सोमवार, 12 सितंबर 2011

स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर जनजागृती होणे गरजेचे - राज्यमंत्री राजेंद्र मुळक



राज्यात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय शासनस्तरावर अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे. या विषयासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासोबतच सोनोग्राफी केंद्रावर धाडी घालून याला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा,जलसंपदा, संसदीय कार्य आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी या विषयात संवेदनशील पध्दतीने काम सुरु ठेवले आहे. याबाबत त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

प्रश्न :- स्त्रीभ्रूण हत्या हा विषय आपण कसा हाताळता आणि त्यात आजवर आपण काय काम केले आहे?
उत्तर :- मुळात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय संवेदनक्षम आहे. आपण राजस्थानात किंवा उत्तरेत असा प्रकार घडतो असं मानत होतो. परंतु आपल्या राज्यातही थोड्याफार फरकाने ही स्थिती आहे हे नुकत्याच झालेल्या काही प्रकरणांवरुन दिसतय. नियोजन खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करताना आकडेवारी सातत्याने समोर येते. यामध्ये मुलींचं दर हजारी प्रमाण खूपच कमी आहे. हा केवळ एक आकडा नसून गंभीर, सामाजिक प्रश्न आहे हे माझ्या लक्षात आलं.

मुलींचे दरहजारी प्रमाण वाढवावयचे असेल तर समाजात जागृतीसोबत या संबंधाने असणा-या कायद्यांचे पालन हे दोन पैलू आहेत. या दोन्ही कडे तितक्याच प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे. असं मला वाटतं.

प्रश्न :- यामुळे समाजात काही प्रश्न निर्माण झाले आहेत असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर :- निश्चितपणे. नुसते प्रश्न निर्माण झाले आहेत असं नव्हे तर गांभीर्याने या क्षेत्रात काम झाले नाही तर येणा-या काळात समाजाची संरचना बदलेल इतके दूरगामी परिणाम होतील. दर हजारी १०० मुलींची तफावत म्हणजे काही वर्षांनी दहा टक्के मुलांना अविवाहित राहण्याचा प्रसंग निर्माण होवू शकतो.

प्रश्न :- मुलगाच पाहिजे असा हट्ट का धरला जातो?.
उत्तर :- ही सामाजिक धारणा बनलीय आणि ती पूर्णपणे चुकीची आहे असं माझं मत आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं समाजात मानलं जातं. आज मुली देखील सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नेत्रदीपक कामगिरी करताना दिसतात. कार्पोरेट जगत असो की क्रिडाक्षेत्र सर्वच क्षेत्रात मुलींचे स्वत:चे असे स्थान निर्माण केल्याचे आपणास दिसते अशा स्थितीत मुलालाच वंशाचा दिवा मानणे चुकीचे आहे असं मला वाटतं.

प्रश्न :- मुलींचे प्रमाण कमी होत आहे या मागची कारणं काय वाटतात?
उत्तर :- आपल्या सामाजिक रुढी परंपरा याला निश्चितपणानं जबाबदार आहे. कायदा करण्यात आला असला तरी त्यातून पळवाट शोधून हुंडा मागितला आणि दिला जातो. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही असं कुठेतरी मी वाचलं होतं. मुलगा कसाही निघाला तरी घसघशीत हुंडा मात्र मिळवता येतो अशी धारणा समाजात आहे. हुंडा आवाक्याच्या बाहेर जात आहे आणि मुलगी झाली तर हुंडा कुठून आणायचा या भितीने अनेकजण स्त्री भ्रुण हत्‍त्‍या आणि गर्भजल चिकित्सा या मार्गांकडे वळत आहेत.


प्रश्न :- ही परिस्थिती बदलण्यासाठी काय उपाय करता येतील ?
उत्तर :- या परिस्थितीला बदलण्यासाठी जनप्रबोधन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी हे दोन मार्ग आहेत. जनप्रबोधन आणि प्रोत्साहन यातून समाजाला स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यापासून परावृत्त करता येईल आणि समाजाला चांगली सकारात्मक संदेश देखील पोहोचेल. मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. स्वातंत्र्य दिनी वर्धा येथे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणा-या महिलांचा शासनातर्फे आम्ही सत्कार केला. समाजात असे चांगले वागणारे लोक आहेत हे दाखवून दिले तर या मार्गावर इतरही लोक निश्चितपणाने येतील. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे.

प्रश्न :- कायद्याच्या अंमलबजावणी बाबत काय करीत आहात?.
उत्तर :- गर्भजल लिंग निदान चाचण्यांना रोखण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात याची अंमलबजावणी व्हावी यासाठी समित्यांचे गठण करण्यात आलेले आहे. या माध्यमातून सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी तसेच अचानक तपासणी करण्यात येत आहे. राज्यात ज्या केंद्रांचा व्यवहार संशयास्पद वाटला अशी केंद्र सिल करण्यता आली आहेत.
गर्भलिंग तपासणी करताना सापडलेल्या डॉक्टरांवर कठोर शिक्षा होईल अशी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या प्रमाण निश्चितपणाने घटत जाईल असं असलं तरी समाजानं या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिल्या खेरीज हा प्रकार पूर्णपणे बंद होईल असं चित्र नाही.

प्रश्न :- याखेरीज आणखी कोणते मार्ग आपण हाताळत आहोत ?
उत्तर :- यात प्रबोधन मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे हे स्पष्टच आहे. गणेशोत्सव आणि नवरात्री महोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी याविषयाला अनुसरुन देखावे सादर करावेत असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या काळात मोठ्या प्रमाणावर देखाव्यांसोबतच पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविण्याचेही नियोजन आहे. यात टिव्ही चॅनेल्स, आकाशवाणी तसेच खाजगी एफएम वाहिन्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक आहे. हा मोठा सामाजिक भ्रष्टाचार देखील आहे. याविरुध्द जनशक्ती एकत्र व्हावी आणि हे प्रकार संपून पुन्हा मुलींचे दरहजारी प्रमाण हजारापर्यंत यावे यासाठीच हे प्रयत्न सुरु ठेवणार आहोत.

  •                                                                                                                                                                          प्रशांत दैठणकर

  • कोई टिप्पणी नहीं:

    एक टिप्पणी भेजें