मंगलवार, 23 अगस्त 2011

धैर्यशिल शालूची कहाणी

कांढळी ते सेवाग्राम रोडवर एक छोटसं गाव म्हणजे वायगाव (बै.)होय.हया गावाची जवळपास लोकसंख्या ८०० च्या जवळपास आहे. अशा हया छोटयाश्या गावात असणारं एक कुटुंब म्हणजे शालुचं! याच गावात शालु लहानाची मोठी झाली. तिच्या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची होती. ती घरात सर्वात मोठी होती. तिचे आईवडिल शेतमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करित होते. शालु व तिचे भाऊ शाळा शिकत होते. शालु ही कशीबशी दहावी पर्यंत शिक्षण झालेले असताना तिला पुढे शिकायचे होते. 

पण काय करणार ! परिस्थिती नसल्यामुळे पुढे तिला शिकता आले नाही. तसेच तिच्या आईवडिलांनी लग्न करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिला कोणताच पर्याय नव्हता. कारण तिच्या आई वडिलांनी तिच्या करिता मुलगा शोधण्यास सुरुवात केलेली होती.

मोही हया गावातील एका सर्वसाधारण सरकारी कर्मचारी असलेल्या मुलासोबत तिचे लग्न करुन देण्यात आले. मुलगा स्वभावाने चांगला होता. शालु आपल्या संसारात सुखी होती. तिला तीन मुली झाल्या. मुली अगदी लहान असतानाच तिच्यावर फार मोठे संकट कोसळले,. तिच्या नव-याने आत्महत्या केली. शालु समोर आभाळ कोसळले. तिच्या सासरची मंडळी तिलाच दोषी मानत होती.

शालुलाही स्वत:चा स्वाभिमान होता.पण प्रश्न होता तो म्हणजे तिच्या चिमुकल्या मुलीचा, तिला मुलीकरिता जगणेच होते. पण तिला साथ नव्हती कुणाची ! तिने शेवटी निर्णय घेतला माहेरी जाण्याचा. ती माहेरी गेल्यावर माहेरच्या व्यक्तीकडून तिच्या परिवाराच्या गरजा पूर्ण करणार नव्हते. तिच्या समस्या तिलाच सोडवायच्या होत्या. म्हणून ती दुस-यावर अवलंबून न राहता, स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या मुलींना चांगलं शिकवायचं हे तिचे ध्येय होते. 

माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने वायगाव (बै.) येथे बचत गटाची स्थापना केली. शालुला त्या गटाची संघटिका बनण्याची संधी मिळाली. शालु संघटिका म्हणून गटाचे काम पाहू लागली. गटाचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु होते. शालुने गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केली व तिने कपडे शिवण्यास सुरुवात केली. तिने स्वत:च्या मेहनतीने, जिद्दीने स्वत:चा स्वयंरोजगार निर्माण केला. तिने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. व्यवसायातून मिळालेल्या मिळकतीतून ती आपल्या मुलीच्या गरजा पूर्ण करण्यास पात्र ठरली. एवढेच नव्हे तर गावात प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहून, ती सर्वांना सहकार्याच्या भावनेने मदत करते. तिच्या हया कर्तव्यातून इतरांना सुध्दा प्रेरणा मिळते.



पावले पडली पुढे...

समुद्रपूर तालुक्यातील २४९ लोकसंख्या असलेले खैरगाव, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता स्वयं सहाय्य महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली.गटाच्या संघटिका म्हणून सौ. शौभा झिबलाजी गायधने, वय ४८ वर्षे यांची निवड झाली. शिक्षणाने अशिक्षित असल्या तरी त्यांच्या मध्ये असलेली जिद्द व चिकाटी मुळे संघटन, शिक्षण व व्यवहारीक ज्ञान त्यांना गटामुळे मिळाले.अशिक्षित असल्यामुळे त्यांना वाचन करता येत नव्हते. परंतु त्यांची वाचनाची आवड बघून त्यांच्या मुलांनी त्यांना रात्रीच्या शाळेत जाण्यास सां‍गितले. घरातील कामे, शेतीची कामे, गटाची कामे करुन शोभाताईने ४५ व्या वर्षी ४ थी पास केले. शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते हे त्यांनी समाजाला दाखवून दिले.

शोभाताईने गटातून कर्ज घेऊन स्वत:च्या १२ एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला.त्यासाठी त्यांनी स्वत: व गटातील महिलांनी शेती शाळेत प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीमुळे कीटकनाशके,रासायनिक खते इत्यादीचा खर्च वाचला. शोभाताईने स्वत: गांडुळ खत, जीवामृत तयार करुन शेतीमध्ये त्याचा वापर केला.शेतीमधून निघालेल्या उत्पादनातून त्यांनी विषमुक्त अंबाडी शरबत, झुणका भाकर चा स्टॉलच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनीमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

गावातील तलावावर गटातील महिलांच्या सहकार्याने व स्वत: पुढाकार घेऊन बंधारा बांधला. गटाचा वाढदिवस, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मेळावे इत्यादी विविध कार्यक्रम गावामध्ये पुढाकार घेऊन साजरे केले जातात. सुजाता स्वयं सहाय्यता बचत गटाच्या नावाने शेतकरी वाचनालय स्थापन केले. गावातील शेतकरी वाचनालयात जावून वाचन करतात. शोभाताईनी कृषी खात्याच्या माध्यमातून शेततळे, गोबरगॅस, वृक्षारोपण इत्यादी योजनाचा लाभ घेतला. शोभाताईला वाचनाची आवड असल्याने वाचनालयातील एकही पुस्तक त्यांच्या वाचनातून सुटलेले नाही.

शोभाताईला सहलीला जाण्याची खूप आवड. गटाची सहल, कृषी खात्यामार्फत अभ्यास दौरा, तीर्थयात्रा असो, त्या नियमित दरवर्षी नवीन गावाला शहरात फिरण्यासाठी जातात. गोवा, अकोला, चिखलदरा, रत्नागिरी, मध्यप्रदेश, दिल्ली इत्यादी ठिकाणी त्या गेलेल्या आहेत.

गटामध्ये सहभागी झाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, मी जे काही करते आहे, ते गटांकडून मिळत असलेल्या बळामुळे. भविष्यात गटासाठी एक व्यवसाय उभारणी करावयाची आहे. जेणेकरुन सर्व सुखी समाधानी जीवन जगेल, पण ते होईल सर्व गटांच्या प्रशिक्षणातूनच आणि त्यासाठी साथ हवी माविमची