शनिवार, 20 अगस्त 2011

गिरडच्या शितलचे उत्कृष्ट नेतृत्व

शितल विलास लभाने ही महिला समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावात राहणारी आहे. या गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या जवळपास आहे. गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. गिरड हे गाव जंगली भागात आहे. गावामध्ये मुस्लीम धर्माच्या लोकांचे वास्तव्य जास्त प्रमाणात असून, येथे मोठा दरगाह आहे. हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे.

गावाची सामाजिक परिस्थिती साधारण चांगली आहे. परंतु येथे दलित वस्तीत राहणारे लोक मागासलेले व गरीब आहेत. येथे जाती भेदाची समस्या नाही. सर्व एकजुटीने सण महोत्सव साजरे करतात. गावामध्ये महिला निरक्षरांचे प्रमाण खुप होते. पण गटामुळे महिला नवसाक्षर झालेल्या आहेत. सर्वांचा शेती व्यवसाय असल्यामुळे सर्व महिला शेतीच्या कामाला जातात. हे गाव नागपूर चंद्रपूर सीमेवर असल्यामुळे या गावात वाहतूकीचे साधन पाहिजे त्यावेळी उपलब्ध आहे.

शितलच्या कुटूंबामध्ये पती-पत्नी, सासू असा छोटासा परिवार आहे. त्यांच्याकडे ५ एकर शेती असून, घरची परिस्थिती साधारण असुन, पती ऑटो चालक आहे. पण चांगल्या विचार सरणीचे लोक आहेत. गटामध्ये येण्यापूर्वी आपले घर व आपले काम एवढच होते. त्यांना आर्थिक व्यवहाराची कधी संधीच मिळाली नव्हती.

कुठे गेलो तर समाजामध्ये मला काय म्हणतील, याची सारखी भीती शितलला होती. घरी न सांगताच शितलने गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी महिलांच्या माहितीवरुन एक वर्षापर्यंत काटकसरीतून बचत केलेली होती. गटामुळे तिला विकासाची वाट मिळाली. विविध विषयाची माहिती मिळाली, विविध प्रशिक्षणामुळे त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढला. गटामध्ये सर्वांना समान संधी मिळाल्यामुळे एकत्रित निर्णय घेतात. स्त्री ही कुटूंबाचा केन्द्र बिंदू असल्यामुळे स्त्रीचा विकास होणे खूपच आवश्यक आहे. याकरिता गटामध्ये सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.

गावविकास करायचं म्हणलं की, लोक सहभाग आला. स्वत: पुढाकार घेवून सर्व गटातील महिलांना सोबत घेउन शासनाच्या योजनाचा फायदा गरजू लोकांपर्यंत कसा पोहचेल याचा सारखा प्रयत्न शितलचा सुरु आहे. प्रशिक्षणामुळे शिकण्याची संधी मिळाली व त्याचा उपयोग येणा-या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला होतो.

सामाजिक प्रश्न म्हणजे स्त्रीभृणहत्या, दारुबंदी, हिमोग्लोबीन तपासणी, वृक्षारोपण इत्यादी जाणीव जागृतीचा कार्यक्रम गावात घेतल्यामुळे विचार बदल प्रक्रियेला सुरुवात झाली. कुटूंबातून सुरुवातीला विरोध झाला. पण घरातील आर्थिक गरजा वेळेवर पुर्ण झाल्याने गटाचे महत्व कळून विरोध न करता सहकार्य मिळाले. स्वत:च्या प्रेमळ वागणुकीमुळे कोणीच विरोध केला नाही तर स्वत:च्या स्वेच्छेने महिला सहकार्य करतात. स्त्रीला कर्तव्यासोबत अधिकारांचा अलंकार खुप गरजेचे आहे. हे मला गटामध्ये आल्यावरच कळले.

स्वत:च्या अधिकाराची जाणीव करुन घ्यावी, याचा सारखा प्रयत्न केला जातो. त्याच सोबत गाव विकासाची वाटचाल करताना सर्व महिलांच्या अधिकाराची, त्यांच्या प्रश्नावर बोट ठेवून समस्यांची मांडणी केली जाते. गावविकास समितीच्या ठरावाने ग्राम सभेमध्ये प्रश्न मांडले जातात.त्यामध्ये पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रोड बांधणी, गावात कचरा कुंडीची व्यवस्था, हागणदारीची समस्या या सारखे प्रश्न मांडले जातात. त्यावर ग्रामपंचायती मधुन बरीच कामे केली गेली.

गावामध्ये गरीब आणि गरजु लोक आहेत. त्यांना बीपीएल कार्डचा लाभ, घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला. महिलांनी गावाच्या गरजेनुसार अगरबत्ती, मेणबत्तीचा व्यवसाय सुरु केलेला आहे. तसेच काही महिला शिलाईचे काम करतात. त्याकरिता कुटुंबातून बरेच सहकार्य त्यांना मिळते.

महिलांच्या भविष्याकरीता स्वत:चा विकास करुन, गावाचा विकास करणे हेच ध्येय आहे. या करिता माविमनी आम्हाला गरजेनुसार मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन करावे. मी पासुन आम्ही पर्यंतचा प्रवास संघर्षाचा गेला. समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषाचे वर्चस्व आहेच. पण गटामधून दिल्या जाणा-या लिंग समभाव प्रशिक्षणामुळे परिवर्तनास सुरुवात झालेली आहे.आता जवळपास सर्वच महिलांना विचारुन यावे लागत नाही. तर सांगून जातात. हा बदल केवळ गटामुळे घडून आलेला आहे.

सी.एम.आर.सी.मध्ये तीअध्यक्ष म्हणून काम पाहते. सदर पदाकरिता तिची नियुक्ती सर्व गाव पातळीवरील निवडून आलेल्या सी.एम.आर.सी. प्रतिनिधी मतदान पध्दतीने झालेली आहे.

प्रत्येक महिन्याच्या मिटींगला येताना प्रत्येक सभासद आपल्या गावाच्या समस्या सोबत घेवून येतात. त्यावर सर्वानुमते विचार विनीमय घेवून प्रश्न सोडविलेजातात. सी.एम.आर.सी. मार्फत गटाला सेवा पुरविल्या जातात. उदा. गटाला लेखा संच पुरविणे, विविध विषयाचे प्रशिक्षण देणे, व्यवसायाकरिता आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणे इत्यादी.

अशा पध्दतीने मी सी.एम.आर.सी. अध्यक्ष या पदावर राहून महिलांच्या विकासाकरीता सतत प्रयत्न करीत आहे. व त्यामुळे माझ्या विकासाला गती मिळाली आहे. असे ती आवर्जून सांगते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें