक्षण देणे असेही याच पटपडताळणीचा एक भाग होता.

    सकाळीच आम्ही जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्यासह एका पथकात शाळांमध्ये फिरायला सुरुवात केली. यात काही शाळांचे पट बघितले. पट नव्याने लिहिले होते. तर काही ठिकाणी जून महिण्यात असणारी विद्यार्थी संख्या आणि ऑगस्टची संख्या यात फरकत दिसत होता.

    शिक्षक वर्गाला या पडताळणीचे कुतूहल आणि भिती आहे असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. एका शाळेत सातव्या वर्गास इंग्रजी शिकविणा-या शिक्षिकेला अम्ब्रेलाचे स्पेलिंग लिहा असे सांगितले तर तिने ते ` ए ` या अक्षरापासून सुरु केले. त्यामुळे विदृयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते की नाही याबाबत शासनाला वाटणारी चिंता रास्तच आहे हे स्पष्ट झाले. एक-दोन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी नव्याने कालच गणवेष मिळाला असे त्यांनी सांगितले. एका वर्गात विदृयार्थ्यांचे नाव विचारुन घेतले आणि नंतर शिक्षकाला त्याचे नाव विचारले त्यावेळी दोन्ही नावं वेगळी असल्याचा उलगडा झाला.

    शाळा-शाळांमधून या निमित्ताने असणा-या किचनची सफाई करण्यात आलेली होती. काही शाळांमध्ये वर्गातच तांदळाची पोती ठेवलेली होती.शाळांमध्ये उपस्थिती दाखवण्यासाठी अनेक संस्थाचालक अक्षरश: आटापीटा करीत आहेत हे स्पष्टपणाने जाणवले.

    शासनाने नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक पटपडताळणी केली त्यावेळी २० टक्के उपस्थिती बोगस असल्याचे उघडकीस आले.होते. शाळांमध्ये शिक्षकांचे वेतन व भत्ते तसेच शालेय साहित्य आणि माध्यान्ह भोजन यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान देते. या प्रकारे २० टक्के बोगस विद्यार्थी आढळले तर शासनाचे थोडे थोडके नव्हे तर ५००० कोटी रुपये वाचणार आहेत.

    वर्धा जिल्हा छोटा असल्याने इथं एकाच दिवसात सर्व शाळांची पडताळणी एका दिवसात पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुन्हा दुस-या ठिकाणी शाळेत बसू नये म्हणून त्यांच्या बोटांवर शाई लावण्यात आली. अशी शाई निवडणुकीत मतदारांना लावली जाते.

    बोटावरली ती शाई मुलं कौतुकानं बघत होती. हाच छोटासा शाईचा ठिपका येणा-या काळात त्यांना दर्जेदार शिक्षणाची सुरुवात करुन देणार आहे. असा विचार करतच बातम्या देण्यासाठी मी कार्यालयात परतलो.

  • प्रशांत दैठणकर 

  • सोमवार, 3 अक्तूबर 2011

    पोषण आहारातून समृध्दी


    सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

    वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात आपल्या परिश्रमाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासोबतच स्वत:चा आर्थिक उंचावणारे अनेक बचतगट कार्यरत आहेत. यातील एक बचतगट म्हणजे वर्धा तालुक्यातील आलोडी गावाचा जागृती महिला बचतगट होय.

    दारिद्रय रेषेखालील महिलांचे जीवनमान सुखी व्हावे या उद्येशाने ऑगस्ट २००७ मध्ये गटाची सुरुवात झाली. दहा महिलांच्या या गटात आठ महिला दारिद्रय रेषेखालील आहेत. यांनी बचतीच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने नुसता गृहोद्योग केला असे नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमांमधून गावात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

    बँकेकडून कर्ज घेण्यासाठी डीआरडिए चे विस्तार अधिकारी डी.के.वरधणे यांची मदत झाली. त्यांना वर्धा येथील भारतीय स्टेट बँकेने १ लाख रुपयांचे कर्ज दिले. आपल्या विविध कामाच्या जोरावर गटाने गेल्या ३ वर्षात ८५ हजार रुपये कर्जाची परतफेड केली असून, आज मितीस गटाकडे ४० हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध आहे.

    या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे निर्मल ग्राम योजनेत सहभाग. प्रत्येक सदस्याच्या घरात शौचालय असलेच पाहिजे असा निर्णय घेऊन तो त्यांनी पार पाडला. या गटाला गावात शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम मिळाले आहे. त्या माध्यमातून मुलांना सकस आहार आणि गटाला आर्थिक स्थैर्य लाभले आहे.

  • प्रशांत दैठणकर

  • शनिवार, 1 अक्तूबर 2011

    एकतेच्या शक्तीचे यश


    शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

    आपल्याला नियमित आयुष्यात विविध गोस्टी लागतात. यासाठी आपण बाजारपेठेवर अवलंबून असतो. यात वेगळा विचार केला तर आपणच बाजारपेठ निर्माण करु शकतो आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत करु शकतो. या विश्वासातून काम करणा-या सिंधी मेघे येथील एकता स्वयंसहायता महिला बचतगटाने मोठे काम उभे केले आहे.

    सिंधी मेघे हे वर्धेपासून पाच किलोमीटर अंतरावरील गाव आहे. येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थन हे वैद्यकीय विद्यापीठ आहे. मोठ्या प्रमाणावर मुलं-मुली या भागात शिक्षणासाठी राहतात. त्यांच्या मेसच्या गरजा लक्षात घेऊन अनेक व्यवसाय इथं उभे राहिले आहेत.

    गावातील दारिद्रय रेषेखालच्या १३ जणींनी एकत्र येवून जानेवारी २००७ मध्ये बचतगटाची स्थापना केली. बँकेचे वित्तसहाय्य मिळाल्यावर उद्योग उभारायचा हे त्यांनी प्रारंभापासून निश्चित केले होते. गावात भोजनालये आणि हॉटेल्सना मसाले, तिखट, हळद अशा विविध पदार्थांची गरज असते.

    अर्थसहाय्य प्राप्त झाल्यावर गटाने कांडप यंत्र टाकण्याचा निर्णय घेतला. या रुपाने त्यांच्या घरात जणू लक्ष्मीचं आगमन झालं. आजवर बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज पूर्ण परतफेड करुन त्यांनी व्यवसायाच्या जोरावर ५० हजारांचे खेळते भांडवल आणि कांडप यंत्र यासह प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य अशी केलेली कमाई निश्चितपणे कौतुकास्पद अशीच आहे.