मंगलवार, 23 अगस्त 2011

धैर्यशिल शालूची कहाणी

कांढळी ते सेवाग्राम रोडवर एक छोटसं गाव म्हणजे वायगाव (बै.)होय.हया गावाची जवळपास लोकसंख्या ८०० च्या जवळपास आहे. अशा हया छोटयाश्या गावात असणारं एक कुटुंब म्हणजे शालुचं! याच गावात शालु लहानाची मोठी झाली. तिच्या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची होती. ती घरात सर्वात मोठी होती. तिचे आईवडिल शेतमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करित होते. शालु व तिचे भाऊ शाळा शिकत होते. शालु ही कशीबशी दहावी पर्यंत शिक्षण झालेले असताना तिला पुढे शिकायचे होते. 

पण काय करणार ! परिस्थिती नसल्यामुळे पुढे तिला शिकता आले नाही. तसेच तिच्या आईवडिलांनी लग्न करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिला कोणताच पर्याय नव्हता. कारण तिच्या आई वडिलांनी तिच्या करिता मुलगा शोधण्यास सुरुवात केलेली होती.

मोही हया गावातील एका सर्वसाधारण सरकारी कर्मचारी असलेल्या मुलासोबत तिचे लग्न करुन देण्यात आले. मुलगा स्वभावाने चांगला होता. शालु आपल्या संसारात सुखी होती. तिला तीन मुली झाल्या. मुली अगदी लहान असतानाच तिच्यावर फार मोठे संकट कोसळले,. तिच्या नव-याने आत्महत्या केली. शालु समोर आभाळ कोसळले. तिच्या सासरची मंडळी तिलाच दोषी मानत होती.

शालुलाही स्वत:चा स्वाभिमान होता.पण प्रश्न होता तो म्हणजे तिच्या चिमुकल्या मुलीचा, तिला मुलीकरिता जगणेच होते. पण तिला साथ नव्हती कुणाची ! तिने शेवटी निर्णय घेतला माहेरी जाण्याचा. ती माहेरी गेल्यावर माहेरच्या व्यक्तीकडून तिच्या परिवाराच्या गरजा पूर्ण करणार नव्हते. तिच्या समस्या तिलाच सोडवायच्या होत्या. म्हणून ती दुस-यावर अवलंबून न राहता, स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या मुलींना चांगलं शिकवायचं हे तिचे ध्येय होते. 

माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने वायगाव (बै.) येथे बचत गटाची स्थापना केली. शालुला त्या गटाची संघटिका बनण्याची संधी मिळाली. शालु संघटिका म्हणून गटाचे काम पाहू लागली. गटाचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु होते. शालुने गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केली व तिने कपडे शिवण्यास सुरुवात केली. तिने स्वत:च्या मेहनतीने, जिद्दीने स्वत:चा स्वयंरोजगार निर्माण केला. तिने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. व्यवसायातून मिळालेल्या मिळकतीतून ती आपल्या मुलीच्या गरजा पूर्ण करण्यास पात्र ठरली. एवढेच नव्हे तर गावात प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहून, ती सर्वांना सहकार्याच्या भावनेने मदत करते. तिच्या हया कर्तव्यातून इतरांना सुध्दा प्रेरणा मिळते.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें