शुक्रवार, 30 दिसंबर 2011

बचतगटाने दिली सावकारापासून मुक्‍ती


          वर्धा जिल्‍ह्यातील देवळी पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले बोपापूर वाणी वरुन आतमध्‍ये खर्डा हे गाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्‍या ११२७ असूऩ, घर संख्‍या २६० आहे. गावामध्‍ये बचत गटाच्‍या बचतीचा कोणताही गंध नसताना त्‍या गावातील १७ बीपीएल महिलांनी एकत्र येवून बचतगट सुरु केला. बचत गटामध्‍ये १७ पैकी एकूण १० बीपीएल होत्‍या. सावकाराच्‍या पाशातून मुक्‍तता व्‍हावी व महिलांच्‍या गरजा भागवून काही बचत शिल्‍लक राहावी या उद्देशाने बचत गटाची स्‍थापना करण्‍यात आली. 

 
या महिलांना कोणाचेही मार्गदर्शन नसताना अंतर्गत व्‍यवहार सुरु केला व एका वर्षामध्‍ये मासिक बचत जमा करुन त्‍यामध्‍ये अंतर्गत कर्जाचा व्‍यवहार करुन पूर्ण परतफेड करण्‍यात महिला यशस्‍वी झाल्‍या. त्‍यानंतर ग्रामपंचायतमध्‍ये स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान व रॉकेलच्‍या व्‍यवसायासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍या गटाचा फॉर्म भरला व १ एप्रिल २००८ पासून त्‍यांच्‍या कार्याला गती मिळाली. २००८ मध्‍ये ग्रेडेशन झाले व त्‍याच वर्षी त्‍यांना ५०,००० रु. खेळते भांडवल मिळाले. त्‍यापैकी त्‍यांनी १०,००० रुपये अनुदान मिळाले व उरलेले ४०,००० रुपये परतफेड केले. त्‍यानंतर त्‍यांना २००९ मध्‍ये स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान व केरोसीन याचा परवाना मिळाला. 

आदिवासी रोजगार हमी महिला बचतगट यांनी मिळालेल्‍या पैशांमधून त्‍यांनी रॉकेलचे ड्रम, वजन काटा, माप हे साहित्‍य खरेदी करुन सीताबाई रामाजी कौराती यांच्‍या घरी रुम भाड्याने घेऊन व्‍यवसाय सुरु केला. त्‍यांना ८०० रुपये भाडयापोटी गटाच्‍या महिला देतात. त्‍यानंतर २०१० मध्‍ये त्‍यांना २ लाख रुपये मंजुर झाले. त्‍यामधून पहिला टप्‍पा एक लक्ष रुपये मिळाला त्‍यामधून त्‍यांनी ४०,००० रुपये परतफेड केली.त्‍यामधून त्‍यांना दुसरा टप्‍पा मिळायचा आहे. 

स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान यामध्‍ये त्‍यांच्‍याकडे अंत्‍योदय बीपीएल, ओपीएल, शाळा, अंगणवाडी इत्‍यादी प्रकारामधून त्‍यांना धान्‍य वाटप करायचे आहे. तसेच त्‍यांचा स्‍वस्‍त धान्‍य दुकानाचा स्‍टॉक रजिस्‍टर व विक्री रजिस्‍टर इत्‍यादी रेकार्ड आहे. 
आदिवासी रोजगार हमी महिला बचत गट या गटामध्‍ये कामाची पध्‍दत म्‍हणजे रोज २ महिला, ५० रुपये रोजाप्रमाणे धान्‍य वाटप करतात. त्‍यांची वेळ ठरलेली आहे. सकाळी ९ ते ५ पर्यंत या महिला काम करतात.गटामध्‍ये सर्व महिला एकजुटीने काम करतात.त्‍यामुळे हा गट व्‍यवस्थित चालू आहे.   

 महान्‍यूज वरुन साभार




बचतगटाने दिले ग्रामपंचायत सदस्‍यपद

बचत गटाच्‍या चळवळीने केवळ उदरनिर्वाहाचे साधन मिळाले असे नव्‍हे तर ग्रामपंचायत सदस्‍याचे पदही मिळाले अशी ही यशोगाथा आहे वर्धा जिल्‍ह्यातील मातोश्री स्‍वयंसहायता महिला बचतगटाची.हा बचतगट येळाकेळी गावात आहे. 
२००५ साली गावातील १३ महिलांनी एकत्र येवून हा स्‍वयंसहायता गट स्‍थापन केला. साधारण १ वर्षाने ऑगस्‍ट २००६ मध्‍ये गटाला कर्ज आणि अनुदान असे प्रत्‍येकी ७ हजार, एकूण चौदा हजार रुपये प्राप्‍त झाले. 

या रकमेतून काही निधी शेळीपालनातून मिळालेले उत्‍पन्‍न व वैयक्तिक कर्जाचे व्‍याज या माध्‍यमातून पूर्ण कर्ज परत केले. नोव्‍हेंबर २००८ मध्‍ये गटाला १ लाख ८० हजार कर्ज मंजूर करण्‍यात आले. त्‍यात त्‍यांनी भांडवल वृध्‍दीसाठी याचा वापर केला. गावात या कामाची सकारात्‍मक चर्चा झाल्‍यावर अंगणवाडीचे अन्‍न शिजविण्याचे काम २ वर्षापूर्वी गटाला मिळाले. या दोन्‍हीच्‍या उत्‍पन्‍नावर अलाहाबाद बँकेचे सर्व कर्ज परत करण्‍यात आले असे गटाच्‍या अध्‍यक्षा निर्मला गव्‍हाळे यांनी सांगितले. आज गटाकडे शेळ्याही आहेत आणि अंगणवाडीचेही काम सुरु आहे.

गटाच्‍या कामाची ओळख निर्माण झाल्‍याने निर्मला गव्‍हाळे या ग्रामपंचायत सदस्‍य म्‍हणूनही निवडून आल्‍या. स्‍वयंसिध्‍दा होण्‍यासोबतच राजकारणातही संधी मिळण्‍याची आता सर्वत्र चर्चा आहे. 


महान्‍यूज वरुन साभार